Candidate Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Election: तुझे माझे जमेना, पक्षाचा आदेश मोडवेना!

पिंपरी-चिंचवडमध्ये पॅनलचा प्रचार विस्कळीत; उमेदवारांत समन्वयाचा अभाव

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : ज्याला विरोध केला त्यालाच तिकीट मिळाल्याने ते पॅनलमधील अधिकृत उमेदवार झाले आहेत. इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश म्हणून संपूर्ण पॅनलचा प्रचार करण्याची वेळ त्या उमेदवारांवर आली आहे. मने जुळली नसल्याने प्रचारात ताळमेळ नसल्याचे चित्र निवडणूक प्रचारादरम्यान आहे. सर्वच उमेदवार प्रभागात स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबवत आहेत. वाटेल तिकडे प्रचार करण्यात येत आहे. समन्वय व एकजूट नसल्याने अनेक पॅनलचे प्रचाराचे नियोजन फसले आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर न करता थेट उमेदवारांच्या हातात पक्षाचे एबी फॉर्म दिले गेले आहेत. त्यामुळे पॅनलमध्ये कोण कोण उमेदवार आहेत, हे अनेकांना शेवटच्या दिवसापर्यंत माहीत नव्हते. पक्षाशी तसेच, प्रमुख उमेदवारांशी संबंध नसलेल्या अनेक उमेदवारांना ऐनवेळी तिकीट मिळाले. विशेषत: एसटी व एसटी या आरक्षित जागांवरील उमेदवार हे बहुतांशी नवखे आहेत. माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांऐवजी त्यांच्या पत्नी, आई किंवा सून रिंगणात आहेत. दुसऱ्या पक्षातून आलेले उमेदवारही पक्षाने पॅनलमध्ये लादले आहेत.

प्रचार सुरू होऊन आठवडा उलटला तरी, अद्याप पॅनलमध्ये एकसूत्रता दिसून येत नसल्याचे चित्र आहे. चारही उमेदवार आपआपल्या पद्धतीने प्रचार करीत आहेत. तसेच, आपल्या नियोजनानुसार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. चारही उमेदवार एकाच भागांत वारंवार प्रचार करीत असल्याचे दिसून येत आहे. तर, काही जण आपल्या भागांतच प्रचार करीत आहेत. पॅनलमधील इतर उमेदवारांच्या भागात ते प्रचार करीत नसल्याचे दिसून येत आहे.

माहितीपत्रकेही सर्वच उमेदवारांकडून स्वतंत्रपणे छापण्यात आली आहेत. अनेकांनी स्वत:चे छायाचित्रे असलेली माहितीपत्रक छापली आहेत. इतर तीन उमेदवारांना पत्रकात स्थान दिलेले नाही. काही ठिकाणी पॅनलमधील तीन उमेदवारांना ठेंगा दाखवत एकाच उमेदवाराने जाहिरात होर्डिंग लावले आहेत. केवळ आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे. या सर्व कारणांमुळे पॅनलचा प्रचारात समन्वय नसल्याचे प्रचार विस्कळीत झाला आहे. प्रमुख पक्षांच्या पॅनलमध्ये ही अवस्था असून, प्रादेशिक, स्थानिक व अपक्षांच्या पॅनलचे तर काही विचारण्याची सोय नाही.

पॅनलमधील प्रत्येक उमेदवारांनी किती खर्च करायचा, पत्रके कोणी छापायची, रॅली, मेळावा, सभाचा नियोजन कोणी करायचे यावरून एकमत होत नसल्याचे दिसत आहे. जो तो आपआपल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवत आहे. त्यात एकसूत्रीपणा नसल्याने पॅनलचा विस्कळीतपणे प्रचार होत आहे. त्याचा मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. या सर्व कारणांमुळे पक्षाचे पदाधिकारी वैतागले आहेत. वारंवार सूचना देऊनही सर्व उमेदवार एकत्रित येत नसल्याने पदाधिकारीही हताश झाले आहेत.

कार्यकर्त्यांची पळवापळवी

प्रमुख पक्षांची उमेदवार प्रचारात झोकून देऊन काम करतात. अनेक उमेदवारांकडे कार्यकर्ते नाहीत. घरातील तसेच, मित्रमंडळांना घेऊन प्रचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. प्रचारासाठी पक्षाचे कार्यकर्त्यांनी पळवापळवी सुरू आहे. कार्यकर्ते मिळवण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला जात आहे.

प्रचार खर्चावरूनही‌ ‘तू तू- मैं मैं‌’

पॅनलमधील प्रचाराचा खर्च सर्व चार उमेदवारांकडून समान प्रमाणात सोसला जातो. मात्र, त्यात कोण किती खर्च करणार, यावरून पॅनलमध्ये तू तू मैं मैं होत असल्याचे दिसून येत आहे. मीच का खर्च करायचा. तो का खर्च करत नाही, असे सांगत वाद होत आहेत. पॅनलप्रमुख असलेले प्रमुख उमेदवार वाद मिटवून प्रचार सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. परिणामी, खर्चाची मदार पॅनल प्रमुखांवर येऊन पडली आहे.

उमेदवारांचे तोंड एकमेकांविरोधात

प्रमुख राजकीय पक्षाचे पॅनल सर्वच प्रभागात आहेत. मात्र, एका विचाराचे उमेदवार नसल्याने एकमेकांची तोंड विरोधात आहेत. प्रचार सुरू होऊन आठवडा उलटला तरी, पॅनलमधील प्रत्येक उमेदवार स्वतंत्रपणे प्रचार करत असल्याचे चित्र आहे. तीन उमेदवारांचा परिसर सोडून उमेदवार आपल्याच भागात प्रचार करत आहेत. रिक्षा, टेम्पोवर एकाच उमेदवारांचे ठळक छायाचित्रे लावली गेली आहेत. एलईडी व्हॅनवर स्वत: केलेली कामेच दाखवली जात आहेत. पत्रकेही त्याच पद्धतीने छापली आहेत.

बैठका घेऊन सूचना देऊनही दुर्लक्ष

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदान 15 जानेवारीला होणार आहे. प्रचारासाठी केवळ सहा दिवस शिल्लक असल्याचा प्रचाराचा धुराळा उडत आहे. मात्र, पॅनलमधील चारही उमेदवारांमध्ये अद्याप ताळमेळ बसलेला नाही. प्रत्येक जण एक एकट्याने प्रचार करत आहे. प्रचाराचा सूर जुळत नसल्याने पक्षाचे पदाधिकारी वैतागले आहेत. त्रस्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना वारंवार बैठका घेण्याची वेळ आली आहे. सर्व उमेदवार व प्रचारप्रमुखांच्या सातत्याने सूचना देण्यात येत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून प्रचार केला जात आहे. पक्षाचा आदेश म्हणून केवळ दाखवण्यापुरते एकत्र येत प्रचार सुरू असल्याचे दाखवले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT