

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून, मतमोजणी 16 जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 691 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून, या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आली आहे. त्याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दीनेश वाघमारे यांनी आढावा घेतला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे महापालिका प्रशासनाकडील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या विविध नियोजनात्मक बाबींची माहिती दिली.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, आचारसंहिता कक्षप्रमुख सुरेखा माने, सहआयुक्त मनोज लोणकर, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, सहायक नगररचनाकार प्रशांत शिंपी, उपायुक्त व्यंकटेश दुर्वास, अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.
बैठकीत मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया, संभाव्य दुबार मतदान टाळण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, स्ट्राँग रूमची सुरक्षित व्यवस्था, मतमोजणी केंद्रांची आखणी, निवडणूक कालावधीत माहिती संकलन व प्रसारासाठी स्थापन करण्यात आलेल्या मीडिया सेलच्या कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात आली.
मतदान व मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्च तपासणीची कार्यवाही प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी राबविण्यात येणार्या मतदान जनजागृती कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासोबत नियमित बैठकांचे आयोजन करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मतदारांच्या तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी तक्रार निवारण केंद्र, प्रसारमाध्यमांमधील जाहिराती व बातम्यांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रसार माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती प्रभावीपणे कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. ईव्हीएम मशीनसाठी आवश्यक साहित्य, पोस्टल बॅलेट मतदानाची व्यवस्था, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून निगराणी ठेवण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
ईव्हीएम मशीन व स्ट्राँग रूमच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करता कामा नये. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपापली कामे अत्यंत काटेकोरपणे व वेळेत पार पाडावीत. ईव्हीएम व स्ट्राँग रूमच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी स्ट्राँग सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, असे आदेश आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. या वेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, डॉ. दिप्ती सूर्यवंशी, डॉ. अर्चना पठारे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, तानाजी नरळे, पूजा दुधनाळे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, कार्यकारी अभियंता शिवराज वाडकर, सोहम निकम, सतीश वाघमारे उपस्थित होते.