पिंपरी: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून, पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठ फराळाच्या खमंग वासाने दरवळू लागली आहे. पूर्वी घरोघरी महिला चार-चार दिवस फराळ बनवत असत, मात्र, आता विभक्त कुटुंब पद्धत, नोकरदार महिलांची संख्या वाढल्याने आणि महागाईमुळे अनेकांनी रेडिमेड फराळाला पसंती दिली आहे.
ऑफिस आणि घर दोन्ही आघाड्यांवर जबाबदारी सांभाळताना महिलांना घरात फराळ करायला वेळ मिळत नसल्याने रेडिमेड फराळाला मागणी वाढते आहे. मागील वर्षीपेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी यंदा फराळाला मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. घरगुती महिला व्यावसायिक, बचतगटांना यामुळे फराळविक्रीतून चांगला नफा होत आहे. फराळ हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. दिवाळीत फराळ बनवण्याची परंपरा असली तरीही हल्ली वर्षभर इतर दिवशीही फराळ खाल्ला जातो. दिवाळीला त्याचे विशेष महत्व असून या काळात घरात फराळ बनवण्यासाठी वेळ मिळतोच असे नाही, या परिस्थितीत बाहेरुन फराळ विकत घेण्याकडे कल वाढला आहे.
घरातूनच कमाईचा मार्ग
अगदी एका आठवड्यावर दिवाळी आली असल्याने फराळाच्या ऑर्डर दिल्या जात आहेत. एखादा किलो का होईना पण फराळ विकत घेतला जातो. चविष्ट आणि चांगल्या प्रतीचा फराळ विकत घेण्यासाठी घरगुती फराळाला प्राधान्य दिले जाते. यामुळे हल्ली घरगुती महिला व्यावसायिकांचे प्रमाणही वाढते आहे. यामध्ये काही महिलांना आपले स्वयंपाकाचे कौशल्य वापरुन आर्थिक कमाईदेखील करता येते. तसेच घरातूनच कमाईचा एक मार्ग असल्याने अनेक महिला हा व्यवसाय करत आहेत. घरगुती फराळ असल्याने त्यावर विश्वासही ठेवला जातो.
कॉम्बो पॅकला मागणी
मार्केटमध्ये यंदा सर्वाधिक मागणी कॉम्बो पॅकला आहे. पूर्वी किलोवर फराळ घेतला जात असे, आता 250 ग्रॅमचे कॉम्बो पॅक आले आहेत. यामध्ये चकली, लाडू, करंजी, चिवडा आणि शंकरपाळी असे पाच पदार्थ 600 ते 800 रुपयांत मिळतात. ५०० गॅमचे १३०० रुपये छोट्या कुटुंबासाठी हा पॅक पुरेसा होतो आणि पदार्थ वाया जात नाहीत.
याशिवाय आरोग्याबाबत जागरूक असलेल्यांसाठी यंदा नाचणीची चकली, गुळाची चकली, बेक्ड चकली, मिलेट्सचे लाडू, साखरेऐवजी गुळ वापरलेले लाडू असे हेल्दी पर्यायही आले आहेत. त्याला तरुण वर्गाची पसंती मिळत आहे.
घरगुती फराळाला हल्ली वर्षभर मागणी असतेच. दिवाळीच्या आदल्या आठवड्यात ऐनवेळी फराळाच्या ऑर्डर देणाऱ्यांची संख्या अधिक असते. चकली, अनारसे, चिरोटे यांना विशेष मागणी असते. यावर्षी खोबरे, तेल महाग झाल्याने फराळाचा दर थोडा वाढला आहे.सविता शिंदे (फराळ विक्रेत्या)
यंदा कमर्शियल गॅसचे दर वाढले आहेत. तसेच तेल, तूप यांची दरवाढ यामुळे फराळाच्या दरात वाढ झाली आहे.अंकिता राऊत (फराळ विक्रेत्या)