राहुल हातोले
पिंपरी: पर्यावरणपूरक शहर म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीचा वेग मंदावला आहे. वाढत्या किमती, चार्जिंग स्टेशनचा तुटवडा आणि लांब पल्ल्याच्या प्रवासातील अडचणींमुळे नागरिकांनी पेट्रोल-डिझेल वाहनांकडे आपला मोर्चा वळवला आहे. परिणामी, शहरातील वायू प्रदूषण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात 2023 मध्ये 17 हजार 272 वाहनांची नोंद झाली आहे. तर, 2024 मध्ये 16 हजार 394 तसेच 2025 मध्ये 16 हजार 190 वाहनांची नोंद झालेली आहे. दर वर्षी इलेक्ट्रिक वाहनांची नोंद घटल्याचे या आकडेवारीवरून समोर येत आहे.
या कारणांमुळे नोंदीत घट
अधिक किंमत : पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत अधिक किंमत असल्याने मध्यमवर्गीयांना वाहन घेणे अवघड
मर्यादित रेंज : लांब अंतराचा प्रवास करताना बॅटरीची मर्यादा कमी
चार्जिंग स्टेशनचा अभाव : शहरात पुरेशा प्रमाणात चार्जिंग स्टेशन उपलब्ध नाहीत
वेळखाऊ चार्जिंग प्रक्रिया : इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी अधिक वेळ लागतो
महापालिकेची भूमिका महत्त्वाची
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात चार्जिंग स्टेशनची उभारणी करणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी अनुदान योजना, पार्किंग सवलती मोहीम राबविणे आवश्यक आहे.
धोरणात्मक निर्णयाचा अभाव
इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे ही काळाची गरज असताना शहरात त्याचा उलट प्रवाह दिसत आहे. पायाभूत सुविधा, आर्थिक सवलती आणि धोरणात्मक निर्णय घेतल्यास इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे पुन्हा नागरिकांचा कल वाढेल. अन्यथा, पर्यावरणपूरक वाहतुकीचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे.
चार्जिंगसाठी लागणारा वेळ, स्टेशनची अनुपलब्धता, लांब पल्यासाठी वापरता येत नसल्याने शहरात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी कमी होत आहे. तसेच, इतर वाहनांच्या तुलनेत दरदेखील अधिक आहेत. त्याकारणाने नागरिकांकडून खरेदी घटली आहे.राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड