मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी कचरा डेपोत सुक्या कचऱ्यापासून 14 मेगा वॅट क्षमतेचा वीजनिर्मितीचा (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्प तसेच, हॉटेल वेस्टपासून सीएनजी गॅस तयार केला जात आहे. हे दोन्ही यशस्वी प्रकल्प आताच्या देशाच्या परिस्थितीत दिशादर्शक ठरत आहेत. इंधन बचतीसोबत हे प्रकल्प श्रीमंत महापालिकेची तिजोरी खाली होण्यापासून वाचवित आहेत. त्यामुळे आजच्या इंधन टंचाई आणि महागाईच्या काळात ते दोन्ही प्रकल्प इतर महापालिका व नगरपालिकांना दिशादर्शक ठरत आहेत.
मोशी कचरा डेपोतील 700 टन सुक्या कचऱ्यापासून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात प्रत्येक तासाला 14 मेगा वॅट वीज तयार केली जात आहे. तो प्रकल्प डीबीओटी तत्त्वावर जुलै 2023 रोजी सुरू झाला आहे. त्या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. तेथील वीज महापालिकेस केवळ 5 रुपये प्रतियुनिट दराने उपलब्ध होत असून, त्याच दराने पुढील 21 वर्षे त्या दरानेच वीज मिळणार आहे. ती वीज निगडी, सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र, रावेत येथील अशुद्ध उपसा पाणी केंद्र आणि शहरातील विविध 11 मैलासांडपाणी जलशुद्धीकरण केंद्रांसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या एकूण वीजबिलात तब्बल 40 टक्के बचत होत असून, कोट्यवधी रुपये खर्च न होता, महापालिका तिजोरीत ते राहत आहेत.
पंतप्रधानांच्या आवाहनास पूरक कृती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करण्याचा सल्ला देशवासीयांना दिला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री तसेच, लोकप्रतिनिधी इलेक्ट्रिक वाहनासोबत सायकलचा वापर करत आहेत. त्यातच महापालिकेने दोन वर्षांपूर्वीच कचऱ्यापासून वीज निर्मिती तसेच, हॉटेल वेस्टपासून सीएनजी इंधन निर्मितीचे प्रकल्प यशस्वी करून दाखवले आहेत. त्यातून महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या बचतीसह प्रदूषणास अटकाव होत आहे. तसेच, नव्याने घेण्यात येणारी वाहने इलेक्ट्रिक इंधनावरील घेण्यात येत आहे. ही बाब पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर घालणारी ठरत आहे.
50 ते 60 हजार घरांची मासिक वीज, तर 4 हजार 500 ते 6 हजार मोटारींसाठी सीएनजी
वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात प्रत्येक तासाला 14 मेगा वॅट वीज निर्माण होते. एका घरात साधारण 100 ते 200 युनिट वीज वापरली जाते. ती 14 मेगा वॅट वीज शहरातील तब्बल 50 ते 60 हजार घरांना एका महिन्यासाठी पुरेशी आहे. तर, 1 हजार 500 किलो सीएनजी सुमारे 150 ते 200 मोटार कार किंवा रिक्षांसाठी पुरेशी आहे. म्हणजे एका महिन्यात 4 हजार 500 ते 6 हजार वाहनांसाठी सीएनजी वापरला जात आहे.
27 मेगा वॅटचा नवीन वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारणार
शहराची कचरा समस्या कायमची सोडविण्यासाठी मोशी डेपोतच डीबीओटी तत्वावर 1 हजार टन सुक्या कचऱ्यापासून 27 मेगा वॅट निर्मिती क्षमतेचा नवीन वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाचा डीपीआरही तयार झाला आहे. प्रकल्पासाठी 1 हजार 50 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. याची घोषणा महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तो प्रकल्प सुरू झाल्यानंतर डेपोतील तब्बल 35 वर्षांपासून साचलेला कचऱ्यांचे डोंगर नष्ट होण्यास मदत होणार आहे.
हॉटेल वेस्टपासून दररोज 1 हजार 500 किलो सीएनजी निर्मिती
शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालय, खाणावळ, कंपन्या व शैक्षणिक संस्थेतील कॅण्टीन, वसतीगृह, खाद्यपदार्थ स्टॉल आदी ठिकाणाचे शिल्लक आणि खरकटे अन्नपदार्थाचे हॉटेल वेस्ट महापालिका जमा करते. शहरात सुमारे 4 हजारांपेक्षा अधिक हॉटेल आहेत. ते हॉटेल वेस्ट मोशी कचरा डेपोतील हॉटेल वेस्ट टू बायोगॅस या प्रकल्पात जमा केले जाते. तो प्रकल्प पीपीपी तत्वावर चालवला जात आहे. दररोज जमा होणाऱ्या 50 टन हॉटेल वेस्टपासून दररोज 1 हजार 500 किलो सीएनजी तयार केला जात आहे. तो सीएनजी शासनाच्या एमएनजीएल कंपनीला विकला जात आहे. तो सीएनजी दररोज 150 ते 200 मोटार कार वाहनांना विकला जात आहे. हा प्रकल्प मार्च 2024 ला कार्यान्वित झाला आहे. सध्याचा 50 टन क्षमतेचा हा प्रकल्प टप्पाटप्प्याने 250 टन क्षमतेपर्यत वाढवून, दररोज तब्बल 20 हजारांपेक्षा अधिक किलो सीएनजी निर्माण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
सीएनजी विकणारी पहिली महापालिका
शहरातील सर्व हॉटेलमधील वेस्टपासून तयार झालेला सीएनजी विकणारी पिंपरी-चिंचवड महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका आहे. या प्रकल्पामुळे शहरात निर्माण होणाऱ्या सर्व हॉटेल वेस्टची विल्हेवाट लागणार आहे. हॉटेल वेस्टची दुर्गंधी, घाण व रोगराई तसेच, समस्येतून सुटका झाली आहे.
इंधन निर्मितीस चालना देणारे महापालिकेचे प्रकल्प
मोशी कचरा डेपोत दुसरा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कार्यवाही दूर आहे. त्यामुळे दररोज 1 हजार टन कचऱ्याची विल्हेवाट लागून अल्पदरात महापालिकेस वीज उपलब्ध होणार आहे. तसेच, हॉटेल वेस्टपासून बॉयोगॅस प्रकल्पाची क्षमता टप्प्याटप्प्याने वाढण्यात येत आहे. प्रकल्प 250 टन क्षमतेपर्यंत वाढण्यात येणार आहे. या पर्यावरणपूरक तसेच, इंधन निर्मितीस चालना देणारे महापालिकेचे प्रकल्प यशस्वी ठरले आहेत, असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
राज्यातील पहिलाच यशस्वी प्रकल्प
कचऱ्यापासून वीजनिर्मितीचे प्रकल्प देशात दिल्ली, चंदिगड, जबलपूर, हैदराबाद येथे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हा पहिलाच यशस्वी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे दररोज 700 टन कचऱ्याची विल्हेवाट लागणार आहे. हा पर्यावणपूरक प्रकल्प असून, भविष्यात कचरा साचून त्याचे डोंगर तयार होण्याचे प्रश्न मिटणार आहे. महापालिकेच्या वीज बिलात मोठी बचत होत आहे. देशातून तसेच, राज्यातील अनेक महापालिका, नगरपालिका व विभागाचे अधिकारी आवर्जून या प्रकल्पास भेट देऊन त्याची पाहणी करत आहेत.
दररोज 700 टन कचऱ्याची विल्हेवाट
या प्रकल्पामुळे दररोज 700 टन सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लागत आहे. त्यातून निर्माण झालेल्या राखेतून खत तयार केले जात आहे. येथे चिखली मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्रातील 5 एमएलडी पाणी वापरले जाणार अहे. त्यातून पाण्याचा पुनर्वापर होऊन पाण्याचीही मोठी बचत होत आहे.