

प्रभाग1: चिखली - पाटीलनगर - म्हेत्रेवस्ती
मतदारांना ‘तंदुरुस्त रहा’चा संदेश
चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती, सोनवणेवस्ती आदी ठिकाणी परिसरात सर्वत्र शांततेत आणि निर्भय वातावरणात मतदान आज सकाळी सुरू झाले. प्राथमिक विद्यालय जाधववाडी चिखली या मतदान केंद्रावर आरआरआर संकल्पनेव्दारे ‘तंदुरुस्त रहा’ या विषयातून नागरिकांना आरोग्यदायी जीवनाचा संदेश देण्यात आला. सकाळी साडेसात वाजता मतदानप्रक्रिया सुरू झाली. तरी प्रत्यक्षात आठ वाजल्यापासूनच मतदारांनी केंद्रांवर येण्यास सुरुवात केली. दुपार होण्यापूर्वीच मतदान करण्यावर काही भागांतील मतदारांचा कल होता. त्यामुळे सकाळी प्रभागातील मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी होती. सकाळी साडेसात ते साडेअकरा यावेळेत फक्त 16.52 टक्के मतदान झाले.
प्रभाग 2: बोऱ्हाडेवाडी-कुदळवाडी-जाधववाडी
चिखलीत गर्दी, कुदळवाडीत शांततेत मतदान
चिखलीसह गावठाण परिसरात सकाळपासून मतदानांच्या रांगा लागल्या होत्या. तर, काही केंद्रावर तुरळक गर्दी होती. स्वराज्य रेसिडन्सी, गंधर्व एक्सलन्स, बनकर वस्ती परिसरात मतदानांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. दरम्यान, कुदळवाडी येथे संवेदनशील वातावरणामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त नेमण्यात आला. या परिसरात सकाळच्या टप्प्यात अवघे 8 टक्के मतदान झाले. मात्र, त्यानंतर गर्दी वाढत गेली. अखेरच्या टप्प्यात मतदानाची संख्या वाढत गेली. जाधववाडी, वुड्स व्हिला, बोऱ्हाडेवाडी परिसरात असलेल्या सोसायटी परिसरातून तरुण, महिलांनी सायंकाळी रांगा लावून मतदान केले.
प्रभाग 3: मोशी - डुडुळगाव - चऱ्होली
बाऱ्हाडेवाडी परिसरात बोगस मतदान तक्रारी
मोशी गावठाण, गंधर्वनगरी परिसरात सकाळच्या टप्प्यात मतदानासाठी नागरिक बाहेर पडले होते. मात्र, अनेक नागरिकांचे मतदान केंद्र बदलण्यात आल्याने त्यांचा गोंधळ उडाला. येथील साईमंदिर परिसर, गोखले मळा येथे मतदानामध्ये उत्साह दिसून आला. केंद्राच्या बाहेर उमेदवार आणि पोलीसांमध्ये काही प्रमाणात शाब्दिक वाद देखील झाले. दुपार साडेअकरा वाजेपर्यंत 19 टक्के मतदान झाले. उन्हाचा पारा उतरल्यानंतर हळूहळू वाढू लागली. काळजेवाडी, पठारेमळा, ताजणमेळा, चोवीसवाडी या परिसरात मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क पार पाडला. मोशी परिसरातील बाऱ्हाडेवाडी परिसरात बोगस मतदान झाल्याच्याही तक्रारी नागरिकांनी केल्या.
प्रभाग 4: दिघी - बोपखेल
दिघीत तणाव, बोपखेलमध्ये एव्हीएममध्ये गोंधळ
दिघी, भारतमातानगर, गावठाण म्हणून गणला जाणारा या प्रभागात विविध केंद्र विखुरलेले होते. खासगी व महापालिका शाळेत एकाच ठिकाणी जास्त केंद्र असल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी साडेअकाराच्या दरम्यान सर्वात कमी म्हणजे 17 टक्के मतदान झाले. भारतमाता नगर, गायकवाडनगर, समर्थनगर, कृष्णानगर या परिसरात अनेकजण मतदानासाठी बाहेर पडले नाहीत. दिघी गावठाण, विजयनगर या परिसरात बैठा घरांची संख्या अधिक असल्याने येथून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी उमेदवारांची धावपळ उडाली. बोपखेल गणेशनगर परिसरात एका केंद्रावर मशीनची अदलाबदली झाल्याने काहीसा गोंधळ झाला. दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढत गेला.
प्रभाग 5: चक्रपाणी वसाहत- गवळीनगर
तुकारामनगर, रामनगरमध्ये मतदारांमध्ये उत्साह
सर्वाधिक दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टी वसाहत असल्याने या ठिकाणी मतदारामंध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता. महिला, तरुणांनी रांगा लावून मतदान पार पाडले. सकाळी 18 टक्के मतदान होत. त्यानंतर, हा टक्का वाढत गेला. साडेतीन वाजता 43 टक्के मतदान झाले होते. या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून संवेदनशील केंद्र ठरविण्यात आले होती. तुकारानमगर, महादेवनगर, रामनगर, गुरुदत्त कॉलनी, गवळीनगर या ठिकाणी क्ेंरदावर नागरिकांनी रांगा लावून मतदान केले. अंतर्गत भागात असलेल्या केंद्रात वाहन लांब पार्क केल्यामुळे नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत चालत जावे लागले.
प्रभाग 6: धावडेवस्ती- गावडेस्ती
धावडेवस्ती, गुळवेवस्ती परिसरात तणाव
भोसरीतील मध्यवर्ती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात मतदानांचे अनेक केंद्र बदलण्यात आले होते. त्यामुळे ऐनवेळी मतदानांची धावपळ झाली. त्यातच मोबाईल आत नेता येत नसल्यानेदेखील वाद झाले. मतदानाच्या आतील केंद्रापेक्षा बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी अधिक होती. त्यात धावडेवस्ती, भगतवस्ती, गुळवेवस्ती परिसरातील मतदार दुपारनंतर घराबाहेर पडले. नागरिकांना घराबाहेर काढण्यासाठी तसेच, मतदानांचा टक्का वाढविण्यासाठी या ठिकाणी उमदेवारांना प्रयत्न करावे लागले. सकाळी साडेवाजेपर्यंत अवघे 5 टक्के मतदान झाले होते. मात्र, दुपारी 3 वाजेपर्यंतनंतर नागरिकांनी केंद्राबाहेर रांगा लावल्या हेोत्या. अनेक केंद्रावर नाव सापडत नसल्याने मतदारांना धावपळ करावी
प्रभाग 7: भोसरी गावठाण-गव्हणेवस्ती
लांडेवाडी, गावठाणात टक्का वाढला
भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर या परिसरात मतदानाचा टक्का सकाळच्या टप्प्यात वाढला होता. दरम्यान, दुपारनंतर तो कमी झाला. उन्हामुळे अनेकांनी बाहेर पडणे टाळले. मात्र, दुपारी साडेतीन वाजल्यानंतर मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत हा आकडा 19 टक्क्याच्या आसपास होता. तो दुपारनंतर वाढला तो जवळपास 45 टक्क्यापेक्षा अधिक वाढला. चार वाजता मतदारांनी केंद्राच्या बाहेर गर्दी केली. महादेवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, चक्रपाणी वसाहत या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन तसेच, उमेदवारालादेखील धावपळ करावी लागली.
प्रभाग 8: इंद्रायणीनगर-बालाजीनगर-गवळीमाथा
इंद्रायणीनगर, गवळीमाथा परिसरात मतदारांची धावपळ
भोसरीतील इंद्रायणीनगर, गवळीमाथा या केंद्रात मतदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. अनेक केंद्रात सकाळपासून ते सायंकाळपर्यंंतटक्क्याची आकडेवारी वाढलेली नव्हती. या ठिकाणी अनेक केंद्र बदलले असल्याचा आरोप मतदारांनी केला. त्यामुळे त्यांना केंद्र शोधत फिरावे लागले. यादीत फोटो नसणे, ओळखपत्र जवळ न बाळगणे, नाव स्पष्ट नसणे अशा अनेक कारणांनी मतदान नाकारल्याने काही नागरिकांनी पोलीस व मतदान अधिकारी यांच्याशी वाद घातला. येथील शितोळे चौकात केंद्राकडे जाणारा रस्ताच बंद केल्याने नागरिकांना रस्त्यात वाहने पार्क करावी लागली.
प्रभाग 9: नेहरूनगर- खराळवाडी-अजमेरा कॉलनी
मासूळकर कॉलनीत मतदारांच्या रांगा
खराळवाडी, मासूळकर कॉलनी येथील केंद्रात मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. या ठिकाणी सकाळीच नागरिक मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे अनेक केंद्रात रांगा होत्या. मतदान झाल्यावर या ठिकाणी असलेल्या केंद्राच्या बाहेर सेल्फी पाइंटरवर फोटो काढण्यात आले. संतनगर, सेक्टर 12, जय गणेश सामाज्य, केंद्रीय विहार या परिसरात काही ठिकाणी मशीन बंद पडल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान,परिसरात असलेल्या सोसायट्या आणि दाट लोकवस्ती असलेला परिसर असल्याने विविध केंद्राच्या बाहेर मतदारांनी मतदानांसाठी रांगा लावल्या होत्या.
प्रभाग 10: मोरवाडी-शाहूनगर-संभाजीनगर
मतदान केंद्र बदलल्याने मतदारांना हेलपाटा
संत ज्ञानेश्वरनगर येथील नागरिकांचे मतदान छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय ॲाटो क्लस्टर व एम्पायर इस्टेट परिसरात आले. त्यामुळे मतदारांना हेलपाटा मारावा लागला. तसेच दिव्यांग तसेच सदस्यांची मतदान केंद्रापर्यंत जाताना दमछाक झाली. एमआयडीसीला गुरुवारी सुटी असल्याने या भागातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच मतदान केंद्रावर मतदारांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. दिव्यांगासाठी व्हीलचेअरची सोय करण्यात आली होती. केंद्रावर सुरळीत मतदान पार पडल्याचे दिसून आले. केंद्रावर मोबाइल नेण्यास मज्जाव करण्यात आल्याच्या सूचना असतानाही काही मतदारांनी आपले मोबाइल घेऊन गेल्यामुळे मतदार व पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
प्रभाग11: घरकुल-पूर्णानगर-कृष्णानगर
मतदान केंद्रांच्या ठिकाणी वाहतूककोंडी
नेवाळेवस्ती, हरगुडेवस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पूर्णानगर, स्वस्त घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर, शिवतेजनगर येथील मतदान केंद्रातदेखील सकाळी मतदारांची गर्दी नव्हती. मतदानप्रक्रिया अगदी शांततेत पार पडत होती. बूथवरील कर्मचारी मतदारांना येईल तसे यादीतील नावे शोधून देत होते. परिसरात दिवसभर नागरिकांचा ओघ राहिल्याने फार मोठ्या रांगा लागल्याची स्थिती पहावयास मिळाली नाही. परिसरातील रस्ते खूप अरुंद असल्याने मतदान केंद्राच्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. तसेच रस्ते खराब असल्याने वाहने चालविणे अवघड होत होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर वाहनातून नेण्यास अडचण येत होती.
प्रभाग 12: तळवडे - त्रिवेणीनगर-रुपीनगर
मतदार याद्यांतील घोळामुळे मतदारांची नाराजी
तळवडे गावठाण, एमआयडीसी, आयटी पार्क, ज्योतिबा मंदिर परिसर, सहयोगनगर, रूपीनगर, त्रिवेणीनगर परिसर, म्हेत्रेवस्ती भाग, ताम्हाणे वस्ती आदी भागातदेखील सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाला मतदारांचा थंड प्रतिसाद होता. काही मतदान केंद्रांवरील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे चित्र समोर आले. उमेदवारांनी यांनी येथील विविध मतदान केंद्रांवर जावून मतदान केंद्राबाहेर असलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत परिस्थितीचा आढावा घेतला व मधील स्थितीचा मतदान केंद्रावर फिरून अंदाज बांधला. दुपारनंतर मतदानासाठी महिलांची गर्दी वाढत होती. मात्र, उन्हाचा चटकाही वाढत होता. याभागात देखील अरुंद रस्ते असल्याने वाहतूककोंडी होत होती.
प्रभाग 13: निगडी गावठाण - यमुनानगर
चिन्हासमोरील बटन प्रेस होत नसल्याने गोंधळ
निगडी गावठाण, सेक्टर 22, ओटास्कीम, यमुनानगर, माता अमृतानंदमयी मठ परिसर, श्रीकृष्ण मंदिर परिसर, साईनाथनगर आदी ठिकाणीदेखील मतदानास नागरिकांचा थंड प्रतिसाद होता. प्रभागातील मतदान केंद्र 40 याठिकाणी मशीन बंद पडल्याने एक तास मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. मनसेचे उमदेवार सचिन चिखले आणि त्यांच्या पत्नी अश्विनी चिखले यांच्या चिन्हाचे बटन प्रेस होत नव्हते. त्यामुळे या केंद्रावर गोंधळ झाला. दुपारी साडेतीनपर्यंत फक्त 28.86 टक्केच मतदान झाले. काही ठिकाणी मोबाईल ठेवण्यासाठी टोकन सिस्टीम दिली होती. मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल ठेवण्यासाठी यंत्रणा नव्हती. त्यामुळे एकटे येणाऱ्या मतदारांची गैरसोय होत होती.
प्रभाग14: आकुर्डी गावठाण -चिंचवड स्टेशन - मोहननगर
मतदार याद्यांत नाव नसल्याने अनेकांचा भमनिरास
मतदारांच्या नावाचा गोंधळ, मतदान कार्ड असूनही मतदान करण्याचा अधिकार न मिळाल्याने अनेक मतदारांचा भमनिरास झाला. घरापासून लांबच्या अंतरावर केंद्र मिळाल्याने मतदारांमध्ये नाराजी होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने 100 मीटर अंतरावर गाडी पार्क करण्याचे सांगीतले असतानादेखील काही मतदारांनी हुज्जत घालण्याचा प्रकार केला. मतदारांच्या मदतीसाठी उपस्थित असलेल्या बीएलओ यांनी सहकार्य केल्याने शेवटच्या काही मिनिटांमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता आले. मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच ज्येष्ठांना घेऊन जाण्यासाठी सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. आकुर्डी येथील बिना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये व्हीलचेअरची सोय असल्याने दिव्यांग मतदारांची सोय झाली.
प्रभाग 15: निगडी प्राधिकरण - आकुर्डी गावठाण
दीड तास ईव्हीएम बंदमुळे मतदार नाराज
सकाळी वातावरणात गारवा असल्याने मतदान केंद्रांवर कमी गर्दी होती. सकाळी अकरानंतर मतदारांची लगबग वाढली. पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ज्ञानप्रबोधिनी शाळेतील इव्हीएम मशीन बंद पडले होते. सलग दीड तास मशीन बंद असल्याने मतदारांना त्रास सहन करावा लागला. मतदान झाल्यावर कामावर जाण्याचा बेत करून घराबाहेर पडलेल्या मतदारांना मतदान केंद्रावर विलंब झाल्याने रजा टाकावी लागली, तर काहींना कामावर जायला उशीर झाल्याने मतदान करण्याचे टाळल्याचे दिसून आले.अनेकांनी प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला. काही मतदार तसेच उमेदवारांनीदेखील आपले मोबाइल मतदान केंद्राच्या आत खोलीमध्ये आणल्यामुळे पोलिसांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला.
प्रभाग - 16 ः रावेत-किवळे-मामुर्डी
सेल्फी घेण्याचा उत्साह
प्रभाग क्रमांक सोळामधील रावेत, वाल्हेकरवाडी, गुरूद्वारा, ननोहोम आदी उच्चभू परिसरातील मतदान केंद्रावर अतिशय शिस्तीत मतदान झाले. मतदारांना बसण्यासाठी उत्तम सोय असल्याने गर्दी असूनदेखील मतदारराजांना याचा त्रास जाणवला नाही. प्रभागातील डी. वाय. पाटील ज्ञानशांती शाळा तसेच महाविद्यालय परिसरात मतदारांसाठी सेल्फी पाइंटची सोय करण्यात आली होती. मतदान केंद्राबाहेरील या सेल्फि पाइंटसमोर कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणात सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. प्रभागातील नॅनो होम सोसायटीमधील अनेकांचे मतदान राहत्या घरापासून लांब आल्यामुळे त्यांना नाहक हेलपाटा मारावा लागल्याच्या तक्रारी मतदान केंद्रावर केल्याचे दिसून आले.
प्रभाग - 17 ः दळवीनगर-वाल्हेकरवाडी- बिजलीनगर
ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ
या प्रभागातील वाल्हेकरवाडी वगळता इतर ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदान सुरळीत पार पडले. वाल्हेकरवाडी परिसरातील वाल्हेकरवाडी प्राथमिक शाळेत सकाळी मशीन बंद पडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही वेळानंतर मशीन सुरू होऊन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. परंतु, सायंकाळच्या वेळी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राच्या परिसरात मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविल्ल्याने सामान्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. एका मतदाराच्या नावाने दुसऱ्यानेच मतदान केल्याच्या घटनेने मोठा प्रसंग या मतदान केंद्रावर उद्भवला होता. उशिर होत असल्याने रांगा सायंकाळपर्यंत लागलेल्या दिसून आल्या.
प्रभाग - 18 ः चिंचवडगाव - तानाजीनगर
ज्येष्ठांची झाली गैरसोय
या प्रभागातील यशोपूरम सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांना चिंचवडमधील क्रांतिवीर चापेेकर विद्यालयामध्ये केंद्र आले. त्यामुळे ज्येेष्ठांना हेलपाटा माराव्या लागल्या. या विद्यालयात केंद्रापर्यंत जाताना मार्ग अवघड असल्याने जेष्ठांना चालताना मोठा त्रास सहन करावा लागला. तसेच दिव्यांगांच्या व्हीलचेअरदेखील या मार्गातून जाताना अडचणी येत होत्या. मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याच्या तक्रारीदेखील मतदारांनी अनेक दैेनिकांच्या बातमीदारांकडे केल्या. सायंकाळच्या वेळी मतदारांची गर्दी वाढल्याने केशवनगर शाळेत मोठ मोठ्या रांगा निर्माण झाल्या होत्या. त्या वेळी मतदारांमध्ये बाचाबाची झाल्याच्या घटना घडल्या होत्या.
प्रभाग - 19 ः आनंदनगर-भाटनगर
ईव्हीएम मशिनमध्ये अनुक्रम चुकल्याने गोंधळ
या प्रभागातील गोलांडे शाळेत सायंकाळच्या वेळी बोगस मतदान झाल्याने खळबळ उडाल्याने गोंधळाची परिस्थिती उद्भवली होती. तसेच गावडे पेट्रोलपंपमागील खासगी शाळेतील मशीन सकाळी दोन तास बंद असल्यामुळे मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. प्रभाग एकोणवीसमधील एम्पायर इस्टेट पूल परिसरातील आर्चिड स्कूलमध्ये इव्हीएम मशीनमध्ये उमेदवारांची (पक्षाची) सीरिज उलटी लावण्यात आल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडाला होता. उमेदवारांना याची माहिती कळताच त्यांनी मतदान केंद्रामध्ये जावून त्याबाबत विचारणा केली. त्यानंतर योग्य पध्दतीने सीरिज लावण्यात आल्यावर मतदानाला सुरुवात झाली होती.
प्रभाग - 20 ः संत तुकारामनगर - कासारवाडी- विशाल थिएटर
मतदान स्लिपा घेण्यासाठी धांदल
या प्रभागात राष्ट्रवादी काँग््रेासचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या पॅनेल विरोधात भाजपाचे पॅनेल अशी सरळ लढत आहे. येथे राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन उमेदवार एक उमेदवार विरोधात आहे. येथील मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी दिसून आली. विविध उमेदवारांच्या बूथवरून स्लिपा घेण्यास नागरिकांची धांदल उडाली होती. संमिश्र मतदार असलेल्या या प्रभागात सकाळी साडेसातला संथ गतीने मतदारास सुरुवात झाली. दुपारी दीडपर्यंत केवळ 25.22 टक्के मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत एकूण 17 हजार 654 मतदारांनी मतदान झाले. ते प्रमाण 38.44 टक्के होते.
प्रभाग - 21 ः पिंपरीगाव-मिलिंदनगर - पिंपरी कॅम्प
पिंपरीगावात मतदानाचा उत्साह
प्रभाग क्रमांक 21 अंतर्गत पिंपरी गाव, मिलिंदनगर आणि पिंपरी कॅम्प परिसरात मतदानाच्या दिवशी उत्साहपूर्ण वातावरण होते. आर्य विद्या मंदिर स्कूल व ज्युनियर कॉलेज, पिंपरी येथे सकाळपासूनच मतदारांची ये-जा सुरू होती. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक, गृहिणी आणि स्थानिक रहिवासी मतदानासाठी पुढे आले. त्यामुळे सकाळच्या सत्रातही केंद्रावर वर्दळ जाणवत होती. दुपारनंतर नोकरदार, युवक आणि नवमतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवक-युवतींमध्ये विशेष उत्साह दिसून आला. अनेकजण नीटस पोशाखात मतदानासाठी आले होते. मतदानानंतर ’मी मतदान केले’ अशी भावना व्यक्त करत काहींनी सेल्फी काढत हा क्षण जपला.
प्रभाग - 22 ः काळेवाडी-विजयनगर
मतदान स्लिपा न मिळाल्याने मतदारांना त्रास
मतदानाची स्लिप मिळत नसल्याने प्रभागातील काळेवाडीमधील बऱ्याच शाळांमध्ये मतदारांना त्रास सहन करावा लागला. स्लिपा काढल्यानंतर रांगांमध्ये तासभर उभे राहावे लागत असल्याचा वाइट अनुभव बीटी स्कूलमधील केंद्रावर मतदारांना आला. सकाळी गारवा असल्याने मतदारांची गर्दी कमी होती. मात्र दुपारनंतर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. मागील निवडणूकांमध्ये मतदारांची गर्दी कमी होती. परंतु यावेळी मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान केल्याची चर्चा मतदारांमध्ये दिसून आली. सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन पर्यंत 42 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली.
प्रभाग - 23 ः थेरगाव गावठाण-पवारनगर
थेरगाव गावठाणात सहकुटुंब मतदानाची परंपरा
प्रभाग क्रमांक 23 मधील थेरगाव गावठाण आणि पवारनगर परिसरात मतदानाच्या दिवशी कौटुंबिक वातावरण अनुभवायला मिळाले. यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा, थेरगाव येथे सकाळीच नागरिकांनी मतदानासाठी हजेरी लावली. अनेक कुटुंबे एकत्र येत मतदान करताना दिसली. ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात होता. महिलांनीही मतदानासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र होते. दुपारनंतर युवक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग मतदानासाठी बाहेर पडला. नवमतदारांचा आत्मविश्वास आणि जागरूकता केंद्रावर जाणवत होती. मतदानानंतर अनेक नागरिकांनी परिसरातील हॉटेल्समध्ये एकत्र येत चहा कॉफीचा आनंद घेतला.
प्रभाग - 24 ः थेरगाव- गुजरनगर - बेलठिकानगर
गुजरनगरमध्ये दुपारनंतर मतदानाला वेग
प्रभाग क्रमांक 24 अंतर्गत थेरगाव, गुजरनगर आणि बेलठीकानगर परिसरात मतदानाची सुरुवात तुलनेने संथ झाली. लक्ष्मीबाई धाईंजे विद्यालय, गुजरनगर येथे सकाळी मोजकेच मतदार दिसत होते. मात्र दुपारनंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. कामावरून मोकळे झालेले नोकरदार, व्यापारी आणि युवक मतदानासाठी केंद्रांकडे वळले. त्यामुळे रांगा लागल्या आणि वातावरणात चैतन्य निर्माण झाले. नवमतदारांचा उत्साह लक्षवेधी होता. अनेक युवकांनी मतदानाचा अनुभव मोबाईलमध्ये टिपत आनंद व्यक्त केला. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी सक्रिय झाले. फोन कॉल्स, प्रत्यक्ष भेटी आणि वाहनांची व्यवस्था यामुळे मतदानाचा वेग वाढला होता.
प्रभाग - 25 ः वाकड-ताथवडे-पुनावळे
मतदानासाठी गर्दी
माजी गटनेते राहुल कलाटे यांचा भाजपाचा पॅनल विरुद्ध माजी नगरसेवक मयूर कलाटे यांचे राष्ट्रवादी काँग््रेासचे पॅनल अशी थेट लढत या प्रभागात आहे. प्रभागात ताथवडे, माळवाडी, पुनावळे, पंढारे वस्ती, काटेवस्ती, नवले वस्ती, ताथवडे, अशोकाकनगर, निंबाळकरगनर, भूमकरवस्ती, वाकड, काळा खडक, मुंजोबानगर, मानेवस्ती, भुजबळ वस्ती, वाकडकर वस्तीचा समावेश आहे. उच्चभ्रू व सुशिक्षित, आयटीयन्स, मध्यमवर्गीय, स्थानिक, सर्वसामान्य, कामगार असा संमिश्र असा मतदार या प्रभागात आहे. वाकडमधील महापालिका शाळा, गुड सॅमरीटन स्कूल, एसएनबीपी स्कूल, संस्कृती स्कूल, भूमकरवस्तीतील आबाजी भूमकर शाळा येथील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती.
प्रभाग - 26 ः पिंपळे निलख - कस्पटेवस्ती, वेणूनगर
उत्साही कार्यकर्त्यांमुळे गोंधळ
माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांचे भाजपाचे पॅनल विरोधात राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांचे पॅनल असा सामना या प्रभागात दिसत आहे. तसेच, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे रिंगणात आहेत. केंद्र परिसरात मोठी गर्दी झाली होती. मतदानास सकाळी संथपणे सुरूवात झाली. सकाळी 9.30 पर्यंत 17.76 टक्के मतदान झाले. त्यानंतर दोन तासात हे प्रमाण 29.93 टक्क्यांवर पोहचले. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला. दुपारी 3.30 पर्यंत एकूण 41.62 टक्के इतके समाधानकारक मतदान झाले. एकूण 27 हजार 254 मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. काही केंद्रांवर मतदारांचा रांगा पाहण्यास मिळाल्या.
प्रभाग - 27 ः रहाटणी - तापकीरनगर -श्रीनगर
रहाटणीत मतदारांचा जोश, उत्साह
प्रभाग क्रमांक 27 मधील रहाटणी, तापकीर नगर आणि श्रीनगर परिसरात मतदानाच्या दिवशी संमिश्र मतदारांचा जोश ठळकपणे जाणवत होता. बेबीज इंग्लिश हायस्कूल, रहाटणी येथे सकाळपासूनच युवक-युवतींची चांगली उपस्थिती दिसून आली. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. हसतमुख चेहरे आणि मतदानानंतर घेतलेले सेल्फी हे या प्रभागाचे वैशिष्ट्य ठरले. महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता. दुपारनंतर सहकुटुंब मतदानासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली. कार्यकर्त्यांची धावपळही येथे जाणवत होती. एकूणच प्रभाग 27 मध्ये मतदान हा केवळ हक्क न राहता उत्सव म्हणून साजरा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
प्रभाग - 28 ः पिंपळे सौदागर
मतदारांचा ओघ कायम
भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या भाजपाचे पॅनल विरोधात माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे राष्ट्रवादी काँग््रेासचे पॅनल असा सरळ मुकाबला या प्रभागात पाहण्यास मिळत आहे. या प्रभागात फाईव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लनेट मिलेनीयम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, गोविंद गार्डन, रहाटणी या भागांचा समावेश आहे. विकसित असलेला हा परिसर आहे. टोलेजंग इमारती व हाऊसिंग सोसायटीतील उच्चभ्रू, सुशिक्षित व आयटीन्स मतदार येथे आहेत. प्रभागात पिंपळे सौदागर येथील न्यू सिटी प्राईड, अण्णाासाहेब मगर शाळा, राजवीर पॅलेस व सिद्धीविनायक जिंजर सोसायटी, रहाटणी येथील न्यू सिटी प्राईड स्कूल, फाईव्ही गार्डन सोसायटी येथील मतदान केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती.
प्रभाग - 29 ः पिंपळे गुरव - वैदूवस्ती-सुदर्शननगर
काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वाद
माजी महापौर शकुंतला धराडे यांचे भाजपाचे पॅनल आणि माजी नगरसेवक राजू लोखंडे यांचे राष्ट्रवादी काँग््रेासचे पॅनलमध्ये सामना रंगला आहे. या प्रभागात कल्पतरु इस्टेट, क्रांतीनगर, काशिद पार्क, गगनगिरी पार्क, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, ओंकार कॉलनी, गोकुळनगरी, भालेकरनगर, पिंपळे गुरव, राजमाता जिजाऊ उद्यान (डायनासोर पार्क), सुदर्शननगर या भागांचा समावेश आहे. हाऊसिंग सोसायट्या, रो हाऊस, बैठी घरे असे संमिश्र वर्गाचा समावेश आहे.कल्पतरू सोसायटी येथील उमेदवारांचे शिक्षण, गुन्हे व मालमत्ता आदींची माहिती देणारा फलक उलटा लावण्यात आला होता. तो फलक फाडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.
प्रभाग - 30 ः दापोडी - फुगेवाडी- कासारवाडी
दुपारनंतर मतदारांत उत्साह
राष्ट्रवादी काँग््रेासचे माजी नगरसेवक रोहित काटे याचे पॅनेल विरोधात भाजपाचे माजी नगरसेवक संजय काटे यांचे पॅनल असा सामना या प्रभागात आहे. तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग््रेास, वंचित बहुजन आघाडी व आपचे उमेदवार रिंगणात आहेत. कासारवाडी भाग, शंकरवाडी भाग, सरिता संगम सोसायटी, शास्त्रीनगर, केशवनगर, कुंदननगर भाग, फुगेवाडी, संजयनगर, दापोडी, सिद्धार्थनगर, गणेशनगर, सुंदरबाग कॉलनी, एसटी वर्कशॉपचा समावेश असलेला हा प्रभाग आहे. दापोडीत सर्वांधिक झोपडपट्ट्या आहेत. दापोडीतील भगतसिंग स्कूल, स्वामी विवेकानंद शाळा, गणेश स्कूल, या केंद्रांवर मतदारांनी मोठी गर्दी केली होती.
प्रभाग - 31 ः नवी सांगवी - कवडेनगर
नवी सांगवीत मतदारांची गर्दी
भाजपाचे माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांच्या पॅनलसमोर राष्ट्रवादी काँग््रेासचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचे पॅनल अशी सरळ लढत येथे पाहायला मिळाली. या प्रभागात नवी सांगवी व पिंपळे गुरवमधील राजीव गांधीनगर, गजानन महाराज नगर, कीर्तीनगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, गांगार्डनगर भाग, विद्यानगर, उरो रुग्णालय आदी भागाचा समावेश आहे. पिंपळे गुरव येथील मार इव्हानियस स्कूल, काशी विश्वेश्वर स्कूल, काळूराम जगताप जलतरण तलाव, निळू फूले नाट्यगृह, नवी सांगवीतील यशवंत टण्णू स्कूल, बाबूरावजी घोलप विद्यालय, होली मिशन स्कूल येथील मतदान केंद्रांत मोठी गर्दी झाली होती.
प्रभाग - 32 ः सांगवी
मतदानास संथगतीने सुरुवात
भाजपाच्या माजी महापौर उषा ढोरे यांचे भाजपाचे पॅनल विरुद्ध माजी नगरसेवक अतुल शितोळे यांचे राष्ट्रवादी काँग््रेासचे पॅनल असा थेट सामना आहे. प्रभागात सांगवी गावठाण, कुंभार वाडा, गंगानगर, आनंदनगर, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, पवारनगर, शिंदेनगर, मुळानगर, लक्ष्मीनगर, चंद्रमणीनगर, जयमालानगर, उष:काल सोसायटी, पवनानगर, संगमनगर, प्रियदर्शनीनगर, एसटी कॉलनी, ममतानगर या भागांचा समावेश आहे. प्रभागासाठी सांगवी येथील नरसिंह हायस्कूल, अहिल्यादेवी होळकर शाळा, शकुंतलाबाई शितोळे शाळा, नवी सांगवीतील न्यू मिलेनियम स्कूल, मास्टर माईंड स्कूल येथे मतदान झाले. नरसिंह, होळकर व शितोळे आणि न्यू मिलिनियम स्कूलमध्ये सर्वांधिक केंद्र असल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती.