

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वांधिक मोठा असलेला चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपा पक्षाने आपला करिश्मा कायम राखला आहे. निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुकीत 52 पैकी 37 नगरसेवक विजयी झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 नगरसेवक, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 5 नगरसेवक निवडून आले आहेत.
राज्यातील सर्वांत मोठा विधानसभा मतदार संघापैकी चिंचवड हा एक मतदार संघ आहे. मतदार संघात तब्बल 6 लाख 76 हजार 638 मतदार आहेत. हाऊसिंग सोसायट्या, रो हाऊस, अनधिकृत बांधकामे, बैठी घरे असे दाट लोकवस्तीचा हा मतदार संघ आहे. सांगवीपासून सुरू होणारा हा मतदार संघ किवळे-मामुर्डीपर्यंत पसरला आहे. मतदार संघात उच्चभ्रू, उच्च शिक्षित, मध्यवर्गीय व कामगार वर्ग आहे. झपाट्याने विकसित झालेला हा मतदार संघ आहे. पवना नदी या मतदार संघातून वाहते. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी फोडत पक्षात प्रवेश दिला. त्यातील अनेकांना उमेदवारीही देण्यात आली. मतदार संघात महापालिकेचे 16, 17, 18, 22, 23, 24, 25, 26, 27, 28,29,31 आणि 32 असे एकूण 13 प्रभाग असून सर्वांधिक 56 नगरसेवक येतात. भाजपाचे सर्वांधिक नगरसेवक विजयी करून मतदार संघ सेफ करण्यावर आ. शंकर जगताप यांनी भर दिला होता.
आमदार शंकर जगताप यांची ही पहिलीच टर्म आहे. त्यांना आमदार होऊन वर्षभराचा कालावधी झाला आहे. यापूर्वी दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप तसेच, माजी आमदार अश्विनी जगताप यांनी मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. जगताप कुटुंबाला मानणारा हा मतदार संघ आहे. शंकर जगताप यांनी महापालिका निवडणुकीचे भाजपाचे निवडणूक प्रमुख म्हणून संपूर्ण मतदार संघात प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले. तसेच, विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांनीही भाजपाच्या उमेदवारांसाठी मेहनत घेतली. मतदार संघातील 13 प्रभागात नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवण्यावर त्यांनी दिला. त्यात आ. जगताप यांना बऱ्यापैकी यश मिळाले आहे. आहे. मतदार संघात एकूण 37 नगरसेवक हे भाजपाचे आहेत. ती संख्या तीनही मतदार संघातील सर्वांधिक आहे. परिणामी, जगताप यांची महापालिकेतील ताकद वाढली आहे. मात्र, त्यांचे शिलेदार माजी सत्तारुढ पक्षेनेत नामदेव ढाके व माजी उपमहापौर सचिन चिंचवडे तसेच, माजी नगरसेवक व पदाधिकारी मोरेश्वर शेडगे यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. भाजपाचे तसेच, इतर पक्षाचे काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत, काहींना उमेदवारीही देण्यात आली. पक्षाचे तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अनेक सभा या मतदार संघात झाल्या. प्रचारात राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतली होती. मात्र, राष्ट्रवादीला केवळ 10 नगरसेवकांवर समाधान मानावे लागले आहे. माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, त्यांच्या पत्नी जयश्री भोंडवे यांना पराभवास सामोरे जावे लागले. भाजपामधून आलेले शेखर चिंचवडे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे निवडून आले. अनेक ठिकाणी भाजपाकडून राष्ट्रवादीला थोड्या मताने पराभवाचा सामना करावा लागला आहे.
याच मतदार संघातील थेरगाव भागात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार श्रीरंग बारणे यांचे भाग आहे. भाजपासोबत अखेरच्या टप्प्यात युती फिटकल्याने शिवसेनेने एकला चलोचा नारा दिला. खा. बारणे यांचा मुलगा विश्वजित बारणे आणि पुतण्या माजी नगरसेवक नीलेश बारणे यांनी निवडणुकीत बाजी मारली. तसेच, पक्षाचे शहरप्रमुख नीलेश तरस, रेश्मा कातळे व ऐश्वर्या तरस हे विजयी झाले आहेत. त्यांच्या व इतर उमेदवारांसाठी खा. बारणे यांनी स्वत: त्या प्रभागात प्रचार यंत्रणा हाताळली. शिवसेनेचे 5 नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे खा. बारणे यांची अद्याप शहरात पकट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपाचेे सर्वाधिक 37 नगरसेवक पूर्वीपासून भाजपाचे चिंचवडवर लक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 10 नगरसेवक, राष्ट्रवादीचे नाना काटे, मोरेश्वर भोंडवे यांचा करिश्मा ओसरला, खासदार श्रीरंग बारणेंकडून भाजपाला टक्कर, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 5 शिलेदार