Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Municipal Corporation: पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता स्थापनेपूर्वीच सत्तारूढ पक्षनेत्यांचे कामकाज सुरू

महापौर निवडीआधीच दालन ताब्यात घेऊन बैठका; अधिकाऱ्यांत नाराजी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत सलग दुसऱ्या पंचवार्षिकेत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अद्याप महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन झालेली नाही. असे असताना सत्तारूढ पक्षनेते (सभागृह नेता) प्रशांत शितोळे यांनी दालनाचा ताबा घेऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना करण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यावरून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी खासगीत नाराजी व्यक्त करत आहेत.

तब्बल 9 वर्षांनंतर महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 मतदान झाले. दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल लागला. भाजपने 128 पैकी 84 जागा महापालिकेची सत्ता काबीज केली आहे. भाजप आणि शिवसेनेने (एकनाथ शिंदे) विभागीय आयुक्तांकडून आपल्या गटाची नोंदणी केली आहे. अद्याप राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार) पक्षाची नोंदणी शिल्लक आहे. त्या संदर्भात विभागीय आयुक्तांकडून महापालिका आयुक्तांना अद्याप कळविण्यात आलेले नाही.

शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभा

तसेच, महापौर व उपमहापौरांच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि. 6) विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. त्या दिवशी प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधींची सत्ता सुरू होणार आहे. महापौरांच्यामार्फत संपूर्ण महापालिकेचे कामकाज सुरू होईल. महापौरांमार्फत सत्तारूढ पक्षनेता व विरोधी पक्षनेता निवडला जाईल. तसेच, पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या दालनाचे अधिकृतरित्या वितरण केले जाईल.

भाजपने अद्याप सत्ता स्थापन केलेली नाही. असे असताना भाजपचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सत्तारूढ पक्षनेत्याच्या दालनाचा ताबा घेतला आहे. त्या दालनातून त्यांनी सोमवारपासून (दि. 1) कामकाज सुरू केले आहे. आजही दालनात अधिकाऱ्यांच्या बैठका घेत त्यांनी कामकाज केले. अर्थसंकल्पात कोणत्या विभागास किती निधी दिला जाणार याची माहिती त्यांनी घेतली. महापालिका कामकाजाच्या नियमाची सत्तारूढ पक्षनेत्यालाच माहिती नसल्याबद्दल तसेच, खुर्चीवर बसण्याची इतकी घाई केली जात असल्याबद्दल महापालिकेचे अधिकारी खासगीत नाराजी व्यक्त करत आहेत.

महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे. सत्तारुढ गटनेता म्हणून माझी निवड केली आहे. त्यानुसार मी कामकाज सुरू केले आहे. महापालिका विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा माहिती घेत आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी मला नियमाची माहिती दिलेली नाही. सहा फेबुवारीनंतर मी अधिकृतरित्या कामकाज सुरू करेन.
प्रशांत शितोळे, सत्तारूढ पक्षनेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT