Pimpri Chinchwad DP Plan Public Hearing Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad DP Plan: पिंपरी-चिंचवडच्या डीपी प्लॅनवर ५६ हजार ७७९ हरकती; सुनावणी अंतिम टप्प्यात

पिंपळे गुरव, दापोडी, मामुर्डी आणि रावेतची सुनावणी शिल्लक; १५ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून आराखडा राज्य शासनाकडे पाठवणार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारुप विकास योजना आराखड्यावर (डीपी प्लान) प्राप्त झालेल्या ५६ हजार ७७९ हरकतींवर सुनावणी पुढील आठवड्यात संपणार आहे. आतापर्यंत एकूण २४ भागांचे एकूण ५२ हजार ९०९ जणांची सुनावणी घेण्यात आली आहे. तर, पिंपळे गुरव, दापोडी, मामुर्डी व रावेत या भागांची सुनावणी शिल्लक आहे. ती प्रक्रिया पुढील आठवड्यात पूर्ण केली जाणार आहे. डिसेंबर महिन्यात शासनाकडे आराखडा पाठविण्यात येणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

महापालिकेकडून सुधारित प्रारुप विकास योजना आराखडा १५ मे २०२५ ला प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर १४ जुलै २०२५ पर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात आल्या. आराखड्यावर तब्बल ५६ हजार ७७९ जणांनी हरकती नोंदवल्या आहेत. या हरकतींवर आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात तीन ऑगस्टपासून सुनावणी घेण्यास सुरुवात केली. सात सदस्यीय समितीच्या माध्यमातून हरकतींवर सुनावणी सुरु आहे. एकाच विषयाबाबत, काही आरक्षणांवर गठ्ठेच्या गठ्ठे हरकती आहेत.

हरकतदाराचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले जात आहे. पिंपळे गुरव परिसराची सुनावणी शनिवारी (दि.२८) घेण्यात येणार आहे. त्यासाठी २४३ हरकती आहेत. तर, दापोडी भागाची सुनावणी सोमवारी (दि.३०) आहे. त्या भागाच्या एकूण ४९९ हरकती आहे. त्याच दिवशी मामुर्डी व रावेत भागाची सुनावणी घेऊन संपूर्ण हरकतींवरील सुनावणी सोमवारी (दि.३०) पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे नगररचना विभागाने सांगितले. नोटीस मिळाल्यानंतर काही नागरिक सुनावणीला गैरहजर होते. अशा नागरिकांना संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर पुन्हा संधी दिली जाणार आहे. शेवटच्या टप्प्यात शासकीय यंत्रणांनी घेतलेल्या हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे.

सुनावणी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करून शासनाकडे पाठवणार

आराखड्यावर कार्यवाही पूर्ण करण्याची बारा महिन्यांची मुदत १४ मे २०२६ पर्यंतच होती. मात्र, महापालिका निवडणूक आचारसंहितेमुळे एक महिना आराखड्याची प्रक्रिया रखडली होती. आचारसंहितेचा कालावधी वगळल्याने मुदत १६ जून २०२६ रोजी संपली. त्यामुळे आराखड्यावरील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ घेण्यात आली आहे. आता १५ डिसेंबर २०२६ पर्यंत सुनावणी पूर्ण करून अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

सुधारित प्रारूप विकास आराखड्यावर आलेल्या सर्वच हरकतींवर सुनावणी पूर्ण होत आली आहे. संपूर्ण हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर समिती योग्य तो बदल करुन आराखडा पुण्यातील नगररचना विभागाकडे पाठवेल. त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी आराखडा राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, असे महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे यांनी सांगितले.

१७३.२४ चौरस कि.मी.चा डीपी

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून वर्ग करण्यात आलेल्या क्षेत्रासह एकूण १७३.२४ चौरस किलोमीटर परिसराचा डीपी तयार करण्यात आला आहे. सन २०३१ पर्यंत ४२ लाख ४० हजार आणि सन २०४१ पर्यंतची ६१ लाख लोकसंख्या गृहित धरून शहर विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे डीपीत नवीन आरक्षणांचा अंतर्भाव करण्यात आला आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT