

पिंपरी: मागील वर्षी 45 संघटीत टोळींवरील 213 आरोपींवर मकोका, 35 गुन्हेगार स्थानबद्ध, तर 368 गुन्हेगार तडीपार केले. एका वर्षात पाच हजार 818 अवैध धंद्यांबाबत गुन्हे नोंदवून 16 कोटी 37 लाख 11 हजार 482 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शरीराविरुद्धचे गुन्हे, मालमत्तेबाबत गुन्हे कमी होण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवायांसह व्हिजिबल पोलिसिंगवर भर देण्यात आली. हद्दीतील एक हजार 45 संवेदनशील ठिकाणे निश्चित करून तिथे सातत्याने पेट्रोलिंग सुरू आहे. त्यामुळेच शहरातील गुन्हेगारीत घट झाल्याचा दावा पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी माध्यमांसमोर याबाबतची तुलनात्मक आकडेवारी ठेवली.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त चौबे बोलत होते. सहपोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली, सर्व पोलिस उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी पोलिस आयुक्त चौबे म्हणाले की, मागील वर्षी एक अपर पोलिस आयुक्त, तीन पोलिस उपायुक्त, सहा सहायक पोलिस आयुक्त अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांना मान्यता मिळाली. उत्तर महाळुंगे, चाकण दक्षिण, दापोडी, बावधन, काळेवाडी, संत तुकाराम नगर या पोलिस ठाण्यांची निर्मिती झाली. त्यामध्ये आठ पोलिस निरीक्षक 12 सहायक पोलिस निरीक्षक, 26 पोलिस उपनिरीक्षक, 282 कॉन्स्टेबल, चार सफाई कामगार अशा 332 पदांना मान्यता मिळाली. नवीन पदे आणि पोलिस ठाण्यांच्या निर्मितीमुळे झोनची रचनादेखील बदलण्यात आली. चौथा झोन नव्याने तयार करण्यात आला.
पूरग््रास्तांसाठी मदतीचा हात
सामाजिक बांधिलकी जपत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पूरग््रास्तांसाठी 44 लाखांची मदत केली. 136 पोलिस पाल्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. सायबर गुन्हेगारांनी केलेल्या फसवणुकीतील 24 कोटी 38 लाख 59 हजार 842 रुपये पीडित नागरिकांना परत दिले. सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.
ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी...
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ज्येष्ठानुबंध’ ही सेवा सुरू केली. वृद्ध नागरिकांना कोणतीही मदत हवी असल्यास ते या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पोलिसांकडे ती मदत मागवू शकतात. घरातील सामान आणण्यापासून ते रुग्णालयाची ने-आण, औषधे आणि तातडीची सेवा पोलिस ज्येष्ठांसाठी करत आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीतील 22 हजार ज्येष्ठ नागरिकांनी याद्वारे आपली नोंदणी केली असून, त्यांना पोलिस मदत करत आहेत. या ज्येष्ठांनुबंध ॲप्लिकेशनमध्ये ज्येष्ठांसाठीच्या सरकारी योजना, जवळची सरकारी रुग्णालये आणि इतर आवश्यक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली असल्याचे पोलिस आयुक्त चौबे यांनी सांगितले.
‘ट्रॅफिक बडी’ला नागरिकांचा प्रतिसाद...
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मागील वर्षी ‘ट्रॅफिक बडी’ ही संकल्पना राबवली. यामध्ये आतापर्यंत आठ हजार 257 नागरिकांनी वाहतुकीशी संबंधित तक्रारी केल्या आहेत. त्यातील सहा हजार 533 तक्रारी सोडवण्यात आल्या असून, 1708 तक्रारी नाकारण्यात आल्या. तर 16 तक्रारींवर काम सुरू असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. तसेच यामध्ये सर्वाधिक तक्रारी वाहतुकीचे नियम मोडल्याबाबत आहेत. त्यापाठोपाठ बेशिस्त पार्किंग, खराब रस्ते, वाहतूककोंडी, अवजड वाहनांबत तक्रारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.