Document Verificcation Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Mayor Medical Aid Scheme: महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजनेसाठी उत्पन्न दाखला गरजेचा

गंभीर आजार, उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना महापौर रवी लांडगे यांचे पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरिक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील आर्थिकदृष्ट्‌‍या दुर्बल नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळावी, या उद्देशाने महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गंभीर आजार, उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी अडचणीत असलेल्या नागरिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.

प्रशासकीय राजवटीमध्ये ही योजना बंद पडली होती. त्यासंदर्भात ‌‘पुढारी‌’ने ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापौर रवी लांडगे यांनी ती योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गरजू रुग्णांना त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयाच्या नावाने धनादेशाद्वारे (चेक) पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यामुळे उपचारासाठी आवश्यक असलेला आर्थिक भार काही प्रमाणात कमी होऊन नागरिकांना वेळेवर उपचार घेणे शक्य होणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी रूग्ण किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी महापौर कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत रुग्णाचे आधारकार्ड, रेशनकार्डाची प्रत, तहसीलदार कार्यालयाकडील उत्पन्नाचा दाखला, स्थानिक नगरसेवकांचे शिफारसपत्र आणि रुग्णालयाकडून देण्यात आलेले डॉक्टरांच्या सही व शिक्क्याचे उपचार खर्चाचे अंदाजपत्रक आवश्यक आहे.

योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती अचूक असणे आवश्यक असून, कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच आर्थिक सहाय्य मंजूर केले जाईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या नावाने धनादेश दिला जातो.

आर्थिक अडचणीमुळे कोणालाही वैद्यकीय सेवा नाकारली जाऊ नये

शहरातील गरजू नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत आणि आर्थिक अडचणीमुळे कोणालाही वैद्यकीय सेवा नाकारावी लागू नये, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्‌‍या दुर्बल कुटुंबांना उपचारासाठी मदत मिळावी आणि त्यांना दिलासा मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT