मिलिंद कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभागनिहाय मतदार यादी मतदार पळवापळवी तसेच, फोडाफोडीचे प्रकार करण्यात आले आहेत. त्यापुढे जाऊन फेबुवारी 2017 मधील निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचीच नावे प्रभागातून गायब करण्यात आली आहेत. महापालिका प्रशासनाच्या मतदार यादीतील या गोंधळामुळे शहरातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
महापालिकेची निवडणूक जानेवारी 2026 मध्ये होणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादी गुरुवारी (दि.20) प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी तीन वेळा मुहूर्त बदण्यात आले. इच्छुक व त्यांच्या समर्थकांकडून मतदार यादीची तपासणी केली जात आहे. त्यात महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय मतदार याद्या फोडण्यात गोंधळ निर्माण करीत राजकारण केल्याचे बोलले जात आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवार तसेच, माजी नगरसेवकांचा पराभव करण्यासाठी माजी नगरसेवकांसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. ती नावे शेजारच्या प्रभागात जोडण्यात आली आहेत. तसेच, गल्ली, वस्ती, हाऊसिंग सोसायटीचे एकगठ्ठा मते दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे त्या प्रभागातील माजी नगरसेवकांनी संताप व्यक्त केला असून, प्रशासनाच्या या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली आहे. या दोषपूर्ण मतदार यादीवर हरकतींची संख्या वाढत आहे. येत्या गुरुवार (दि.27) पर्यंत ती संख्या फुगणार आहे. महापालिका प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. हरकतीनुसार मतदार यादीत सुधारणा न केल्यास तो निवडणुकीतील ठळक मुद्दा होऊ शकतो.
मतदार यादी फोडताना अनेक माजी नगरसेवकांसह त्यांच्या कुटुंबाची नावे वगळ्यात आली आहेत. ती नावे संबंध नसलेल्या दुसऱ्याच प्रभागात जोडण्यात आली आहेत. त्यामुळे त्या माजी नगरसेवकांला स्वत:चे तसेच, कुटुंबातील मतदारांची मते मिळणार नाहीत. तळवडे प्रभाग क्रमांक 12 मधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचे नाव चिखली प्रभाग क्रमांक 1 च्या मतदार यादीत जोडण्यात आले आहे. तेथील 1 हजार 261 नावे काढून चिखलीस जोडली आहेत. प्रभागात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेले शेकडो मतदार आजूबाजूच्या प्रभागात जोडण्यात आले आहेत. तसेच, मागील वेळी निवडणूक लढलेल्या योगिता रणसुभे याच्या नावासह मोरेवस्तीतील शेकडो मतदारांची नावे पूर्णानगर, कृष्णानगर, घरकुल प्रभाग क्रमांक 11 मध्ये जोडण्यात आली आहेत. प्रतिस्पर्धी प्रबळ उमेदवार पाडण्यासाठी रडीचा डाव केल्याचा आरोप केला जात आहे.
आतापर्यत तीन ते चार प्रभागात मतदारांची नावे गायब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्या-त्या प्रभागात गोंधळ निर्माण झाला आहे. असे अनेक प्रकार शहरातील 32 प्रभागात हळूहळू समोर येत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांचे स्थलांतर करून प्रशासनाने कोणाचा फायदा करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदार यादीतील गंभीर घोळ निवडणुकीच्या पारदर्शकतेवर थेट परिणाम करणारा असल्याने ही चूक की जाणूनबुजून केलेले राजकीय डावपेच, याचा सखोल तपास करण्याची तक्रारी करण्यात येत आहे. मतदार यादीतील भोंगळ कारभाराचा फटका निवडणुकीत बसणार असल्याचे दिसत आहे.
तळवडे प्रभाग क्रमांक 12 या माझ्या प्रभागामधील मतदार यादीमध्ये माझेच नाव नसल्याचे समोर आले आहे. हजारो मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये टाकले आहेत. हे राजकीय सुडापोटी केलेले काम आहे. यावरुन प्रशासन राजकीयांच्या तालावर नाचत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी केला आहे.