

चाकण: चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) उपाययोजना सुरू केल्या आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चार पर्यायी बाह्यवळण मार्ग प्रस्तावित करण्यात आले असून, त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय, प्रमुख जिल्हा मार्गांच्या सुधारणेची कामेही प्रगतिपथावर आहेत.
पीएमआरडीएकडून चाकण आणि तळेगाव परिसरासाठी पूर्व बाह्यवळण मार्ग प्रस्तावित असून, त्याअंतर्गत चार रस्ते विकसित केले जाणार आहेत. तळेगाव-चाकण महामार्गावरील हिंगणे चौक ते चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा तीनमधील खराबवाडीला जोडणारा ९०० मीटर लांबीचा व ३० मीटर रुंद रस्ता प्रस्तावित आहे. हा मार्ग हिंगणे चौकाला फोक्सवॅगन कंपनी परिसराशी जोडणार आहे. त्यामुळे तळेगाव, तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रातील टप्पा दोन व तीनमधून पुणे आणि नाशिककडे जाणारी वाहतूक थेट पुणे-नाशिक महामार्गाशी जोडली जाणार असून, तळेगाव चौक आणि चाकण परिसरातील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
नाणेकरवाडीतील सॅनी कंपनी ते समृद्धी सीएनजी पंपादरम्यान १.२ किलोमीटर लांबीचा आणि १५ मीटर रुंद रस्ता तयार केला जाणार आहे. हा मार्ग तळेगाव, तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रातील टप्पा दोन व तीनला पुणे-नाशिक महामार्गाशी जोडणार आहे. त्यामुळे मुख्य चाकण चौकातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
मेदनकरवाडीतील बंगला वस्ती चौक ते रासे फाट्यापर्यंत २.५ किलोमीटर लांबीचा आणि ३५ मीटर रुंद रस्ता प्रस्तावित आहे. हा मार्ग पुणे, तळेगाव, तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रातील टप्पा दोन व तीनला पुणे-नाशिक महामार्गावरून रासे फाटा येथील शिक्रापूर राज्य मार्गाशी जोडणार आहे.
तसेच, पश्चिम बाह्यवळण मार्गाअंतर्गत पुणे-नाशिक महामार्गाला चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा पाचशी जोडणारा ८५० मीटर लांबीचा आणि ४५ मीटर रुंद रस्ता विकसित केला जाणार आहे. यामुळे चाकण चौक आणि आंबेठाण चौकातील अवजड वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचा दावा पीएमआरडीएकडून करण्यात आला आहे.
शंभर कोटींच्या निधीची तरतूद
चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीला गती देण्यासाठी पीएमआरडीएने प्रमुख जिल्हा मार्गांच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. यासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, ही कामे प्रगतिपथावर आहेत. चार बाह्यवळण मार्गांसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून, या प्रकल्पांमुळे भविष्यात औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक अधिक सुरळीत होईल, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल यांनी दिली.
जिल्हा मार्गांचा विकास
चिखली ते मोई - १.६५ किलोमीटर
कुरुळी फाटा ते निघोजे - २.५ किलोमीटर
आळंदी फाटा (चाकण) ते आळंदी रस्ता - ४ किलोमीटर
चऱ्होली खुर्द ते आळंदी-मरकळ - २ किलोमीटर
निघोजे ते चाकण एमआयडीसी - १.२५ किलोमीटर
खालुंब्रे ते चाकण एमआयडीसी टप्पा दोन - १.७५ किलोमीटर