पिंपरी: तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. आरोप-प्रत्यारोपामुळे ही निवडणूक ढवळून निघाली आहे. गेले दहा दिवस सर्व 32 प्रभागांत सुरू असलेल्या प्रचारामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रचाराची अकराव्या दिवशी मंगळवार (दि. 13) सायंकाळी साडेपाच वाजता सांगता होत आहे. शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत प्रचाराची सांगता करण्याचा निर्णय उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी घेतला आहे.
महापालिकेच्या 128 पैकी 2 जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित 126 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात तब्बल 692 उमेदवार रिंगणात आहे. प्रचारास प्रत्यक्ष शनिवारी (दि.3) पासून सुरुवात झाली. पदयात्रा, रॅली, रोड शो, गाठीभेटी, बैठका, मेळावा, तसेच कोपरा सभा व जाहीर सभा घेत प्रचाराचा धुरळा उडवण्यात आला. उमेदवारांसह समर्थक व कार्यकर्त्यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला. सकाळपासून सुरू झालेला प्रचार रात्री दहाला थांबत होता.
शहरात भाजपा नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक जाहीर सभा तसेच, रोड शो झाला. त्यांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर देत विकासावर भर दिला. राष्ट्रवादी काँग््रेासचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दहापेक्षा अधिक सभा घेत शहर ढवळून काढले. तर, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाईलवर जाहीर सभा घेत नागरिकांना संबोधित केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा झाली. तसेच, राज्यस्तरीय नेते, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार व आमदारांच्या सभा झाल्या. गेल्या अकरा दिवसांपासून सुरू झालेला प्रचार उद्या सायंकाळी थंडावणार आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करीत रॅली काढण्याचा निर्णय बहुतांश उमेदवारांनी घेतला आहे. त्यात समर्थकांसह कार्यकर्ते, महिला व युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. वाजतगाजत रॅली काढत प्रभागात अखेरचा बार उडला जाणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.
दुसरीकडे, आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाची निवडणूक यंत्रणा सजग झाली आहे. सायंकाळनंतर पक्षाचे झेंडे, बॅनर्स, चिन्ह तसेच, जाहिराती उतरवल्या जाणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके सज्ज झाले आहे. आचारसंहिता कक्षासह इतर पथके शहरभरात कार्यरत झाले आहेत.
मकर संक्रांतीला उमेदवारांनी भेटवस्तूंचे वाटप केल्यास गुन्हा
राजकीय पक्षाचे नेते, उमेदवार, कार्यकर्ते हे बुधवार (दि. 14) मकर संक्रांती सणाच्या कार्यक्रमात व्यक्तीगत सहभागी होऊ शकतात. त्या सणानिमित्ताने राजकीय नेते किंवा उमेदवाराने कोणत्याही वस्तूंचे वाटप करू नये. त्यासाठी कुठल्याही सार्वजनिक मंडळाचा आधार घेऊ नये. भोजनावळी किंवा जेवणाचे कार्यक्रमाचे आयोजन करू नये. तसे केल्यास महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या आचारसंहिता कक्षाकडून कारवाई केली जाणार आहे. मकर संक्रांती सणाला महिलांना वाण देण्याच्या उद्देशाने राजकीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी वस्तूंचे, पैशांचे वाटप करू नये. निवडणूक आचारसंहितेमध्ये येणाऱ्या सार्वजनिक सणामधील आचरणाबाबत राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे विहित केलेली आहेत. मते मागण्यासाठी लाच देणे व लाच घेणे हा भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 170 नुसार गुन्हा असून, यासाठी एक वर्षाच्या कालावधीपर्यंत शिक्षा होऊ शकते. शहरांमध्ये एकूण 34 भरारी पथके व 34 एसएसटी पथके कार्यरत आहेत. या सर्वांची अशा घटनांवर 24 तास नजर राहणार आहे. अशी कोणतीही घटना होत असलेचे निदर्शनास आल्यास तात्काळ महापालिकेच्या मुख्य कार्यालयास व संबंधित क्षेत्रीय कार्यालयात स्थापन केलेल्या आचारसंहिता कक्षास संपर्क करावा, असे आवाहन आचारसंहिता कक्षप्रमुख सुरेखा माने यांनी केले आहे. तसेच, नागरिकांनी या प्रलोभनाला बळी पडू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.