Pimpri Chinchwad Municipal Corporation Anniversary Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Municipal Corporation Anniversary: रक्तदान, रांगोळी अन् रस्सीखेच; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात

महापालिका भवनात विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांची रंगत; गुणवंत कर्मचारी आणि स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: अधिकारी व कर्मचार्‍यांनी रक्तदान करत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 44 वा वर्धापन दिन सोमवारी (दि.12) साजरा केला. पिंपरी येथील महापालिका भवन येथे विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांनी त्यात रंगत आणली. विजेत्यांना तसेच, गुणवंत कर्मचार्‍यांचा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथील कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

महापालिकेचा वर्धापन दिन 11 ऑक्टोबरला असतो. मात्र, रविवार साप्ताहिक सुटी असल्याने सोमवारी तो दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महापालिका भवनास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तळमजल्यावर फुलझाडांच्या कुंड्या व पाकळ्याच्या सहाय्याने आकर्षक भव्य रांगोळी काढण्यात आली होती.

महापालिकेच्या आवारातील कै. अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच, त्यांच्या प्रतिमेस महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, अतिरिक्त आयुक्त कुलदिप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, सहआयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठीया, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रस्सीखेच स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. त्यात महापौर लांडगे आणि आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनीही सहभाग घेतला. महिला अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी आयोजित पैठणीच्या खेळाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. विविध खेळ व मनोरंजनात्मक स्पर्धांमध्ये महिलांनी सहभाग नोंदवला. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT