

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील घोषित आणि अघोषित झोपडपट्टीत राहणार्या नागरिकांची दिवाळी गोड होणार आहे. महापालिकेच्या वतीने झोपडपट्टीतील रहिवाशांना चादर, बेडशीट, ब्लॅंकेट, पिलो कव्हर, सतरंजी, बस्कर सतरंजी, नॅपकिन, स्वेटर, कापडी पिशवी, साडी व इतर साहित्य असे संसारोपयोगी साहित्य तेथील सज्ञान महिलांना मोफत वितरीत केले जाणार आहे.
महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून शहरातील घोषित व अघोषित झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या सज्ञान महिलांना या साहित्यांचे वितरण केले जाते. इतर कल्याणकारी याजेनेतून यावर खर्चा केला जातो. शासन दर निश्चितीनुसार सोलापूर येथील श्री जगदंबा महिला रेडिमेड ड्रेसेस, विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित या संस्थेमार्फत हे संसारोपयोगी साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. ही संस्था अंध, अपंग व दिव्यांगाकरिता कार्यरत आहे. शालेय गणवेश व इत साहित्य शासन दराने खरेदी करण्याचे आदेश त्या संस्थेला 27 सप्टेंबर 2023 ला देण्यात आले आहेत.
संस्थेमार्फत झोपडपट्टीत वास्तव्यास आलेल्या सज्ञान महिलांना त्यांचे आधारकार्डची पडताळणी करून हे साहित्य दिले जाणार आहे. त्यासाठी समाज विकास विभागाच्या इतर कल्याणकारी योजना तसेच, अखर्चित रक्कम व इतर विभागाकडील उपलब्ध अखर्चित रकमेतून खर्च केला जाणार आहे. त्यासाठी येणार्या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली आहे.
एका सज्ञान महिलेस मिळणार इतके साहित्य
चादर दोन नग, बेडशीट चार नग , ब्लॅंकेट दोन नग, पिलो कव्हर आठ नग, सतरंजी दोन नग, बस्कर सतरंजी दोन नग, नॅपकिन सहा नग, स्वेटर दोन नग, कापडी पिशवी चार नग, साडी दोन नग, ब्लाऊज पीस दोन नग व इतर साहित्य.
गोरगरीब महिलांच्या कल्याणासाठी उपक्रम
शहरात झोपडपट्टीत राहणार्या गोरगरीब माता-भगिनी महिलांना महापालिकेकडून संसारोपयोगी साहित्य मोफत वितरीत केले जाते. त्या साहित्यांमुळे त्या महिलांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच, त्यांच्या दैनंदिन गरजा भागण्यास सहाय होणार आहे. महिलांच्या कल्याणासाठी महापालिकेकडून हा उपक्रम राबवला जातो, असे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.