

वडगाव मावळ : मानवी सेवनाकरिता अपायकारक प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्री, साठा व उत्पादन केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात टाकवे बुद्रुक येथील सोएक्स इंडिया कंपनीच्या मॅनेजरसह दोन संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, कंपनी मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. सुमारे 31 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी सोएक्स इंडिया कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुमार चौहान यांच्यासह संचालक असिफ फाजलानी व फैजल फाजलानी यांच्यावर वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे विभाग अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी टोणपे यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान आरोपी अनिल चौहान याला अटक करण्यात आली असून, वडगाव न्यायालयाने त्यास 8 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजी ठाणे जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने दापोडे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे केलेल्या कारवाईत 19 कोटी, 45 लाख 76 हजार 320 रुपयांचा अवैध साठा जप्त केला होता. याप्रकरणी नारापोली पोलिस ठाणे, ठाणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी जप्त केलेला साठा हा टाकवे बुद्रुक येथील सोएक्स इंडिया कंपनीत उत्पादित करून दापोडे येथे विक्री करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानुसार पुणे विभाग अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने 2 जानेवारीला सोएक्स इंडिया कंपनीमध्ये छापा टाकला असता त्याठिकाणी सुगंधी तपकीर, ओलसर तंबाखू सदृश पेस्ट अशा प्रकारचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा व त्यासाठी लागणारा कच्चा माल असा सुमारे 31 कोटी 67 लाख 21 हजार 987 रुपयांचा अवैध साठा मिळून आला असून कंपनीचा व्यवस्थापक अनिल चौहान यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नववर्षाच्या सुरुवातीलाच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने मावळ तालुक्यात झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.