पिंपरी: होणार होणार असे, केवळ बोलले जात होते; मात्र अखेर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 ला मतदान होत आहे. तब्बल 9 वर्षांनंतर महाापालिकेची निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांसह इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. असे असले तरी, पालिका सभागृहात पूर्वीप्रमाणेच 128 नगरसेवक असणार आहेत. त्यात वाढ झालेली नाही. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम सोमवार (दि. 15) जाहीर केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू झाली आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असून, 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. प्रचारास 3 ते 14 जानेवारी असा केवळ 12 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
महापालिकेची मागील निवडणूक फेब्रुवारी 2017 ला झाली होती. त्यानंतर तब्बल 9 वर्षानंतर यंदा निवडणूक होत आहे. कोरोना महामारी, ओबीसी आरक्षण, न्यायालयाचा निकाल आदी कारणांमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. या सर्व कारणांमुळे चार वर्षांचा कालावधी नगरसेवकांविना गेला. या काळात आयुक्तांनी प्रशासक म्हणून पालिकेचा कारभार पाहिला आहे. अनेक मोठ्या व खर्चिक कामांना प्रशासकीय राजवटीत मान्यता देण्यात आली. अखेर, सोमवार (दि. 15) पालिका निवडणुका घोषित झाल्या आहेत. नऊ वर्षानंतर निवडणुका होत आहेत; मात्र नगरसेवकांच्या जागा पूर्वीप्रमाणेच 128 आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे चार सदस्यीय एकूण 32 प्रभाग आहेत.
राजकीय फ्लेक्स, किऑक्स, झेंडे तात्काळ हटवा
निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत. राजकीय पक्ष तसेच, इच्छुकांचे होर्डिंग, फ्लेक्स, किऑक्स, पोस्टर तसेच, पक्षाचे झेंडे व फलक तात्काळ हटविण्यात यावेत, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तसेच, निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आठ निवडणूक निर्णय अधिकारी
फेब्रुवारी 2017 ला महापालिका निवडणुकीसाठी अकरा निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले होते. यंदा अकराऐवजी आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये असणार आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्याही केल्या आहेत.
1) प्राधिकरण निगडी येथील हेडगेवार भवन येथे प्रभाग क्रमांक 10, 14, 15 आणि 19 साठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.
2) प्रभाग क्रमांक 16, 17, 18 आणि 22 करिता ब क्षेत्रीय कार्यालय, लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.
3) प्रभाग क्रमांक 2, 6, 8 आणि 9 करिता क क्षेत्रीय कार्यालय, हॉकी पॉलिग्रास हॉकी स्टेडियमजवळ, नेहरूनगर येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.
4) प्रभाग क्रमांक 25, 26, 28 आणि 29 करिता ड क्षेत्रीय कार्यालय, बीआरटी रस्ता, रहाटणी येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.
5) प्रभाग क्रमांक 3, 4, 5 आणि 7 करिता कबड्डी प्रशिक्षण संकुल, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मागे, भोसरी येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.
6) प्रभाग क्रमांक 1, 11, 12 आणि 13 करिता चिखली येथील घरकुल प्रकल्पाशेजारील टाउन हॉल येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.
7) प्रभाग क्रमांक 21, 23, 24 आणि 27 साठी ग क्षेत्रीय कार्यालय, वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मागे, थेरगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.
8) प्रभाग क्रमांक 20, 30, 31 आणि 32 करिता सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावरील बॅडमिंटन हॉल येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करणे- 23 ते 30 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्जाची छाननी- 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीची मुदत-2 जानेवारी 2026
चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे- 3 जानेवारी 2026
मतदानाचा दिवस-15 जानेवारी 2026
मतमोजणी-16 जानेवारी 2026