किरण जोशी
पिंपरी :
भ्रष्टाचाराच्या आरोपांना विकासाच्या मुद्याने प्रत्युत्तर देत भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केल्याने राज्याचे लक्ष लागले होते. या हायव्होल्टेज लढतीत भाजपने ८४ जागांसह जोरदार मुसंडी मारली. पवारांना थेट अंगावर घेणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे हे या विजयाचे शिल्पकार ठरले.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता भाजपने २०१७ मध्ये खेचून आणली होती. महापालिकेतील कथित मूर्ती घोटाळ्यावरून आरोपांची राळ उठवत भाजपने अजित पवारांच्या गडाला भगदाड पाडले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनीच या लढतीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर लोकसभेत पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेऊन पुन्हा महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी अजित पवारांनी या निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावली होती.
पुढारी | लक्षवेधी
गेल्या नऊ वर्षांत भ्रष्टाचार आणि दहशत वाढल्याचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांनी पिंपरीत तळ ठोकला. आमदार महेश लांडगे यांना लक्ष्य करत भोसरीसह शहरभर सभा घेतल्या. पवार आणि लांडगे यांच्यातील शाब्दिक युद्ध राज्यभर चर्चेचा विषय ठरले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही पवारांच्या या भूमिकेवरून नाके मुरडली. मात्र, महेश लांडगे यांनी पवारांचे आव्हान स्वीकारून थेट बंड पुकारल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली.
“शहराचा कारभार माझ्या हातात द्या, येथील दादागिरी मोडून काढतो आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करून दाखवतो,” अशी साद घालत अजित पवारांनी पिंपरीकरांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, “बारामतीतून तुम्ही काय विकास करणार?” असा सवाल करून स्थानिकांच्या स्वाभिमानाला हात घातल्याचा पलटवार आमदार लांडगे यांनी केला. या राजकीय संघर्षाकडे मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, केवळ एक सभा आणि विजय रॅली काढून मुख्यमंत्र्यांनी विकासाचा नारा दिला. “टीकेवर टीका न करता विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत आहोत,” असे स्पष्ट करत त्यांनी विकासालाच पिंपरीकरांनी कौल दिल्याचे अधोरेखित झाले.
या हायव्होल्टेज निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच इतकी अटीतटीची लढत झाली की इतर पक्ष चर्चेतूनच गायब झाले. शिवसेना (उबाठा) गटाने ४८, काँग्रेसने ५५ तर मनसेने एक जागा लढवली; मात्र भाजप–राष्ट्रवादीच्या टोकाच्या संघर्षात या तिन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. गतवेळी एका जागेवर विजय मिळवलेल्या काँग्रेसलाही यावेळी खाते उघडता आले नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनाही एकही जागा मिळाली नाही.
गेल्या काही वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांच्यात सुप्त राजकीय संघर्ष सुरू होता. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने हा संघर्ष उफाळून आला. पवारांनी थेट लांडगेंवर आरोपांची फैरी झाडल्यानंतर लांडगेंनीही एकेरी भाषेत प्रत्युत्तर देत पवारांना अंगावर घेतले. त्यामुळे ही निवडणूक अधिकच प्रतिष्ठेची ठरली. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावर भाष्य टाळले, ज्यामुळे लांडगेंसमोर मोठे आव्हान उभे राहिले. भोसरीच्या मैदानातच विजय सभा घेण्याचा दावा पवारांनी केला होता; मात्र त्याच भोसरी विधानसभा मतदारसंघातील ४८ पैकी ३५ जागा जिंकून लांडगेंनी “शहरात मीच दादा” असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांची शायरी ठरली खरी!
पवार आणि लांडगे यांच्यातील शाब्दिक युद्धात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून पवारांना चिमटा काढला होता —
“परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन,
ये फैले हुए उनके पर बोलते हैं;
वही लोग रहते हैं खामोश अक्सर,
ज़माने में जिनके हुनर बोलते हैं!”
“हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता,
कहीं सपने घमंड और गलत दिशा में टूट जाते हैं;
हुनर की बातें करने से कुछ नहीं होता,
ज़माना उसी को पहचानता है, उतर के साबित करे!”
दुसऱ्याच दिवशी झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी,
“क्यूँ पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में!”
असा थेट इशारा देत शेरोशायरीच्या जुगलबंदीला पूर्णविराम दिला. अखेर मुख्यमंत्र्यांची हीच शायरी खरी ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले.