पिंपरी: शहरात एकीकडे 'झाडे लावा, झाडे जगवा' म्हणत वृक्षारोपणाचे उपक्रम मोठ्या थाटामाटात केले जातात. लाखो रुपयांचा खर्च करून रोपे लावली जातात. मात्र, दुसरीकडे सुरू असलेल्या विकासकामांमध्ये वर्षानुवर्षे सावली देणाऱ्या मोठ्या झाडांच्या खोडांवर यंत्रांचे घाव बसत आहेत. काही ठिकाणी विकासकामे करताना झाडे उन्मळून पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे 'झाडे लावण्यापेक्षा आधी अस्तित्वात असलेली झाडे वाचविण्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहर परिसरात विकासकामे सुरू असून, महामार्गालगत, उपनगरांमध्ये पदपथ, स्ट्रॉर्म वॉटर लाईनसह विविध कामे सुरू आहेत; मात्र विकासकामांच्या नावाखाली रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्षे उभ्या असलेली झाडेच उन्मळून पडत असतील किंवा त्यांचे अस्तित्व धोक्यात येत असेल, तर हा विकास नेमका कोणासाठी, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पदपथाचे काम करताना खोदकाम, माती काढणे, साहित्याची वाहतूक यासाठी यंत्रांचा वापर केला जातो. या प्रक्रियेत रस्त्यालगत असलेल्या झाडांच्या खोडांना धक्के लागतात. अनेकदा झाडांच्या मुळांच्या परिसरातच खोदकाम होत असल्याने झाडांची पकड सैल होण्याची शक्यता असते. कामाचा वेग महत्त्वाचा असला तरी झाडांच्या सुरक्षेचा विचार होणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी वृक्षसंरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाते का, याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खोडावरील जखमा सांगतात कामाची 'पध्दत'
काही झाडांच्या खोडांवर मोठ्या प्रमाणात साल निघालेली दिसत आहे. यंत्रसामग्री किंवा बांधकाम साहित्याच्या धक्क्यामुळे झाडांना झालेल्या या जखमा केवळ बाह्य स्वरूपाच्या नसतात. झाडाच्या खोडाचे संरक्षण करणारी साल खराब झाल्यास झाडाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. वर्षानुवर्षे वाढलेल्या झाडाला काही मिनिटांच्या निष्काळजीपणामुळे झालेली जखम भरून काढण्यासाठी मात्र वर्षे लागतात. त्यामुळे विकासकाम करणाऱ्या यंत्रणांनी 'काम पूर्ण झाले' एवढ्यावर न थांबता त्या कामामुळे झाडांचे किती नुकसान झाले, याचीही पाहणी करणे गरजेचे आहे.
उन्मळलेले झाड; जबाबदारी कोणाची?
काम सुरू असताना एखादे झाड उन्मळून पडले, मुळांना इजा झाली किंवा खोडाला गंभीर नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? संबंधित ठेकेदाराची, काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची की संबंधित विभागाची? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर नागरिकांना मिळणे गरजेचे आहे. त्या प्रकल्पाच्या कामामुळे सरकारी अथवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असेल, तर त्याची नोंद आणि जबाबदारी निश्चित होणेही तितकेच आवश्यक आहे.
वाहनचालकांवर धोक्याची छाया
महामार्गालगत सुरू असलेल्या पदपथ व स्ट्रॉम वॉटरच्या कामांमुळे अनेक झाडांच्या मुळांना आणि खोडांना इजा होत असल्याचे चित्र आहे. अशा प्रकारे झाडांची मुळे कमकुवत झाल्यास अचानक झाड कोसळून वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने महामार्गावर वाहनांचा वेग अधिक असल्याने क्षणार्धात कोसळलेले झाड मोठ्या अपघाताचे कारण ठरू शकते.
वृक्षारोपण फक्त फोटोपुरते?
वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांची गर्दी होते. रोपे लावली जातात, फोटो काढले जातात आणि पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले जातात. मात्र त्या रोपांचे पुढे काय होते, त्यांची नियमित देखभाल होते का, याचा हिशेब किती वेळा घेतला जातो? आता नव्याने झाडे लावण्यापेक्षा जुन्या आणि मोठ्या झाडांचे संरक्षण हा प्रशासनाच्या पर्यावरण धोरणाचा केंद्रबिंदू असणे गरजेचे आहे.
प्रश्न विचारायचा तरी कोणाला?
विकासकामाबाबत नागरिकांनी प्रश्न विचारायचा म्हटले, तर संबंधित विभागाचा अधिकारी कोण? कामाची जबाबदारी कोणाकडे? तक्रार कुठे करायची? नुकसान झालेल्या झाडाबाबत कारवाई कोण करणार? याचे स्पष्ट उत्तर नागरिकांना मिळत नसल्याची नाराजी आहे. विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क होत नसेल किंवा नागरिकांच्या प्रश्नांना प्रतिसाद मिळत नसेल, तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद नेमका कुठे हरवला आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
शहराचा विकास नक्कीच झाला पाहिजे. पदपथही हवेत आणि पावसाच्या पाण्याचा निचराही व्यवस्थित झाला पाहिजे. परंतु, त्यासाठी वर्षानुवर्षे वाढलेल्या झाडांचे नुकसान करणे टाळले पाहिजे. प्रशासनाने झाडे लावण्याचे फोटो काढण्यापेक्षा अस्तित्वात असलेली मोठी झाडे वाचवली तर पर्यावरणाचे खरे काम होईल.श्रीशैल मेटगार, नागरिक