Pimpri Chinchwad Fuel Protest Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Fuel Protest: इंधन बचतीचा संदेश की राजकीय नाट्य? पिंपरी-चिंचवडमध्ये सायकल ते बैलगाडी आंदोलन

सत्ताधाऱ्यांचा सायकल-मेट्रो प्रवास; विरोधकांचे बैलगाडी आंदोलन आणि 60 कोटी घोटाळ्याचा मुद्दा गाजला

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि पश्चिम आशियातील संकटामुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य परिणामांना तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. सार्वजनिक वाहतूक, मेट्रो, बससेवा, कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी (दि. 15) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशी महापालिका परिसरात प्रचंड नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. एका बाजूला पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद, तर दुसऱ्या बाजूला इंधन दरवाढ आणि भष्टाचाराच्या मुद्द्‌‍यावरून सत्ताधारी अन्‌‍ विरोधक आमनेसामने आले होते.

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महापौर रवी लांडगे यांनी आपला नियोजित विदेश दौरा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. आज पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश देण्यासाठी महापौर लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे दोघेही आज चक्क सायकलवरून महापालिका भवनात पोहोचले. तसेच, आरपीआईचे नगरसेवक धर्मपाल तंतरपाले यांनीही सायकलवरून येत या उपक्रमात सहभाग घेतला.

इंधन बचतीच्या या मोहिमेत इतर लोकप्रतिनिधींनीही वेगवेगळ्या प्रकारे सहभाग नोंदवला. माजी महापौर शकुंतला धराडे आणि शिक्षण विभागाच्या सभापती रवीना अंगोळकर यांनी व्हीआयपी वाहनांचा त्याग करून ऑटो रिक्षाने प्रवास केला. सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष संजय काटे व काही नगरसेवकांनी मेट्रोने तसेच, पीएमपीएल बसने प्रवास केला. अनेक नगरसेवकांनी इंधनाची बचत करण्यासाठी कार पूलिंगचा (एकाच गाडीतून अनेक जणांनी प्रवास करणे) पर्याय निवडला. उदय गायकवाड व कृष्णा सुरकुले यांनी चारचाकी वाहन टाळून दुचाकीवर महापालिका गाठली.

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे बैलगाडी आंदोलन

विरोधकांनी मात्र या इंधन बचतीच्या आवाहनाचा निषेध करत वाढत्या पेट्रोल-डिझेल दरावरून सत्ताधाऱ्यांना घेरले. राष्ट्रवादी काँग््रेासच्या नगरसेवकांनी थेट बैलगाडीवरून महापालिकेत दाखल झाले. सत्ताधारी भाजपाच्या उधळपट्टीवर टीका केली. ते अनोखे आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

60 कोटींच्या घोटाळ्यावरून मनसे आक्रमक

इंधन दरवाढीसोबतच महापालिकेतील आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दाही आज चांगलाच गाजला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेतील 60 कोटी 18 लाख रुपयांच्या घोटाळ्याचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे लावून धरला. चुकीच्या पद्धतीने उपसूचनेवर स्वाक्षरी करणाऱ्या नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली. महापालिकेत पारदर्शक कारभार व्हावा आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असा आरोपही मनसेकडून करण्यात आला. एकाच दिवशी इंधन बचतीसाठी सत्ताधाऱ्यांनी केलेली सायकल आणि मेट्रो प्रवास, वाढत्या महागाईविरोधात विरोधकांचे बैलगाडी आंदोलन आणि भष्टाचाराच्या आरोपांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राजकीय वातावरण आज दिवसभर चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT