Cyber Fraud Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Cyber Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; दोन तरुणांवर गुन्हे, बँक खात्यांचा फसवणुकीसाठी वापर

संशयास्पद आर्थिक व्यवहारातून देशभरातील १५ तक्रारी समोर; दुसऱ्या प्रकरणात सायबर फसवणुकीत २ लाखांहून अधिक रकमेचा व्यवहार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: स्वतःच्या बँक खात्याचा वापर करून संघटित सायबर गुन्हेगारीच्या उद्देशाने संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ मार्च २०२६ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत आरबीएल बँक, एमआयडीसी लांडेवाडी, भोसरी येथे घडली.

आनंद किसन जाधव यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार, ऋषिकेश शिवराज कदम (रा. चरहोली, दिघी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आरबीएल बँकेतील स्वतःच्या खात्याचा वापर करून साथीदारांसह संघटित गुन्हेगारी करण्याच्या उद्देशाने कट रचला.

या खात्यावरून संशयास्पद आर्थिक व्यवहार करण्यात आले असून, देशभरातून एकूण १५ तक्रारी या खात्याशी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

सायबर फसवणुकीसाठी बँक खात्याचा वापर

स्वतःचे बँक खाते सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी वापरल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ जानेवारी ते १७ जुलै २०२६ या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्र, तळेगाव दाभाडे येथे घडली. इंद्रभान सुभाष इंगळे (३०) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

त्यानुसार, आशुतोष विलास शेजूळ (३०, रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते उघडून साथीदारांशी संगनमत केले. या खात्याचा वापर करून भारतातील दोन नागरिकांची सायबर फसवणूक करत २ लाख १ हजार ५०० रुपयांचे व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT