पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत 128 पैकी भारतीय जनता पक्षाचे तब्बल 85 उमेदवार विजयी झाले. भाजपाने सलग दुसर्यांदा महापालिकेची सत्ता काबीज केली आहे. तर, फेब्रुवारी 2017 ला हातातून निसटलेली सत्ता ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप करत शहर पिंजून काढले. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराने राष्ट्रवादीला पुन्हा नाकारले. एकूण 36 जागा राखलेल्या राष्ट्रवादीला सलग दुसर्यांदा विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की आली आहे.
तब्बल नऊ वर्षांनंतर महापालिकेची यंदा निवडणूक झाली. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार्या भाजपाने 77 नगरसेवकांवरून 85 वर झेप घेतली आहे. तर, निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी शहरात तळ ठोकला. भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्यांवर भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोप करीत त्यांनी रान पेटवले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या वेळेइतकेच केवळ 36 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
अखेरच्या टप्प्यात भाजपासोबत फिसकटलेल्या युतीमुळे अडचणीत सापडलेले खासदार श्रीरंग बारणे हे नेतृत्व करीत असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला केवळ 6 जागा प्राप्त करता आल्या. त्यात एक त्यांचा मुलगा व एक त्यांचा पुतण्या आहे. गेल्या वेळेस शिवसेनेचे 9 नगरसेवक सभागृहात होते. महापालिकेत भाजपापुरस्कृत एक नगरसेविका विजयी झाल्या आहेत. निवडणुकीत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा प्रथमच, तर, भाजपाचे आमदार अमित गोरखे यांच्या आई दुसर्यांदा विजयी झाल्या आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाचे 77 नगरसेवक होते. यंदा त्यात 8 जागांची भर पडली आहे. तर, एबी फॉर्म भरता न आल्याने अपक्ष ठरलेल्या एक उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे 9 जागा वाढल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सभा झाल्या. निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, आ. महेश लांडगे, विधान परिषदेच्या आ. उमा खापरे, अमित गोरखे तसेच, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली. अजित पवारांच्या आरोपांना उत्तरे न देता विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. पक्षाने निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांना पक्षात घेत त्यांना थेट उमेदवारी देत कमकुवत प्रभाग सशक्त केले आणि विजय साकारला.
फेब्रुवारी 2017 ची निवडणुकीत विठ्ठलमूर्ती खरेदी घोटाळ्याचा मुद्दा गाजवत भाजपाने पहिल्यांदा महापालिकेची सत्ता काबीज केली. त्यानंतर शहरात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसने उभारी घेतली नाही. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी शहरात एन्ट्री घेत भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्यांवर भ्रष्टाचाराच्या फैर्या झाडत, भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना खिंडीत पकडले. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्यांनी त्या आरोपांबाबत तोंड न उघडता, स्थानिक नातेगोते व राजकीय संबंध सांभाळण्यावर भर दिला. शेवटच्या टप्प्यात शहरात येऊन एकट्या अजित पवारांना खांद्यावर निवडणुकीचा भर आला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पक्षाचे अनेक माजी नगरसेवकांनी हातात कमळ घेतल्याने दुसर्या फळीतील उमेदवारांना रिंगणात उतरावे लागले. त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही.
महापालिकेच्या मागील निवडणुकीत एकसंघ शिवसेनेचे 9 नगरसेवक होते. यंदा महायुतीत असलेल्या शिवसेनेची (एकनाथ शिंदे) शहरात घसरण झाली आहे. केवळ 6 नगरसेवक विजयी झाले आहे. भाजपासोबत होणारी युती अखेरच्या क्षणी तुटल्याचे पक्षाला अनेक ठिकाणी उमेदवार देता आले नाही.