Fire Brigade Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Diwali Fire Safety: दिवाळीत आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये २५० अग्निशमन कर्मचारी तैनात

२० मोठ्या अग्निशमन वाहनांसह शहरात गस्त; २२ संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष, अग्निशमन यंत्रणा २४ तास सतर्क

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: दिवाळीत फटाके फोडताना आगीच्या दुर्घटना घडतात. त्या घटना टाळता याव्यात, यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत 250 कर्मचार्‍यांचे विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच, 20 मोठी अग्निशमन वाहने व 7 ते 8 वाहनांच्या माध्यमातून शहरभर गस्त घालण्यात येणार आहे. शहरातील गर्दीची ठिकाणे, संवेदनशील परिसर व आगीच्या घटना घडण्याची शक्यता असलेल्या सुमारे 22 ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच, अग्निशमन यंत्रणा 24 तास कार्यरत ठेवण्यात आली आहे.

मागील वर्षी दिवाळीदरम्यान आगीच्या सुमारे 70 घटना घडल्या होत्या. या घटनांचा अभ्यास करून धोके लक्षात घेण्यात आले असून, त्यानुसार शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करून विशेष लक्ष ठेवण्यासाठी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. अग्निशमन विभागातील सर्व कर्मचारी दोन शिफ्टमध्ये कार्यरत राहणार असून, शहरातील अग्निशमन केंद्रांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी 24 तास यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार आहे.

शहरातील शगुन चौक, पिंपळे गुरव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह परिसर, मॅगझिन चौक, त्रिवेणीनगर, तापकीर चौक, चिंचवड लिंक रोड, वाकड, दत्त मंदिर रस्ता, डांगे चौक, जगताप डेअरी, रावेत, मुकाई चौक यांसह शहरातील विविध संवेदनशील स्थळांवर अग्निशमन विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे, असे अग्निशमन विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले.

अधिक आवाजाचे फटाके फोडल्यास कारवाई करणार

शहरात 125 डेसिबलपर्यंत आवाजाची पातळी असलेल्या फक्त ग्रीन फटाक्यांच्या विक्रीस परवानगी आहे. याव्यतिरिक्त पारंपरिक फटाक्यांची साठवणूक, वितरण, विक्री आणि वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रतिबंधित फटाक्यांची विक्री करताना आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी ग्रीन फटाक्यांचा वापर करावा. फटाके फोडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

अग्निशमन केंद्रांचे संपर्क क्रमांक

पिंपरी मुख्यालय - 9922501475, भोसरी - 9922501476, प्राधिकरण - 9922501477, रहाटणी - 9922501478, चिखली - 8669894101, तळवडे - 9552523101, थेरगाव - 7030907999, मोशी - 7264943333, चोवीसावाडी - 7758992817, नेहरूनगर - 8484884101

नागरिकांनी ही खबरदारी घ्यावी..

  • गर्दीच्या भागात, इमारतींच्या जवळ किंवा वाहनांच्या आसपास फटाके फोडू नयेत.

  • फटाका पेटवल्यानंतर तो न फुटल्यास पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये.

  • नायलॉन किंवा सिंथेटिक कपड्यांऐवजी सुती कपडे परिधान करावेत.

  • ज्वलनशील वस्तू, गॅस सिलिंडर, विद्युत तारा तसेच, पेट्रोल किंवा डिझेलच्या जवळ फटाके फोडू नयेत.

  • फटाके फोडताना सुरक्षित अंतर राखावे. लहान मुलांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी.

  • ज्वलनशील पदार्थांचा साठा असलेल्या ठिकाणी फटाके उडवू नयेत.

  • फटाके फोडताना जवळ पाण्याची बादली किंवा अग्निसुरक्षेसाठी आवश्यक साधने ठेवावीत.

  • फटाक्यांचा साठा घरात, वाहनांमध्ये किंवा कचर्‍याजवळ ठेवू नये.

  • आग लागल्यास स्वतः आग विझविण्याचा प्रयत्न न करता तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT