

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत डेंग्यूचे ९९ रुग्ण, तर मलेरियाचे १५ रुग्ण आढळले आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येचा थेट परिणाम रक्तपेढ्यांवर झाला असून, प्लेटलेट्सचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. गंभीर रुग्णांसाठी सिंगल डोनरची शोधाशोध करावी लागत आहे. वायसीएम रुग्णालयाच्या रक्त केंद्रातील शुक्रवार (दि. ३०) उपलब्ध रक्तसाठा फलकाने या तुटवड्यावर शिक्कामोर्तब केले आहे. फलकानुसार, एकाच दिवसात रँडम डोनरच्या प्लेटलेट्सच्या ३८ बॅगची मागणी आली आणि पुरवठा करण्यात आला. यावरुन प्लेटलेट्सची वाढती मागणी लक्षात येत आहे.
रुग्णालयातील रक्तपेढीच्या बोर्डवर रक्तपेढीत एकूण फक्त रँडम डोनरच्या ५० बॅग शिल्लक आहेत. यामध्ये A गटाच्या १०, B च्या १६, AB च्या ६ आणि O गटाच्या १६ बॅग आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे सर्व निगेटिव्ह रक्तगट मिळून फक्त २ बॅग शिल्लक आहेत. त्यामुळे निगेटिव्ह रक्तगट असलेल्या डेंग्यू रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसुविधा होण्याची शक्यता आहे. पालिकेकडून डेंग्यूच्या अळ्या शोधण्यासाठी घराघरांत जाऊन केली जाणारी कंटेनर तपासणीही कमी झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके नियमित येत नसल्याने अनेक सोसायट्यांमध्ये, बांधकाम साईटवर आणि टायर पंक्चरच्या दुकानांभोवती पाणी साचून अळ्यांची पैदास होत आहे. पावसाळ्यानंतरच्या काळात मलेरियाचे १५ रुग्ण आढळणे हेदेखील चिंताजनक आहे.
पालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
एकीकडे रुग्णसंख्या वाढत आहे आणि रक्तपेढीत प्लेटलेटसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे, तर दुसरीकडे प्रतिबंधासाठी आवश्यक असलेली फवारणी आणि तपासणी कासवगतीने होत असल्याने पालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ कागदी आकडेवारी आणि जनजागृतीच्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असून, तातडीने प्रत्येक प्रभागात फवारणी मोहीम आणि कंटेनर तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
गप्पी मासे आणायचे कुठून?
गप्पी मासे डासांच्या अळ्यांना खातात, म्हणून डासांपासून उद्भवणाऱ्या आजारावर नियंत्रणासाठी गप्पी माशांची पैदास केली जाते. पालिकेच्या दहा क्षेत्रिय कार्यालयाच्या ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्र आहे. हे मासे मोफत दिले जातात. मात्र, पालिकेकडून घंटागाडीच्या स्पीकरवर कोरडा दिवस पाळा, भंगार सामान, टायरमध्ये पाणी काढून टाका यावरच भर दिला जात आहे. ज्या नागरिकांकडे, सोसायट्यांमध्ये टाक्यांमध्ये पाणी साठविले जाते त्याठिकाणी गप्पी मासे सोडा, याविषयी जनजागृती केलेली दिसत नाही. त्यामुळे पालिकेचे जनजागृतीचे नियंत्रण फसले असल्याचे दिसून येत आहे. महापालिका दरवर्षी डासोत्पत्तीवर नियंत्रणासाठी गप्पी मासे पाळण्याबाबत सूचना करते; मात्र प्रत्यक्षात शहरातील एकाही प्रभागात माशांचे वाटप झालेले नाही. फवारणी आणि कंटेनर तपासणी प्रमाणेच गप्पी मासे योजनाही केवळ कागदावरच राहिली आहे, त्यामुळे डेंग्यू आणि इतर आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
सिंगल डोनर प्लेटलेट्सचा साठा शून्य
डेंग्यूच्या गंभीर रुग्णांसाठी अत्यंत प्रभावी मानली जाणारी सिंगल डोनर प्लेटलेट्सचा साठा रक्तपेढीत पूर्णपणे संपली आहे. सिंगल डोनर प्लेटलेट्समध्ये एका बॅगमध्ये ६० हजारांहून अधिक प्लेटलेट असतात, जी एका रँडम डोनर प्लेटलेट्सपेक्षा पेक्षा ५ पट जास्त असते. त्यामुळे डॉक्टर गंभीर रुग्णांना सिंगल डोनर प्लेटलेट्स देण्याचा सल्ला देतात. मात्र, डोनर अभावी ती उपलब्ध होत असे दिसते. त्यामुळे एखाद्या गंभीर रुग्णाला प्लेटलेट्सची गरज भासल्यास रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागेल. दुसरीकडे प्लाझ्माचा साठा २७५ आणि रक्ताच्या १५७ बॅग उपलब्ध असल्याने लाल रक्त आणि प्लाझ्माचा साठा मुबलक आहे. यावरून केवळ प्लेटलेट्सवरच ताण असल्याचे स्पष्ट होते. तज्ज्ञांच्या मते, प्लेटलेटचे आयुष्य केवळ ५ दिवसांचे असल्याने त्याची दीर्घकाळ साठवणूक करता येत नाही. त्यामुळे रोज नवीन दात्यांची गरज भासते.
तुटवडा होण्याची कारणे
सध्या दसरा आणि दिवाळी सणाच्या वेळी रक्तदान शिबिरे घटतात. त्यामुळे रक्ताचा साठा देखील अल्प प्रमाणात असतो. एखाद्या रुग्णाला तातडीने रक्ताची गरज भासल्यास डोनरला बोलावून रक्तपुरवठा केला जातो. तसेच प्लेटलेट्सचे आयुष्य केवळ ५ दिवसांचे असते. त्यामुळे त्याचा प्रमाणाबाहेर साठा करता येत नाही.
प्लेटलेट्सचे आयुष्यमान पाच दिवस इतके कमी असते. त्यामुळे त्याचा साठा कमीच होतो. डेंग्यूचे वायसीएम रुग्णालयात रुग्ण कमी आहेत. खासगीमध्ये रुग्ण असतील. जर गरज लागली तर सिंगल डोनरला बोलावतो.
डॉ. राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय
डेंग्यूची रुग्णसंख्या वाढल्याने प्लेटलेट्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्लेटलेट्सचा साठा करता येत नाही. याला ५ दिवसांचे आयुष्य असते. त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात साठा करता येत नाही. तातडीच्या वेळी सिंगल डोनरला बोलावून व्यवस्था करावी लागते.
दीपक पाटील, प्रशासकीय अधिकारी, पिंपरी सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर
गप्पी मासे पैदास केंद्र पालिकेच्या दहा क्षेत्रिय कार्यालयामध्ये आहे. नागरिकांना पालिकेकडून गप्पी मासे मोफत दिले जातात. नागरिकांना या पुढे आम्ही गप्पी मासेबाबात जनजागृती करू.
श्रीराम गायकवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी पिं.चिं. मनपा