पिंपरी: दसरा संपताच आता दिवाळीच्या तयारीला वेग येऊ लागला आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठांमध्ये फराळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, शाळांमध्ये सुरू असलेल्या सहामाही परीक्षांमुळे अनेक मुले अभ्यासात व्यस्त असून, दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये अद्याप अपेक्षित गर्दी झालेली नाही. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर खरेदीला अधिक वेग येईल, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
दिवाळी म्हटले की, घराघरांत फराळाची तयारी, नवीन कपड्यांची खरेदी आणि आकर्षक सजावटीची लगबग सुरू होते. यंदाही शहरातील गृहिणींनी दिवाळीच्या फराळासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. पोहे, रवा, बेसन, मैदा, साखर, गूळ, तेल, तूप, सुकामेवा यांसह चकली, चिवडा, लाडू, करंजी आणि शंकरपाळे तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे.
अनेक कुटुंबांमध्ये दिवाळीचा फराळ घरीच तयार करण्याची परंपरा आजही जपली जाते. त्यामुळे शाळा सुरू असताना आणि मुलांच्या परीक्षांचे वेळापत्रक सांभाळत गृहिणींकडून फराळाच्या तयारीचे नियोजन केले जात आहे. काही पालक सकाळी मुलांना शाळेत सोडल्यानंतर किंवा मुले शाळेत गेल्यावर बाजारपेठेत जाऊन आवश्यक साहित्य खरेदी करत असल्याचे चित्र दिसत आहे.
'घरीच फराळ करण्यासाठी साहित्य खरेदी सुरू'
गृहिणी सविता आहेर म्हणाल्या, दिवाळीत आम्ही फराळ घरीच तयार करतो. त्यामुळे चकली, चिवडा, लाडू आणि करंजीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू झाली आहे. मुलांच्या परीक्षा आणि घरातील इतर कामे सांभाळून दिवाळीची तयारी करावी लागत असल्याने आतापासूनच साहित्य खरेदी करण्यावर भर दिला आहे.
परीक्षानंतर फटाके स्टॉल वाढणार
दुसरीकडे, फटाके विक्रेत्यांनाही मुलांच्या सहामाही परीक्षा संपण्याची प्रतीक्षा आहे. सध्या अनेक विद्यार्थी अभ्यासात व्यस्त असल्याने फटाके खरेदीकडे त्यांचे लक्ष कमी आहे. परीक्षा संपल्यानंतर पालकांसोबत मुले फटाके खरेदीसाठी बाहेर पडतील आणि शहरातील विविध भागांमध्ये फटाक्यांचे स्टॉल वाढतील, अशी अपेक्षा फटाके विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.