Illegal Overhead Cables Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Internet Cables: पिंपरी-चिंचवडमध्ये इंटरनेट केबल्सचे जाळे; लटकत्या तारांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पदपथ, झाडे आणि विद्युत खांबांवर अनधिकृत केबल्सचा पसारा; सर्वेक्षण करून कारवाईची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवडमधील महामार्ग, अंतर्गत रस्ते, चौक, विद्युत खांब आणि झाडांवर इंटरनेट केबल्सचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी या केबल्स थेट पादचारी मार्गावर, सायकल ट्रॅकवर लटकलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. या लटकणाऱ्या केबल्समुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून शहराच्या सौंदर्यासही बाधा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

पादचाऱ्यांसाठी वाढता धोका:

शहरातील अनेक भागांत केबल्स डोक्याच्या उंचीवर किंवा पदपथावर लटकलेल्या अवस्थेत आढळून येतात. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दुचाकीस्वारांना या केबल्समुळे अडथळा निर्माण होत असून,अपघाताची शक्यता वाढत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

झाडांमध्ये अडकलेल्या केबल्स

अनेक झाडांच्या फांद्यांमध्ये इंटरनेट केबल्स लटकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. वाऱ्यामुळे या केबल्स तुटुन आणखी खाली पडतात. त्यामुळे पादचाऱ्यांचा पाय अडकण्याचा शक्यता निर्माण होऊ शकतो; तसेच त्या परिसरातून जाणाऱ्या दुचाकीस्वारांच्या जीवासही धोका उद्भवू शकतो. झाडांच्या छाटणीच्या कामातही मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे त्या विभागाकडून सांगण्यात आले.

नियोजनाचा अभाव:

इंटरनेट सेवा पुरवठादारांनी नियमानुसार भूमिगत केबल टाकण्याऐवजी अनेक ठिकाणी कोणतेही नियोजन न करता खांबांवर व झाडांवर केबल्स टाकल्या आहेत. परिणामी शहरभर केबल्सचे जाळे तयार झाल्याचे चित्र आहे.

स्मार्ट सिटीला तडा:

स्मार्ट सिटीची ओळख स्वच्छ, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पायाभूत सुविधांमुळे असते; मात्र शहरभर लटकलेल्या केबल्समुळे ही संकल्पना धूसर होत असून शहराच्या सौंदर्यासही गालबोट लागते.

नागरिकांच्या प्रशासनाकडून अपेक्षा:

नागरिकांनी प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून अनधिकृत केबल्स हटवाव्यात, तसेच सर्व इंटरनेट केबल्स सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने भूमिगत करण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली आहे.

हे करणे गरजेचे:

  • शहरातील सर्व इंटरनेट केबल्सचे सर्वेक्षण.

  • अनधिकृत केबल्स तातडीने हटविणे.

  • नव्या केबल्स भूमिगत टाकण्याची सक्ती.

  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सेवा पुरवठादारांवर दंडात्मक कारवाई.

शहरात सार्वजनिक रस्ते, पदपथ, चौक आणि महापालिकेच्या मालमत्तेवर अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या इंटरनेट व फायबर केबल्सची तपासणी करण्यात येते. नियमबाह्य आढळणाऱ्या केबल्स संबंधित सेवा पुरवठादारांना नोटीस देऊन त्या हटविण्याचे आदेश संबंधितांना दिले जातील. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अतिक्रमणविरोधी कारवाई पालिकेकडून करण्यात येत असते.
अतुल पाटील, अतिक्रमण विभागप्रमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT