Rain Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Rain: पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा कहर; रस्ते जलमय, वाहतूक ठप्प, पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

२४ तासांत २८.५ मिमी पावसाची नोंद; सखल भागात पाणी साचले, पीएमपी सेवा विस्कळीत, पूरस्थितीसाठी महापालिका यंत्रणा सज्ज

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर परिसरात शुक्रवार (दि. ३१) सकाळपासूनच पावसाची बॅटिंग सुरू होती. पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. दिवसभराच्या जोरदार पावसाने रस्त्यावर आणि सखल भागात पाणीच पाणी केले होते. साचलेल्या पाण्यामुळे तसेच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात गेल्या चोवीस तासांत २८.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे उद्योगनगरीतील जनजीवन विस्कळीत झाले होते.

गुरुवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. शुक्रवारी सकाळी मध्यम स्वरूपाच्या पावसानंतर दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली; मात्र सकाळी कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थ्यांना पावसात भिजतच जावे लागले. तसेच शाळा सुटतानादेखील विद्यार्थ्यांना भिजत घरी जावे लागले. सकाळी दूधवाले, पेपरवाले यांची पावसामुळे मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र होते. भाजीविक्रेते आणि रस्त्यावरील विक्रेते यांच्या व्यवसायावर पावसामुळे परिणाम झाला.

दुपारी चारनंतरही पावसाचा जोर कायम होता. जोरदार पावसाने बाहेर पडलेल्या नागरिकांची फजिती झाली. पावसाचा जोर असल्याने थोड्याच वेळात शहरातील अनेक सखल भागात पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहने त्यातून नेताना बंद पडल्याने वाहतूककोंडी उद्भवली होती. पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, चोहीकडे खड्डेच खड्डे त्यामुळे वाहने चालवताना चालकांची मोठी कसरत होत आहे. निगडीतील टिळक चौक ते चिंचवड स्टेशनदरम्यान मेट्रोचे काम सुरू असल्याने बॅरिकेटिंगमुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था होऊन वाहने चालविणे अवघड झाले होते. खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक पावसामुळे अडकून पडले.

तर काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना घराच्या बाहेर पडता येईना, अशी परिस्थिती उद्भवली होती. तुंबलेल्या नाल्यामुळे पाण्याचा निचरा होण्याऐवजी पाणी रस्त्यावरुन ओढ्याप्रमाणे वाहत होते. या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची मोठी फजिती होत असल्याचे दृश्य होते. पाऊस आणि कमालीचा गारठा यामुळे नागरिकांनी चहा, कॉफीसारखे गरम पेय घेण्यासाठी गाड्यांवर गर्दी झाली होती. पावसामुळे वडापाव, भजी यांना दिवसभर मागणी होती. बर्‍याच जणांचे कामानिमित्त व खरेदीसाठी बाहेर पडण्याचे बेत रद्द झाले. तर जोरदार पावसामुळे अनेकांनी घरात राहणे पसंत केले.

बाजारपेठेतील वर्दळ रोडावली

नेहमी गजबजलेल्या चिंचवड व पिंपरी बाजारपेठेतदेखील पावसामुळे नागरिकांची वर्दळ कमी होती. बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करणार्‍या नागरिकांना बसशेड अपुरे पडत होते. काही ठिकाणी बसथांब्याजवळ पाणी साचल्याने प्रवाशांना उभे रहायला जागा नव्हती. जवळ रेनकोट व छत्री नसलेले नागरिक दुकाने, पूल याठिकाणी आडोसा घेऊन ताटकळत उभे होते.

या ठिकाणी साचले पाणी

शहरातील निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, भोसरी, कासारवाडी, दापोडी, तसेच मोशी, चिखली, शाहूनगर, मोरवाडी, वाल्हेकरवाडी, रहाटणी ठिकाणच्या सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे पुलाखाली; तसेच संभाजीनगर, लिंकरोड येथील बलूनपार्क, दर्शनहॉल बसस्टॉपसमोरील रस्त्यावर पाणी पाणी झाले होते. आकुर्डी येथील मदर तेरेसा होम परिसरात मेहता हॉस्पिटल परिसर तसेच वाल्हेकरवाडी गुरुव्दारा चौक परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

वाहतुकीचा खोळंबा

पावसामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पिंपरी-चिंचवडमध्ये पावसामुळे पुणे-मुंबई महामार्ग भोसरी ते निगडी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. मोरवाडी चौक, चिंचवड स्टेशन रोड अरुंद रस्ते, पाणी, शाळा सुटण्याची वेळ त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. थेरगाव, वाकड रस्ता खड्डे पाणी साचल्याने दुचाकी-चारचाकी सावकाश जात होत्या. पीएमपी बसेस उशिरा धावत होत्या. त्यामुळे बसस्टाॅपच्या ठिकाणी गर्दी झाली होती. पुण्याहून निगडीकडे जाणाऱ्या ग्रेड सेपरेटरमधील रस्त्याची दुरवस्था झाल्याने तेथेही वाहतूककोंडी झाली होती. परिणामी अनेक वाहनचालकांनी आपली वाहने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळविल्याने महामार्गावरही मोठी वाहतूककोंडी झाली होती.

याठिकाणी पडली झाडे

दळवीनगर याठिकाणी सकाळी झाड पडण्याची घटना घडली, तसेच मोशी काजळे पेट्रोल पंप या ठिकाणी झाड पडल्याची घटना घडली.

पवनाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

मावळ तालुक्यातील पवना धरण पूर्णपणे भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. खबरदारी म्हणून धरणातून शुक्रवार (दि. ३१) सायंकाळी साडेसहापासून नदीपात्रात ९ हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून १७५०० क्युसेक इतका करण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदीस पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे नदी, नाले व ओढ्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असून, नदीकाठच्या भागात पूर येऊ शकतो. त्यामुळे पवनानदी परिसरातील नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीकाठी जाणे टाळावे. नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, जनावरे तसेच, इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन पवना धरण पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज

संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व दहा क्षेत्रीय कार्यालये, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग तसेच, संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. सखल भागांमध्ये ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेचे संदेश प्रसारित करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी मनुष्यबळ, वाहने व निवारा केंद्रांची तयारी करण्यात आली आहे. अग्निशामक दलाला सर्व साधनांसह सुसज्ज राहून कोणतीही घटना घडल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित मदतकार्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जलसंपदा विभाग, जिल्हा प्रशासन आणि महापालिकेकडून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सूचनांचे पालन करावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन महापौर रवी लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा

नागरिकांनीही हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे. पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे, वेगाने वाहणारे पाणी ओलांडण्याचा प्रयत्न करणे, धोकादायक ठिकाणी गर्दी करणे टाळावे. कोणतीही आपत्कालीन घटना, झाड पडणे, पाणी साचणे किंवा इतर अडचण निर्माण झाल्यास महापालिकेच्या संबंधित विभागाशी किंवा नियंत्रण कक्षाशी तात्काळ संपर्क साधावा. कोणतीही आपत्कालीन मदत हवी असल्यास मुख्य नियंत्रण कक्ष क्रमांक ०२०- ६७३३११११ किंवा ०२०- २८३३११११ किंवा अग्निशमन विभागाच्या ७०३०९०८९९१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पावसाचा जोर पाहता महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत; तसेच नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पाणी साचते त्याठिकाणी क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंत्यांना त्या भागात फिरून पाहणी करण्याविषयी सांगण्यात आले आहे. पालिकेकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
विक्रांत बगाडे (अतिरिक्त आयुक्त, पिं.चि.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT