पिंपरी: महापालिका निवडणूक प्रचारासाठी अजून सात दिवस शिल्लक असून, सर्व उमेदवार पायाला भिंगरी लाऊन आपला प्रचार करण्यात व्यग्र झाले आहेत. उमेदवारांना दिवसरात्र फिरावे लागत आहे; परंतु गेल्या नऊ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने प्रभागाचा वाढलेला परिसर, चाळीच्या जागी झालेल्या टोलेजंग इमारती, सोसायट्यांचे अधिक प्रमाण त्यामुळे उमेदवारांची प्रभागात फिरुन पुरती दमछाक होऊ लागली आहे. परिणामी, दिवसभरातील प्रचारामुळे ताप येणे, पाय आणि अंग दुखणे, डोकेदुखी याचबरोबर साथीचे आजार बळावल्याने उमेदवार चांगलेच त्रासले आहेत.
महापालिका निवडणुकीचे वातावरण तापले आहे. त्यामुळे भाजपाला थेट राष्ट्रवादी पक्षाचे आव्हान असणार आहे. दरम्यान, प्रभागातील बदललेला भाग, वाढलेला परिसर उमेदवारांपुढे तेथपर्यंत पोचणे अवघड झाले आहे. त्याच प्रमाणे प्रभागातील अनेक मतदार हे इतरत्र स्थायिक झाले आहेत.अवघे नऊ दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांना प्रत्येक घरापर्यंत जाणे काहीसे कठीण आहे. मोठ्या सोसायट्या, टोलेजंग इमारती आणि अनेक जुन्या इमारतींची पुनर्बांधणी झाल्याने प्रभागात नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दिवसाकाठी या उमेदवारांना किमान काही हजार मतदारांपर्यंत पोचावे लागत आहे. दरम्यान, सकाळपासून ते रात्री उशिरापर्यत प्रभागात फिरल्याने उमेदवार आताच काहीसे वैतागल्याचे दिसून आले. त्यामुळे पाय, अंग दुखणे अथवा डोकेदुखीमुळे त्रस्त झाले आहेत. अनेक उमेदवारांना चालण्याची सवय नाही. पण, मतदारापर्यंत जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने त्यांना प्रभागात काही ठिकाणी चालत फिरावे लागत आहे.
रात्री थंडी, दिवसा उन्हाळा
बदलत्या हवामानामुळे शहरात रात्री थंडी जाणवते. तर, सकाळी आणि दिवसा उन्हाचा तडाखा बसतो. त्यामुळे या बदलत्या वातावरणाचा उमेदवारांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे खोकला, सर्दी, ताप येणे असे साथीचे आजार बळावले आहेत. त्यामुळे अनेकांनी यातून मार्ग काढत दुपारचा आराम करण्याचे ठरवले; परंतु अखेर वेळ कमी असल्याने दुपारीदेखील उमेदवारांना बाहेर पडून मतदारांपर्यंत पोचावे लागत आहे.
पॅनलमध्ये एकत्र, पण धास्ती कायम
शहरात पॅनलमधून प्रचार करण्यासाठी सर्वच पक्षाकडून सांगण्यात येते; मात्र पॅनलमध्ये एकत्र फिरवूनदेखील काही ठिकाणी उमेदवारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे पॅनलबरोबरच अनेक उमेदवार वैयक्तिक प्रचारावर भर देताना दिसून येतात. त्यामुळे आपल्या प्रभागात ते सकाळीच लवकर एकटे फिरत असल्याचे दिसून येत आहेत.
कार्यकर्ते जमविण्यासाठी दमछाक
निवडणुकीच्या काळामध्ये अनेक पक्षातील उमेदवार इकडून तिकडे म्हणजेच पक्ष बदल केले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. अनेकजण प्रत्यक्ष प्रचारापासून लांब आहेत. त्यामुळे पेड कार्यकर्ते जमविण्यासाठी उमेदवारांना चांगलीच धावपळ करावी लागत आहे.