

वर्षा कांबळे
पिंपरी: मासिक पाळीमुळे मुलींचे शिक्षण अपूर्ण राहू नये आणि शाळेतील त्यांची उपस्थिती शंभर टक्के असावी; तसेच शाळांमधील ‘ड्रॉपआऊट’चे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी ‘पिंक रूम’ (स्वतंत्र सुविधा कक्ष) सारख्या आधुनिक संकल्पना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे ग््राामीण आणि शहरी भागातील विद्यार्थिनींना शाळेत सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळणार आहे. मात्र, पिंपरी- चिंचवड शहरांतील शाळांमध्ये जागेअभावी हा सुविधा कक्ष उभारण्यात अडचणी येणार आहेत. पिंकरूम अभावी विद्यार्थिनींची कुचंबणा होणार आहे.
मासिक पाळी ही स्त्रीच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असली तरी आपल्या समाजात अजूनही दुर्लक्षित विषय आहे. परिणामी अनेक मुलींना योग्य माहिती, स्वच्छतेची काळजी आणि आवश्यक साधनांची उपलब्धता वेळेवर मिळत नाही. अजूनही बंधने, रुढी चुकीच्या समजूतीमुळे मुलींना प्रचंड शारीरिक व मानसिक वेदना सहन कराव्या लागतात. यासाठी राज्यातील काही शाळांमध्ये पिंक रूम सुरु केल्या आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच शासकीय आणि खासगी शाळांमध्ये अशा पिंक रूम सुरु करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तयार केला आहे.
शहरामध्ये एकूण 650 शाळा आहेत. त्यापैकी मनपाच्या 105 प्राथमिक आणि 18 माध्यमिक विभागाच्या शाळा आहेत. इयत्ता 6 वी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींसाठी शाळांमध्ये पिंक रूम असायला हवी असा आदेश आहे. त्यामुळे प्राथमिक विभागाच्या शाळांना देखील हा नियम लागू होतो.
शासकीय आणि खासगी शाळांमधील विद्यार्थिनींना पाळीमुळे आपले शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागू नये म्हणून महापालिका काही सामाजिक संस्था किंवा बचत गटाकडून स्वस्त दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन दिले जातात.
या मशिन्सव्दारे आता शाळेच्या वेळेत विद्यार्थिंनीना केव्हाही सॅनिटरी नॅपकीन्स उपलब्ध होत आहे. शाळेत बसविलेल्या मशिन्समधील पॅडचा वापर करताना दिसत आहे. मात्र, त्यांना आरामाची गरज भासल्यास कोणाताही स्वतंत्र कक्ष नाही.
पालिकेच्या मुलींच्या एकूण 22 शाळा
महापालिकेच्या स्वतंत्र मुलींच्या एकूण 22 शाळा आहे. मनपा शाळांमधील मुली या आर्थिक दुर्बल घटकातील असतात. अचानक मासिक पाळी आल्यानंतर शाळेतून सॅनिटरी पॅड देण्याची सुविधा असते. मात्र, काहीवेळा मुलींना पोटदुखी, पित्त, चक्कर, अशक्तपणा या गोष्टींचा सामना करावा लागतो. यावेळी मुलींना शाळेतून घरी जावे लागते. काहींना सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. घरात देखील आरामदायी वातावरण नसते. अशावेळी पिंक रूममुळे मुलींना शाळेतच आरामदायी वातावरण मिळणार आहे.
‘पिंक रूम’मुळे मिळणार सुरक्षा
मासिक पाळीवेळी किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन बदलणे, विश्रांती घेणे यासाठी ‘पिंक रूम’ ही सुरक्षित जागा मिळणार आहे. तसेच शाळांमध्ये स्नेहसंमेलन, क्रीडा, पीटीच्या तासाला कपडे बदलण्यासाठी स्वच्छतागृहाचा वापर केला जातो. चेजिंग रुमची अशी वेगळी व्यवस्था नाही. ‘पिंक रूम’चा वापर क्रीडा, योग व पीटी तासादरम्यान कपडे बदलण्यासाठी होणार आहे. या उपक्रमामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण होणार असून त्यांच्यामध्ये जागरूकता वाढणार आहे. तसेच मुलींच्या उपस्थितीत वाढ होऊन शिक्षणात सातत्य राहण्यास मदत होणार.
‘पिंक रूम’ म्हणजे काय?
पिंक रूम म्हणजे शाळा, महाविद्यालय किंवा सार्वजनिक ठिकाणी मुलींसाठी खास तयार केलेली स्वतंत्र आणि सुरक्षित जागा, जिथे मासिक पाळीच्या काळात आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. साधारणत: या कक्षात सॅनिटरी पॅडची सुविधा, टेबल-खुर्ची, बेड, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, प्राथमिक उपचार साहित्य, मासिक पाळीबद्दल माहिती देणारे फलक. शाळांमध्ये साधारणपणे 15 बाय 15 फूट आकाराची ही पिंक रूम असणार आहे. जागा उपलब्ध असलेल्या शाळांमध्ये 18 फूट बाय 22 फूट आकाराची वर्गखोली ‘पिंक रुम’ म्हणून वापरण्यात येणार आहे.
आम्ही एका शाळेतच प्रयोगिक तत्त्वावर पिंक रूम करणार आहोत. काही शाळांना वर्गच अपुरे असल्याने पिंक रूमला जागाच नाही. ज्या शाळांत मुलींची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी करणार आहोत. जागेआभावी पिंक रूम करणे शक्य नाही.
संगीता बांगर (प्रशासन अधिकारी, पिं.चिं. मनपा)