पिंपरी: ओव्हरटेकच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर टोळक्याने हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. 12) रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.
दिवाकर सुरेंद्र सिंग (रा. बोपखेल, पुणे), गणेश बांगर (रा. दिघी, पुणे), करण मोळक (रा. बोपखेल, पुणे), अमोल गिरी, अरशद (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व त्यांचा एक साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी गणेश बांगर आणि करण मोळक यांना पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील महेंद्र वाघमारे (27, रा. आंबेडकर चौक, रामनगर, बोपखेल) यांनी मंगळवारी (दि. 13) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे वडील महेंद्र रविंद्र वाघमारे हे स्कूटीवरून जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून गाडी अडवली. ‘ओव्हरटेक कसा केला’ या कारणावरून शिवीगाळ करत चिप्स तळण्याची लोखंडी कढई, हातोडी व सिमेंटच्या विटेने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात त्यांच्या डोक्याला, छातीला व पायाला गंभीर दुखापत झाली. दिघी पोलिस तपास करत आहे.
गुंतवणुकीच्या नावाखाली 55 लाखांची फसवणूक
शेअर व आयपीओमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका गृहिणीकडून तब्बल 55 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना 28 जुलै ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत पुनावळे येथे घडली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजन गौरव अट्रावलकर (31, रा. फ्लॅट नं. 603, गाया-बी, पुनावळे, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी मंगळवारी (दि. 13) याबाबत रावेत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ’डेींलज्ञ अवहूरूरप डर्राीह’ या ऑनलाइन ग््रुापमध्ये जोडून विश्वास संपादन केला. त्यानंतर लिंकद्वारे ‘र्र्छीींरेीि’ ॲपवर गुंतवणुकीच्या नावाखाली विविध बँक खात्यांत पैसे भरण्यास भाग पाडले. कॅपिटल व्हेरिफिकेशनच्या बहाण्याने एकूण 55 लाख 22 हजार 500 रुपयांचा अपहार करण्यात आला. रावेत पोलिस तपास करीत आहे.
शिवीगाळचा जाब विचारल्याने दगडाने मारहाण
शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने एका तरुणाला दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 12) रोजी सकाळी पावणेबारा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील महाळुंगे कडुस रोडवरील कोरेगाव गावठाण परिसरात घडली. विजय नारायण झांबरे (45, रा. कोरेगाव, ता. खेड) आणि त्यांचा एक साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वैभव पांडरंग मेदनकर (25, रा. मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आयशर वाहनावरील चालकाने फिर्यादीच्या कपाळावर दगड मारून जखमी केले. तसेच, दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे मित्र प्रज्वल शितोळे व प्रणव खंडागळे यांना मारहाण करून दमदाटी केली. या घटनेचा तपास उत्तर महाळुंगे पोलिस ठाणे करत आहे.
अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल जप्त
एका अल्पवयीन मुलाकडून बेकायदेशीररीत्या बाळगलेले गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. ही कारवाई सोमवारी (दि. 12) रोजी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास भोसरीतील मोहननगर परिसरात करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट तीनमधील पोलिस हवालदार सोमनाथ बाबासाहेव बोऱ्हाडे (वय 43) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहननगर, भोसरी येथील स्वप्नील किराणा स्टोअर्सजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्याने तपास केला असता आरोपीकडे सुमारे 40 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे अनधिकृत गावठी पिस्टल आढळून आले. भोसरी पोलिस तपास करीत आहे.
निगडीत एमडी ड्रग्जसह तरुणास अटक
एका तरुणाला पोलिसांनी मॅफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थासह अटक केली आहे. ही कारवाई 12 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास निगडीतील भक्ती-शक्ती चौक परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. स्वप्नील सुदाम पांढरे (34, रा. पांढरवस्ती, पुनावळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील पोलिस अंमलदार तेजस मारुती भालचिम यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्नील याच्याकडे सुमारे 10 हजार रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ बेकायदेशीररीत्या बाळगताना आढळून आला. निगडी पोलिस तपास करीत आहे.