

पिंपरी: ‘गोल्डन गाईज’ म्हणून परिचित असलेल्या गटातील आणखी एका सदस्याच्या मर्सिडीज कारवर पिंपरी वाहतूक पोलिसांनी रविवार (दि. २७) कारवाई केली. साई चौक येथे उभ्या असलेल्या गोल्डन रंगाच्या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दखल घेत कारवाईचे आदेश दिले.
सनी वाघचौरे यांच्या मर्सिडीज कारचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तपासणीदरम्यान कारला काळी फिल्म, फॅन्सी नंबर प्लेट तसेच मॉडिफाइड रंग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याशिवाय वाहन वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभे करणे आणि विम्यासंदर्भातील नियमभंग आढळल्याने मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी कारवरील काळी फिल्म आणि फॅन्सी नंबर प्लेट काढून घेतली. वाहतुकीस अडथळा, काळी काच, फॅन्सी नंबर प्लेट, वाहनाच्या रंगातील बदल आणि विम्यासंदर्भातील नियमभंग अशा विविध बाबींवर कारवाई करून वाहनमालकाला एकूण सहा हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
दरम्यान, मागील आठवड्यात ‘गोल्डन गाईज’मधील संजय गुजर यांच्या कारवरही अशाच प्रकारे वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. वाघचौरे आणि गुजर हे मोठ्या प्रमाणात सोने परिधान करण्यासाठी परिचित असून, त्यांच्या गोल्डन रंगातील मॉडिफाइड कारही नेहमीच लक्ष वेधून घेतात. यापूर्वीही त्यांच्या वाहनांवर कारवाई झाल्याची नोंद असून, त्यानंतर पुन्हा काळी फिल्म आणि नियमबाह्य बदल केल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.