पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, टपर्यांचे जलद गतीने सर्वेक्षण करून त्यावर तातडीने कारवाई करा. कारवाईस दिरंगाई करणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना दिला आहे.
महापालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृह सोमवार (दि. २४) झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस बांधकाम परवानगी विभागाचे सहशहर अभियंता सुनील बागवानी यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, सर्व क्षेत्रीय अधिकारी, बीट निरीक्षक आदी उपस्थित होते.
बैठकीमध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बीट निरीक्षकांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक बीट निरीक्षकाने त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्राची नियमित पाहणी करून नव्याने सुरू झालेली तसेच, सद्यस्थितीत सुरू असलेली अनधिकृत बांधकामे ओळखून त्यांचे सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेल्या अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार तातडीने कारवाई करावी, अशा सक्त सूचना अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांनी दिल्या आहेत. महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांवर झालेली अतिक्रमणे तसेच, अनधिकृत व विनापरवाना टपर्यांवर प्राधान्याने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. पदपथांवर झालेली अतिक्रमणे काढून, पादचार्यांना पदपथ मोकळे करावेत.
अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांच्या प्रकरणांमध्ये केवळ तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी संबंधित क्षेत्रातील परिस्थितीची नियमित पाहणी करून स्वतःहून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे शोधून त्यावर तातडीने कारवाई करावी. अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमित पाहणी करावी. कारवाईसाठी आवश्यक असलेले नियोजन, मनुष्यबळ व यंत्रसामग्री यांचा योग्य समन्वय साधून कारवाई प्रभावीपणे करावी. कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचार्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बीट निरीक्षकांनी अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नयेत
बीट निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करून, नव्याने होणारी अनधिकृत बांधकामे तातडीने निदर्शनास आणून द्यावीत. त्यावर नियमानुसार पाडण्याची कारवाईबाबत निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांवरील अतिक्रमणे, अनधिकृत टपर्या तसेच, पदपथांवरील अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्यात यावे. कारवाईस टाळाटाळ करणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.