

कामशेत: मागील काही दिवसांपासून कामशेत शहराच्या इंद्रायणी कॉलनी परिसरात पुन्हा घाणीचे सामाज्य पहावयास मिळत आहे. इंद्रायणी कॉलनीच्या प्रवेशद्वारावरच कचरा अस्ताव्यस्त पडल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यातच त्या घाणीवरील माशा आणि मच्छर यांनी उच्छाद मांडला असून, स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
इंद्रायणी कॉलनीमध्ये जि. प. शाळा असून शाळेजवळ रस्त्याच्या कडेलाच उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्या ठिकाणी शाळेची लहान मुले ये-जा करताना त्यांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. एवढेच नव्हे, तर त्या कचऱ्यात खाद्य शोधण्याकरिता अनेक भटकी कुत्री तेथे दिवसभर ठाण मांडून बसतात. कचरा अस्ताव्यस्त पसरवून टाकतात. त्या भटक्या कुर्त्यांमुळे शालेय मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्याना जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागते. स्थानिक प्रशासनाने यावर काही दिवस तोडगा काढला होता. कचरा वेळच्या वेळी उचलला जात होता. परंतु, पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कचऱ्याची समस्या ही पुन्हा डोके वर काढू लागली आहे. स्थानिक प्रशासन शहराची कचरा कोंडी थांबविण्यात अपयशी ठरताना दिसत आहे.
कचराकुंडीचा अभाव...
शहरात कोठेही कचराकुंड्या नसल्याने नागरिक रस्त्यालगत मोकळ्या जागेत कचरा टाकतात. पण तो कचरा स्थानिक प्रशासनामार्फत रोजच्या रोज उचलला जात नसल्याने रस्त्यावर कचऱ्याचे ढीग जमा होताना दिसत आहेत. या कचरा समस्येमुळे नागरिकांचे आरोग्यदेखील धोक्यात आले असून, घाणीच्या दुर्गंधीने उलट्या व मळमळ यासारखे आजार होताना दिसत आहे. प्रशासनाने या कचरा समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली असून स्थानिकांमध्ये मोठा रोष पहावयास मिळत आहे.
शाळेजवळ शक्यतो स्वच्छता असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. भटकी कुत्री ही कचऱ्याच्या अवती भोवती दिवसभर असतात. अशातच विद्यार्थ्यांना बाहेर सोडणे जिकिरीचे होऊन बसले आहे. एखाद्या कुत्र्याने जर विद्यार्थ्यावर हमला केला तर यास जबाबदार कोण? किमान विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता प्रशासनाने शाळेजवळील कचरा हा रोजच्या रोज उचलावा म्हणजे परिसर हा स्वच्छ राहील व विद्यार्थी मोकळा श्वास घेतील.
जि . प . प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका
मी इंद्रायणी कॉलनीत 20 वर्षांपासून रहात आहे. पण मागील काही दिवसांपासून आमच्या भागात कचरा रोज उचलला जात नाही. घंटा गाडीदेखील रोज येत नाही. कॉलनीच्या सुरवातीलाच रस्त्याच्या कडेला कचरा साठलेला असतो. दोन ते तीन दिवस कचरा उचलला जात नाही. येता जाता खूप दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. येथे मोठ्या प्रमाणावर कुत्री असतात. त्यामुळे प्रवास करताना भीती वाटते. प्रशासनाने योग्य दखल घेणे गरजेचे आहे.
शांताराम कदम, स्थानिक रहिवासी