

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन पाण्याचे नवनवीन स्त्रोत निर्माण करण्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. पवनेसह भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून भूमिगत जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाणार आहे. तसेच, लोणावळाजवळील ठोकरवाडी धरणातून 600 एमएलडी पाणी शहरासाठी आणण्याचे नियोजन सुरू आहे, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
सध्या शहराला पवना धरणातून 550 एमएलडी पाणी घेतले जात आहे. आंद्रा धरणातून निजोघे येथील इंद्रायणी नदी बंधार्यावरून 100 एमएलडी पाणी घेतले जात आहे. तसेच, एमआयडीसीकडून 30 एमएलडी शुद्ध पाणी घेतले जात आहे. भामा आसखेड धरणातून भूमिगत जलवाहिनीद्वारे 167 एमएलडी पाणी आणण्याचे काम अद्याप सुरू आहे. ते पाणी शहराला फेब्रुवारी 2027 पर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
शहरासाठी पाण्याचे स्त्रोत वाढवण्यासाठी विविध प्रकाराचे प्रयत्न केले जात असून, शासनाकडे त्या संदर्भात पाठपुरावा केला जात आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, तब्बल 1 हजार 200 कोटी खर्चाच्या पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातला 750 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे.
त्या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच मुंबईत बैठक होणार आहे. शेतकर्यांना विश्वासात घेऊन तो प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. एकूण 35 किलोमीटर लांबीची ही जलवाहिनी आहे. आंद्रा धरणातून थेट पाणी आणण्यासाठी भूमिगत जलवाहिनी सुरू करण्याची निविदा लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे शहराला 100 एमएलडी शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. ठोकरवाडी धरणात जलविद्युत निर्मिती केली जाते. तेथून शहराला 600 एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाच्या जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
चाळीस टक्के गळती रोखण्यासाठी उपाययोजना
महापालिकेकडून करण्यात येणार्या पाणीपुरवठ्यातून तब्बल 40 टक्के पाणी गळती होते. ती गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील एक लाख घरगुती नळ जोडण्यासाठी स्मार्ट वॉटर मीटरिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. जुनी जलवाहिनी काढून नवीन 250 किलोमीटर लांबीची नीन जलवाहिनीचे जाळे तयार केले जाणार आहे. पाणीपुरवठा वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्कॉडा प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.