पिंपरी: मुर्ती खरेदीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा काढून राष्ट्रवादीला महापालिकेतील सत्तेतून खाली खेचलेल्या भाजपावर आता राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराचे अस्त्र उगारले आहे. राज्यामध्ये सत्तेत वाटेकरी असूनही अजितदादांनी उगारलेल्या या अस्त्रामुळे भाजपा सतर्क झालेली दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीतही भ्रष्टाचाराचे हे अस्त्र निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
फेब्रुवारी 2017 च्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपाने विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा झाल्याचे आरोप करत शहरभरात अक्षरश: रान पेटविले होते. तो आरोप जनतेला भावला. पांडुरंगाच्या मूर्तीतही घोटाळा करून, पैसे लाटले जात असल्याने नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामकाजावर संताप व्यक्त करीत भाजपाला पहिली पसंती दिली. भाजपाने राष्ट्रवादीच्या ताब्यातील महापालिकेवर कब्जा मिळवत महापालिका इतिहासात पहिल्यांदा सत्ता मिळविली. पुढे तो आरोप फुसका ठरला. त्यात कोणताही घोटाळा झाल्या नसल्याचे महापालिका आयुक्तांनी चौकशीनंतर जाहीर केले.
यंदाच्या निवडणुकीत हातातून निसटलेली महापालिकेची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली आहे. फेब्रुवारी 2017 पासून 2025 या नऊ वर्षात भाजपाने महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराचे अस्त्र अजितदादांनी उगारले आहे. तळवडे व चिखली येथील प्रचार सभेत त्यांनी भाजपावर भ्रष्टाचाराची तोफ डागली. पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत तर, भाजपाच्या कारभाराचे वाभाडे काढत, टक्केवारीसाठी माजलेल्या राक्षसाचा दाखला देत त्यांनी भाजपावर घणाघात केला. भ्रष्टाचारी कारभाराला लगाम लावण्यासाठी राष्ट्रवादीला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. शहरासाठी कोणत्या विकास योजना राबवणार, याचे घोषणापत्र ते लवकरच जाहीर करणार आहेत.
अजित पवार यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपास त्यांच्या काळात महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराचे दाखले देऊन प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यास चित्र वेगळे असेल, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. तर, पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादांच्या आरोपाबाबत बोलणे टाळले. यंदाच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजणार आहे. महापालिकेसह स्मार्ट सिटीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्दावरुन निवडणूक फिरेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही भ्रष्टाचाराचा मुद्दा निर्णायक ठरणार आहे.
भाजपाच्या गुप्त बैठका
अजित पवार यांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. त्याचा कसा सामना करायचा, त्याला सामोरे कसे जायचे, त्यावर चर्चा करण्यासाठी भाजपाच्या गुप्त बैठका सुरू आहेत. आरोपांना कसे उत्तर द्यायचे. कोणते मुद्दे टाळायचे. त्या मुद्द्यावर कोणते पदाधिकारी उत्तर देणार, याबाबतची रणनिती ठरविण्यात आली असल्याचे समजते.
उपऱ्यांना घेऊन काय फायदा?
निवडणुकीच्या तोंड्यावर भाजपाने घाऊक पद्धतीने इतर पक्षांतील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेतले आहेत. ‘शत-प्रतिशत भाजपा’चा आत्मविश्वास बाळगत भाजपाने विरोधकांना प्रवेश दिला. भाजपाची ताकद वाढली असली तरी, गेल्या काही दिवसात त्याला छेद मिळाला आहे. निष्ठावंतांना डावलून आयारामांना संधी दिल्याने अंतर्गत खदखद उफाळून येत आहे. राष्ट्रवादीच्या आक्रमक भूमिकेसमोर भाजपा बचावात्मक भूमिकेत आहे. त्यावरून उपऱ्यांना घेऊन काय फायदा झाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला दादांचे बळ
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर तसेच, महापालिका कर्जबाजारी झाली, या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही स्थानिक पदाधिकारी बोलत नाही. त्यांनी मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका घेतली आहे, त्यावर मी बोलत आहे. ते ही पुराव्यानिशी, असे सांगत अजित पवारांनी भाजपा विरुद्ध शड्डू ठोकला आहे. संधी मिळेल तेथे अजित पवार भाजपाला घेरत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडणुकीत बळ मिळाले आहे.
पवारांच्या प्रश्नांसमोर भाजपा निरुत्तर
अजितदादांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काही मुद्दे काढले. निवडणुकीत फेक नरेटिव्ह पसरविण्यासाठी काही खासगी संस्था सल्ला देतात. एजन्सीने लिहून दिलेल्या स्क्रिप्टचे ते वाचन करतात. त्यात अजित पवारांची नाही तर, त्या एजन्सीची चूक आहे. निवडणुकीमध्ये त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पवारांचे सर्व आरोप खोटे आहेत. आम्ही खाणार नाही, कोणाला खाऊ देणार नाही. महापालिकेत पारदर्शक कारभार होईल, असे चव्हाणांनी वक्तव्य केले. यातून त्यांनी पवारांच्या आरोपांना थेट उत्तर देण्याऐवजी सारवासारव केल्याचे दिसून आले; मात्र अजितदादांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजपाकडे काही उत्तर नसल्याबाबतची चर्चा राजकीय वर्तृळात रंगली आहे.
उमेदवारांनी तापवला भ्रष्टाचाराचा मुद्दा
अजित पवारांनी भाजपाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत भ्रष्टाचाराचा मुद्दा सर्वोच्च स्थानी ठेवला आहे. भ्रष्टाचाराचा तो मुद्दा घेऊन उमेदवार प्रभागात प्रचार करत आहेत. भाजपाने महापालिका कशी लुटून खाल्ली, असा प्रचार राष्ट्रवादीकडून केला जात आहे. तर, भाजपाकडून त्याला प्रत्युत्तर देत, शहराचा विकास कसा केला हे मतदारांवर बिंबवले जात आहे. उमेदवारांकडून सोशल मीडियावर अजितदादांचे क्लिप व्हायरल केले जात आहेत. येनकेन प्रकारे दोन्ही पक्ष एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.