Pimpri Chinchwad Illegal Parking Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Illegal Parking: चिंचवडमध्ये मेट्रो स्थानक परिसरात अनधिकृत पार्किंगचा विळखा; पादचाऱ्यांची कोंडी!

पदपथांवर दुचाकी, रिक्षा आणि अनधिकृत स्टॉलचे अतिक्रमण; महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

चिंचवड: मेट्रो स्टेशन परिसरातील रस्त्यावर, पदपथावर दुचाकींची रांग, अनधिकृत स्‍टॉल, रस्‍त्‍यात उभा असलेल्‍या रिक्षा यामुळे पादचाऱ्यांना पदपथावरून चालणे कठीण होत आहे. यामुळे प्रवाशांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. महिला, ज्‍येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी ही स्थिती अधिक धोकादायक ठरत असून, सुरक्षित पादचारी मार्गाची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. अनधिकृत वाहन पार्किंग, रस्‍त्‍यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शहरातील मुख्य आणि सेवा रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. अस्ताव्यस्त उभ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. वाहनचालकांना अचानक लेन बदलावी लागत आहे. त्यामुळे कोंडी वाढली आहे. पिंपरी चिंचवड, मोरवाडी न्यायालय, चिंचवड स्टेशन, पिंपरीगाव या प्रमुख भागात व्यापारी बाजारपेठ आणि मुख्य जोडणाऱ्या रस्त्यांवर ही समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. अनेक व्यावसायिक इमारती, मॉल आणि दुकानांसोबत पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे ग्राहक आणि दुकानदार आपली वाहन रस्त्यावर उभी करत आहेत. त्यामुळे येथे वाहनांच्या रांगा लागत आहेत. पादचारी आणि चालकांना समोर येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही पादचाऱ्यांनाही सुरक्षित जागा उरत नाही.

कोंडी फोडण्यासाठी काय करावे..

  • वाहतूक कोंडीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती करावी.

  • प्रवेश बंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी.

  • रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून पदपथ मोकळे करावेत.

  • वाहनतळाची व्यवस्था करून रस्त्यावरील पार्किंगला आळा घालावा.

वाहतूक कोंडीत पडतेय भर

पीसीएमसी मेट्रो स्‍टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. तसेच उपनगरांतून आलेले प्रवासी आपली वाहने मेट्रो स्‍टेशनलगत लावत आहेत; परंतु महापालिकेने केलेली पार्किंग व्यवस्‍था अपुरी पडत असल्याने बहुतांश वाहनचालक आपली वाहने रस्‍त्‍यात पार्क करून खरेदीसाठी जात आहेत. परिणामी रस्‍ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तसेच पदपथावरदेखील अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना रहदारीच्‍या मार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

पदपथ मोकळा करण्याची मागणी

मुख्य रस्त्यावर 'नो पार्किंग' झोन घोषित करून कडक दंडात्मक कारवाई करावी. टोईंग व्हॅनची संख्या वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे. यावर "लवकरच विशेष मोहीम हाती घेऊन अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर ई-चलनाद्वारे आणि कायदेशीर कारवाई करणार आहोत"; असे आश्वासन वाहतूक विभागाने दिले आहे.

आपत्कालीन सेवांना फटका

वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाच्या गाड्या अडकून पडत आहेत. अनधिकृत पार्किंगमुळे दररोज अपघात होत आहेत. मात्र, वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत आहेत. मुख्य रस्त्यांवर अनधिकृत पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलिस आणि महापालिकेने विशेष मोहीम राबवून अनधिकृत पार्किंगवर कठोर व नियमित कारवाई करावी. आवश्यक त्या ठिकाणी नियोजित सार्वजनिक पार्किंगची सुविधा निर्माण करावी. रस्‍ता व पदपथ मोकळा करावा.

पदपथ नागरिकांना चालण्यासाठी असतो, मात्र येथे वाहन पार्किंग केल्याने आम्‍हाला रहदारीच्‍या मार्गातून चालावे लागते. हा मार्ग वरदळीचा असल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना धोका निर्माण होतो. प्रशासनाने पदपथ तातडीने उपाययोजना करावी.
रमेश जाधव, स्थानिक नागरिक.
मुळातच येथे रस्ता अरुंद आहे. त्यात मेट्रो स्टेशन, मॉल व मोरवाडी न्यायालय तसेच पिंपरी बाजारपेठ यामुळे या चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते. त्‍यात पदपथावरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय दुकानाच्या हद्दीतच करावा आणि पार्किंगची व्यवस्था करून पदपथ नागरिकांसाठी मोकळा ठेवावा.
जगन्नाथ खोपडे, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT