

भामा आसखेड: जगाच्या नकाशावर आशिया खंडात चाकण एमआयडीसीचे नाव पोचले आहे. परंतु एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांना खड्डे पडले असून रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचले असून, त्यातून दुर्गंधी सुटली आहे. एमआयडीसी क्षेत्रातील अनेक गावात कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प अद्याप अस्तित्वात नाही. एमआयडीसी विभागाचे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे काणाडोळा केला आहे.
खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसीमध्ये राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय अशा नामवंत हजारो कंपन्या आहेत. अमेरिका, जर्मनी, फान्स, इटली, इंग्लंड, चीन, रशिया आदी ठिकाणच्या अनेक नामवंत कंपन्या या ठिकाणी आहेत. केंद्र व राज्य सरकारने कंपनी क्षेत्रातील कंपन्यांना रस्त्यांचे जाळे निर्माण करून लाईट, पाणी अशा अनेक पायाभूत व मूलभूत सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केलेला आहे. एमआयडीसी विभागाने अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या असतानाही गावात पाहिजे त्या प्रमाणात सुविधा अजिबात पुरविल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
चाकण एमआयडीसी क्षेत्रातील वासुली, शिंदेगाव, निघोजे, मोई, कुरुळी, वराळे, आंबेठाण, भांबोली, खालुम्बे, सावरदरी, महाळुंगे, खराबवाडी, नाणेकरवाडी, बिरदवडी आदी गावात रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. साचलेल्या कचऱ्यातून अतिशय दुर्गंधी सुटली आहे. कचऱ्यावर असलेले चिलट, बारीक जीव-जंतू माणसाच्या शरीरावर बसत आहेत.
यामुळे मानवाला रोगराई होण्याचा धोका वर्तविला जात आहे. एमआयडीसी क्षेत्रातील गावांमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प उभारलेला नाही. यामुळे कचऱ्याची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. अनेक गावांना कचरा कुठे टाकावा हा प्रश्न भेडसावत आहे.
अनेक गावांनी एमआयडीसीकडे कचरा प्रकल्पासाठी जागेची मागणी केली. परंतु एमआयडीसीने त्यांना अद्याप जागा दिलेली नाही. कंपनीतून निघणारा कचरादेखील रस्त्याच्या कडेला टाकला जातो. एमआयडीसी क्षेत्रात कचऱ्याची समस्या प्रचंड गंभीर बनली आहे. याकडे एमआयडीसी विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे.
रस्त्याला पडले मोठ्या प्रमाणात खड्डे
एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्याच्या कडेला कचऱ्याची समस्या असताना दुसरीकडे रस्तेदेखील सुस्थितीत नाहीत. अनेक रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून त्याची दुरुस्ती देखील अनेक वर्षे झाले केली गेली नाही, हे मोठं दुर्दैव आहे. एमआयडीसी क्षेत्रातील ज्या ग््राामपंचायती आहेत, त्यांच्याकडून 50 टक्के कर एमआयडीसी विभाग घेत असताना सुविधा मात्र त्या मानाने काहीच पुरविल्या जात नाहीत. ग््राामपंचायतीकडून कर घेऊन एमआयडीसी विभाग करतोय काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग आणि दुसरीकडे रस्त्याला पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे एमआयडीसी क्षेत्रात ही मोठी समस्या उद्भवली आहे, याकडे एमआयडीसी विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.