पिंपरी: गणेशोत्सव म्हटला की ढोल-ताशाशिवाय शोभा नाही. गणेशोत्सवाच्या दोन महिनेआधीच ढोल-ताशा पथकांच्या वादनाला सुरुवात होत असते. आता उत्सवाला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मिरवणुकीमध्ये सादरीकरणास ढोल-ताशांची मागणी वाढली आहे. कारागीरांकडून ढोल-ताशांच्या बांधणीला वेग आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात ढोल-ताशा बनवणारे कारागिर सध्या ढोल-ताशा बांधणीत व्यस्त झाल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ढोल-पथकांची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच ढोल-ताशाच्या साहित्याचीही मागणी वाढली आहे.
पुण्यातील बाजारपेठांत ढोल-ताशा विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड मध्येही असलेल्या दुकानांत यंदा ढोल-ताशांची मागणी जोरावर आहे. पिंपरी चिंचवड भागांतदेखील मोठ्या प्रमाणात ढोलताशा पथक आहेत. त्यामुळे या पथकांना लागणारे ढोल-ताशा शहरातच मिळत आहेत.
ढोल, ताशा आणि इतर साहित्याचीही यंदा मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, त्यामुळे व्यावसायिकही खूश आहेत. येणार्या ऑर्डर पूर्ण करण्यात कारागीर व्यस्त आहेत. ढोलांना कातडी चढविणे, रस्सी बांधणे, ताशांची ट्युनिंग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
चामड्याचे अन् फायबरचे ढोल
दर वेळी थोडेफार किंमतीत बदल होत असतात. चामड्याचे ढोल आकारानुसार 3००० हजार ते ४००० हजारपर्यंत उपलब्ध आहेत. तर फायबर चे २६०० रुपयांना उपलब्ध आहे. तर ताशामध्ये पितळी ताशा ८५०० रुपये आणि स्टिलचे १५०० रुपयांपर्यंत मिळतात. शहरात ढोल ताशा पथके मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे अजूनही ऑर्डर सुरू आहेत. तसेच दुरुस्तीसाठीदेखील वाद्य येतात. यावर्षी एकंदर चांगली मागणी आहे, असे कारागीराने सांगितले.