Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Young Corporators: पिंपरी-चिंचवड महापालिकेत तरुण नगरसेवकांचा दबदबा

21 ते 49 वयोगटातील 68.75 टक्के सदस्य; नव्या सभागृहाकडून शहराला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंंचवड महापालिकेच्या यंदाच्या नव्या सभागृहात तरुण नगरसेवकांचा भरणा सर्वांधिक आहे. 21 ते 39 वयोगटांचे 37 तर, 40 ते 49 वयोगटांचे 51 नगरसेवक आहेत. ते प्रमाण 68.75 टक्के इतके आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिलेदार 23 ते 25 वयोगटातील आहेत. राष्ट्रवादीच्या प्रतीक्षा लांघी जवळकर आणि दिप्ती कांबळे या सर्वांत तरुण नगरसेविका आहेत. तर, राष्ट्रवादीचेच यश साने आणि सिद्धार्थ बनसोडे हे सर्वांत तरुण नगरसेवक आहेत.

4 वर्षांनंतर प्रशासकीय राजवट होणार बंद

तब्बल 9 वर्षांच्या खंडानंतर महापालिकेची निवडणूक झाली. निवडणुकीत शहरात सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करताना दिग्गज, अनुभवी, ज्येष्ठांसह तरुण पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली होती. नवनिर्वाचित नगरसेवक तब्बल 4 वर्षांनंतर प्रशासकीय राजवटीत बंद असलेल्या सभागृहात प्रवेश करणार आहेत. निवडणुकीत वर्षे 21 ते 29 वयोगटातील 8 जणांनी यश मिळविले आहे. 30 ते 39 मधील 29 आणि 40 ते 49 वयोगटातील सर्वांधिक 51 नगरसेवक निवडून आले आहेत. 21 ते 49 या वयोगटात 68.75 टक्के नगसेवक आहेत, यामुळे सभागृहात तरुणाईची संख्या मोठी आहे. 50 ते 59 या वयोगटातील 33 नगरसेवक आहेत. साठ वर्षांच्या वरील सात ज्येष्ठ नगरसेवक आहेत.

दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी प्रभाग 30 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतीक्षा लांघी-जवळकर या 23 वर्षांच्या सर्वात तरुण नगरसेविका ठरल्या आहेत. त्या विवाहीत आहेत. नवी सांगवी-कवडेनगर प्रभाग क्रमांक 31 मधील दीप्ती अंबरनाथ कांबळे यांचे वय 24 वर्षे आहे. त्या अविवाहित आहेत. तर, चिखली प्रभाग क्रमांक 1 मध्ये यश दत्ताकाका साने व नेहरुनगर, अजमेरा कॉलनी, खराळवाडी प्रभाग क्रमांक 9 मध्ये सिद्धार्थ अण्णा बनसोडे हे दोघे 25 वर्षांचे तरुणही विजयी झाले आहेत. ते दोघेही अविवाहित आहेत. निवडणुकीत मतदारांनी तरुणांसह ज्येष्ठ अनुभवी नगरसेवकांना पसंती दिली आहे. सभागृहात अनुभवी आणि तरुण अशा दोन्ही पिढ्यांचा समतोल दिसून येतो. 128 नगरसेवकांच्या सभागृहात नगरसेवकांचे सरासरी आयुर्मान 45 वर्षे आहे.

शहराला नवी दिशा मिळण्याची आशा

तरुण आणि नव्या दमाच्या नगरसेवकांकडून शहराला नवी दिशा मिळेल. महापालिकेच्या नव्या सभागृहातून शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तरुण नगरसेवकांकडून आधुनिक दृष्टिकोन, नव्या संकल्पना, गतिमान कामकाजाची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनुभवी नगरसेवकांच्या मार्गदर्शनामुळे निर्णयप्रक्रियेत स्थैर्य येईल. विकासकामे, पायाभूत सुविधा, वाहतूककोंडी, वैद्यकीय सुविधा, पाणीपुरवठा, ड्रेनेजलाईन, नदी सुधार आणि स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष केंद्रित राहील, अशी अपेक्षा आहे. तरुणाईचा उत्साह आणि अनुभवी सदस्यांचा अनुभव यांचा समन्वय साधत महापालिकेचे कामकाज अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. नागरिकांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देणे, पारदर्शक प्रशासन आणि जबाबदार कारभार याकडे नव्या सभागृहाचे लक्ष राहणार आहे.

सभागृहात तिशीच्या आतील आठ नगरसेवक

मागील फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीमध्येही अनेक तरुण नगरसेवकांना संधी मिळाली होती; परंतु त्यातील अनेकांनी सभागृहात फारसा प्रभाव टाकला नव्हता. अनेकवेळा चर्चेमध्ये ज्येष्ठ नगरसेवकच जास्त वेळ भाग घेतात. यंदा महापालिका सभागृहात आठ नगरसेवक तिशीच्या आतील आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पक्षांचे नगरसेवक एकत्र येऊन काम करतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT