Adolescent Counselling Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Maitri Clinic: पिंपरी-चिंचवडमधील ‘मैत्री क्लिनिक’ ठरतेय किशोरवयीन मुलांचा विश्वासाचा आधार

एप्रिल २०२५पासून १६ हजार ८२० मुला-मुलींना मार्गदर्शन; शारीरिक, मानसिक बदलांसह व्यसनमुक्तीचेही समुपदेशन

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: वयात येताना होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, शिक्षणाचा ताण, व्यसनांचे आकर्षण, अशा अनेक समस्यांनी किशोरवयीन मुले-मुली गोंधळून जातात. घरात किंवा शाळेत मनमोकळे बोलता येत नाही. अशा वेळी त्यांना हक्काचा आणि विश्वासाचा आधार मिळावा, यासाठी शासनाने सुरू केलेले 'मैत्री क्लिनिक' वरदान ठरत आहे. या केंद्रांमधून एप्रिल २०२५ पासून आत्तापर्यंत १६ हजार ८२० किशोरवयीन मुला-मुलींना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले आहे.

पौगंडावस्था म्हणजे बालपणातून तारुण्याकडे जाण्याचा महत्त्वाचा टप्पा. या काळात शरीरातील बदलांसोबतच मानसिक आणि भावनिक चढ-उतार सुरू होतात. या किशोरवयीन मुला-मुलींना शास्त्रीय माहिती आणि विश्वासाचे व्यासपीठ मिळावे, यासाठी एकात्मिक आरोग्य व कुटुंबकल्याण कार्यक्रमांतर्गत 'मैत्री क्लिनिक' कार्यरत आहे.

१० ते १९ वर्षांच्या किशोरवयीन काळात उंची-वजन वाढणे, आवाजात बदल, मासिक पाळी सुरू होणे, लैंगिक अवयवांची वाढ, मुरूम येणे यांसारखे शारीरिक बदल होतात. त्याचवेळी चिडचिड, विश्वासातील चढ-उतार, आकर्षण, नातेसंबंधांबाबत कुतूहल, अभ्यासाचा ताण आणि करिअरची चिंता, अशा मानसिक-भावनिक प्रश्नांनाही सामोरे जावे लागते. 'मैत्री क्लिनिक'मध्ये मुला-मुलींशी मैत्रीपूर्ण वातावरणात संवाद साधून त्यांच्या समस्यांनुसार समुपदेशन, वैद्यकीय तपासणी आणि पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाते. समुपदेशनात गोपनीयतेला विशेष महत्त्व दिले जाते.

पिंपरी-चिंचवड शहरात चार केंद्रे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकुर्डी, तालेरा, जिजामाता आणि भोसरी रुग्णालय येथे दर मंगळवारी व बुधवारी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन केले जाते. याशिवाय जिल्हा रुग्णालय, सांगवी, उपजिल्हा रुग्णालय, भोर, मंचर, इंदापूर आणि ग्रामीण रुग्णालय, जुन्नर येथेही केंद्रे कार्यरत आहेत.

मैत्री क्लिनिकमध्ये कोणत्या सेवा मिळतात?

  • समुपदेशन : मासिक पाळी, शारीरिक स्वच्छता, पौगंडावस्थेतील बदल, प्रेम, आकर्षण, नैराश्य, रागावर नियंत्रण याबाबत गोपनीय समुपदेशन केले जाते.

  • आरोग्य तपासणी : अशक्तपणा, कुपोषण, त्वचाविकार, लठ्ठपणावर मोफत तपासणी आणि उपचार.

  • व्यसनमुक्ती मार्गदर्शन : मोबाईलचे व्यसन, तंबाखू, सिगारेटपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन.

  • गोपनीयता : येथे आलेल्या किशोरवयीन मुला-मुलींची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. पालकांनादेखील त्यांच्या परवानगीशिवाय सांगितले जात नाही. त्यामुळे मुले मनमोकळेपणाने बोलू शकतात.

किशोर वय हा आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्पा आहे. या वयात मुला-मुलींना पडणारे अनेक प्रश्न अगदी नैसर्गिक असतात. वयाच्या या टप्प्यामध्ये त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही बदल होत असतात. मात्र, याबद्दल योग्य माहिती न मिळाल्यास त्यातून भीती, गैरसमज किंवा मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. 'मैत्री केंद्रां'मध्ये मुलांना मोकळेपणाने बोलता येईल, अशी विश्वासाची जागा उपलब्ध आहे. पालकांनीही मुलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे.
डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक
माझी मुलगी तारूण्यावस्थेत येताना खूप चिडचिड करायची. आम्हाला काही सांगायची नाही. मैत्री क्लिनिकमधील ताईंनी तिच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या की, आता ती आमच्याशी पण मोकळेपणाने बोलते. मैत्री क्लिनिक हा खरंच चांगला आधार आहे.
सुनिता जाधव, पालक
मुलगा दिवसभर मोबाईलमध्ये असायचा, अभ्यासात लक्ष नव्हते. क्लिनिकमध्ये समुपदेशन घेतल्यावर त्याला मोबाईलच्या दुष्परिणामांविषयी कळले. आता तो स्वतःहून वेळ पाळतो. पालक म्हणून आम्हांला पण मार्गदर्शन मिळाले.
राजेश भोसले, पालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT