Pimpri Chinchwad Women Police Officers: पिंपरी-चिंचवड पोलिस दलात ६४ महिला अधिकारी; नेतृत्वाच्या ‘फ्रंटलाइन’वर मात्र प्रतिनिधित्व कमी

तपास पथकांच्या नेतृत्वात एकही महिला अधिकारी नाही; पिंपरी पोलिस ठाणे ठरले अपवाद
Police
Police file photo
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: पोलिस दलात महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढत असली, तरी प्रत्यक्ष नेतृत्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व अजूनही मर्यादित असल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातही बहुतांश पोलिस ठाण्यांचा कारभार पुरुष अधिकाऱ्यांकडेच आहे. तसेच, पोलिस ठाण्याचे 'नाक' समजल्या जाणाऱ्या तपास पथकांच्या नेतृत्वातही सध्या महिला अधिकारी नाहीत. प्रभारी अधिकारी म्हणून पिंपरी पोलिस ठाणे याला अपवाद ठरत आहे.

Police
Chakan Talegaon Traffic: चाकण-तळेगाव वाहतूक कोंडी सुटणार? पीएमआरडीएकडून चार बाह्यवळण मार्गांचा प्रस्ताव

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात सध्या पोलिस उपायुक्त पदावर एक, सहायक पोलिस आयुक्त पदावर तीन, पोलिस निरीक्षक पदावर सहा, सहायक पोलिस निरीक्षक पदावर १८ आणि पोलिस उपनिरीक्षक पदावर ३६ महिला अधिकारी कार्यरत आहेत. वरिष्ठ ते कनिष्ठ अशा विविध स्तरांवर महिला अधिकाऱ्यांची उपस्थिती असली, तरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किंवा तपास पथकप्रमुख म्हणून त्यांना तुलनेने कमी संधी मिळत असल्याचे 'पुढारी'ने घेतलेल्या आढाव्यात समोर आले आहे.

Police
Akurdi Nigdi School Traffic: आकुर्डी-निगडीतील शाळांबाहेर वाहतूक कोंडीचा विळखा; विद्यार्थी-पालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडण्याची वेळ

...म्हणून महिला अधिकाऱ्यांना दुय्यम नियुक्ती ?

नियुक्ती करताना उपलब्ध मनुष्यबळ, अधिकाऱ्यांचा अनुभव, वैयक्तिक परिस्थिती आणि २४ तास उपलब्ध राहण्याची क्षमता अशा बाबींचा प्रशासनाकडून विचार केला जात असल्याचे पोलिस वर्तुळातून सांगितले जाते. काही महिला अधिकाऱ्यांवर लहान मुलांसह कौटुंबिक जबाबदाऱ्या असल्याने अनियमित ड्युटीचे तास आणि कुटुंब यांचा मेळ घालणे आव्हानात्मक ठरते. महिलांना जबाबदारी देताना या बाबींचाही विचार केला जातो. मात्र, ही परिस्थिती सर्वच महिला अधिकाऱ्यांना लागू होत नाही. अनेक महिला अधिकारी गंभीर गुन्ह्यांचा तपास, बंदोबस्त, रात्रीची ड्युटी आणि संवेदनशील जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत. त्यामुळे नेतृत्वाच्या संधींमध्ये त्यांना अधिक प्रमाणात पुढे आणता येईल का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Police
Pavan Maval Soybean Pest: पवन मावळात सोयाबीनवर किडींचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सतर्कतेचा इशारा

पिंपरी पोलिस ठाणे अपवाद

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पिंपरी पोलिस ठाणे याला अपवाद ठरले आहे. या ठाण्याचा कारभार महिला अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. यापूर्वी शिरगाव, संत तुकारामनगर आणि देहूरोड या पोलिस ठाण्यांची धुराही महिला अधिकाऱ्यांनी सांभाळली आहे. त्यामुळे इतर पोलिस ठाण्यांमध्येही अनुभवी महिला अधिकाऱ्यांना प्रभारी पदाची संधी देता येऊ शकते. पोलिस दलात महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जात असताना केवळ संख्यात्मक प्रतिनिधित्वापेक्षा निर्णयप्रक्रिया आणि प्रत्यक्ष नेतृत्वातील सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे काही महिला अधिकारी खासगीत सांगतात.

तपास पथकातही नेतृत्वाचा अभाव

प्रत्येक पोलिस ठाण्यातील तपास पथक हे त्या ठाण्याचे महत्त्वाचे अंग मानले जाते. घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरी, दरोडा, खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पथकाला दिवस-रात्र काम करावे लागते. आरोपींचा माग काढण्यासाठी शहराबाहेर किंवा राज्याबाहेरही जावे लागते. अचानक मिळालेल्या माहितीवर छापा टाकणे, आरोपींचा पाठलाग करणे किंवा सलग अनेक दिवस तपास करणे, अशी या पथकाची कार्यपद्धती असते. त्यामुळे तपास पथकांच्या प्रमुखपदीही पुरुष अधिकाऱ्यांचेच वर्चस्व दिसते. आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांच्या तपास पथकांची धुरा सध्या एकाही महिला अधिकाऱ्याकडे नाही. महिला अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीय असतानाही तपासाच्या 'फ्रंटलाइन' नेतृत्वात त्यांचे प्रतिनिधित्व नसल्याने हा मुद्दा चर्चेचा ठरत आहे.

प्रभारी अधिकाऱ्यांसाठी २४ तास 'अलर्ट'

पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला केवळ कार्यालयीन वेळेत काम करून चालत नाही. खून, दरोडा, गंभीर मारहाण, अपघात, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, आंदोलने, व्हीआयपी बंदोबस्त किंवा अन्य गंभीर घटना घडल्यास रात्री-अपरात्री घटनास्थळी धाव घ्यावी लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका, गुन्ह्यांचा आढावा, बंदोबस्ताचे नियोजन आणि कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन अशीही जबाबदारी त्यांच्यावर असते.

Police
Vadgaon Maval Har Ghar Tiranga: वडगाव मावळमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्साह; चित्रकला, रांगोळीपासून ई-बाईक रॅलीपर्यंत विविध उपक्रम

उपनिरीक्षक, सहायक निरीक्षकांची संख्या अधिक

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील महिला अधिकाऱ्यांची पदनिहाय संख्या पाहिल्यास सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक स्तरावर त्यांची उपस्थिती अधिक आहे. मात्र, या संख्येच्या तुलनेत पोलिस ठाणे किंवा तपास पथकाच्या नेतृत्वातील सहभाग कमी आहे. बहुतांश महिला साईड ब्रँचला कार्यरत आहेत.

महिला अधिकाऱ्यांचाही नकार

पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी किंवा तपास पथकप्रमुख म्हणून काम करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याची तयारीही महत्त्वाची असते. पोलिस वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, काही महिला अधिकारी वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे अशा जबाबदाऱ्या स्वीकारण्यास अनुत्सुक असतात. लहान मुलांची जबाबदारी, अनियमित ड्युटी, रात्री-अपरात्री घटनास्थळी जावे लागणे, तसेच अचानक बाहेरगावी मुक्काम करण्याची वेळ येणे, यामुळे काही महिला अधिकारी प्रभारीपद किंवा तपास पथकाची धुरा स्वीकारण्यास नकार देतात. त्यामुळे नेतृत्वातील महिलांचे कमी प्रमाण हे केवळ प्रशासनाकडून संधी न मिळण्यापुरते मर्यादित नसून, काही प्रकरणांत महिला अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक निवडीचाही त्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जाते.

आयुक्तालयातील महिला अधिकाऱ्यांची संख्या

  • पोलिस उपायुक्त (DCP) : १

  • सहायक पोलिस आयुक्त (ACP) : ३

  • पोलिस निरीक्षक (PI) : ६

  • सहायक पोलिस निरीक्षक (API) : १८

  • पोलिस उपनिरीक्षक (PSI) : ३६

  • एकूण महिला अधिकारी : ६४

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात महिला अधिकारी कार्यरत आहेत. प्रशासकीय सोय, उपलब्ध मनुष्यबळ, अनुभव आणि कामकाजाची गरज लक्षात घेऊन त्यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

गणेश इंगळे, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news