बजरंग मासाळ
पिंपरी: एकेकाळी मातीच्या विटा, वाळू आणि मजुरांच्या बळावर उभ्या राहणाऱ्या इमारती आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर विक्रमी कालावधीत उभ्या राहत आहेत. गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम क्षेत्रात मोठा बदल झालेला दिसून येत आहे. रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी), मिवान फॉर्मवर्क, प्रीकास्ट तंत्रज्ञान, डिजिटल आराखडे आणि उष्णता नियंत्रित करणाऱ्या भिंती यामुळे घरांच्या संकल्पनेपासून बांधकामाच्या पद्धतीपर्यंत सर्व काही बदलले असून, नागरिकांचा कल स्मार्ट होम खरेदी करण्याकडे वाढला आहे. वाढती लोकसंख्या आणि वेळेचे महत्त्व लक्षात घेता बांधकाम उद्योग आधुनिक तंत्रज्ञानाकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.
विटांऐवजी हलक्या ब्लॉक्सना पसंती:
पूर्वी बहुतांश बांधकामांमध्ये पारंपरिक लाल विटांचा वापर होत असे. आता उष्णतारोधक (AAC) ब्लॉक्स आणि फ्लायॲश ब्लॉक्स यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे ब्लॉक्स वजनाने हलके असल्याने इमारतीवरील भार कमी होतो. उष्णतारोधक, उंच इमारतींसाठी अधिक पसंती. मजबूत, पर्यावरणपूरक आणि तुलनेने किफायतशीर. तसेच उष्णता आणि आवाज कमी प्रमाणात आत येतो. प्लास्टरसाठी कमी सामग्री लागत असल्याने खर्च आणि वेळ या दोन्हींची बचत होते.
आरएमसीमुळे वाढला बांधकामाचा वेग:
पूर्वी बांधकामस्थळीच सिमेंट, वाळू आणि खडी मिसळून काँक्रीट तयार केले जात असे. त्यासाठी मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागत असे. त्यामुळे दर्जामध्ये फरक पडत असे आणि वेळही अधिक लागत असे. आज रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) थेट प्रकल्पस्थळी उपलब्ध होत असल्याने काँक्रीटचा दर्जा एकसारखा राहतो. संगणकीय पद्धतीने तयार होणाऱ्या या काँक्रीटमुळे मोठ्या प्रकल्पांचे काम कमी वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे.
मिवान तंत्रज्ञान म्हणजे काय ?
मिवान म्हणजे ॲल्युमिनियम फॉर्मवर्क तंत्रज्ञान वापरून संपूर्ण मजल्याचे साचे एकाच वेळी उभारले जातात. भिंती आणि स्लॅब एकाच टप्प्यात तयार होत असल्याने बांधकामाचा वेग वाढतो; तसेच बांधकामाचा दर्जाही उत्तम राहतो. पूर्वी लाकडी, स्टीलच्या, किंवा पत्र्याच्या साच्यांचा सेंट्रिंगसाठी वापर करून आरसीसीचे काम केले जात असे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ आणि मनुष्यबळ लागत असे; मात्र आता मिवान तंत्रज्ञानामुळे वेळेची मोठी बचत होत आहे.
फ्लोअरिंगमध्ये आधुनिकतेचा स्पर्श
पूर्वी साध्या सिरॅमिक टाइल्स किंवा मोझॅक फ्लोअरिंगला मागणी होती. आता मोठ्या आकाराच्या व्हिट्रिफाइड टाइल्स, मार्बल फिनिश टाइल्स, अँटी-स्किड टाइल्स आणि लाकडी पोत असलेल्या टाइल्स यांचा वापर वाढला आहे. आकर्षक रचना, कमी सांधे आणि दीर्घकाळ टिकाऊपणा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.
उष्णतारोधक घरांची मागणी
पूर्वी घरातील तापमान कमी ठेवण्यासाठी जाड भिंती किंवा छतावर पांढरा रंग देण्याचा पर्याय वापरला जात असे. आता हीट रेझिस्टंट टाइल्स, कूल रूफ कोटिंग, थर्मल इन्सुलेशन शीट्स, एएसी ब्लॉक्स, डबल ग्लेझ्ड खिडक्या; तसेच लो-ई काच म्हणजेच घरातील तापमान नियंत्रित ठेवणाऱ्या काचांचा वापर वाढला आहे. त्यामुळे वातानुकूलनावरील खर्च कमी होतो.
आधुनिक खिडक्यांचा वाढता वापर
लाकडी खिडक्यांची जागा आता यूपीव्हीसी म्हणजेच टिकाऊ व मजबूत प्लास्टिक आणि पावडर कोटेड ॲल्युमिनियम खिडक्यांनी घेतली आहे. या खिडक्या गंजत नाहीत, देखभाल कमी लागते तसेच आवाज आणि उष्णता रोखण्यात अधिक प्रभावी ठरतात. मोठ्या काचेच्या खिडक्यांमुळे नैसर्गिक प्रकाशही अधिक प्रमाणात मिळतो.
स्नानगृहही झाले अत्याधुनिक
पूर्वी साधे कमोड, सामान्य नळ आणि शॉवर वापरले जात होते.आता अंतर्गत फ्लश यंत्रणा भिंतीना बसविलेले कमोड, रेन शॉवर, सेन्सर नळ, काचेचे शॉवर पार्टिशन, यांसारख्या आधुनिक सुविधांमुळे स्नानगृहांचा चेहरामोहरा बदलला आहे. पाण्याची बचत करणाऱ्या उपकरणांचाही वापर वाढला आहे.
रंगकामातही आधुनिक तंत्रज्ञान
पूर्वी डिस्टेंपर किंवा ऑइल पेंटचा वापर केला जात असे. आता हवामानरोधक बाह्यरंग, धूळरोधक रंग, बुरशीप्रतिबंधक कोटिंग, कमी रासायनिक उत्सर्जन करणाऱ्या रंगांना अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे रंग अधिक काळ टिकतो आणि देखभालीचा खर्च कमी होतो.
कमी मनुष्यबळ, अधिक यंत्रसामग्री
बांधकाम क्षेत्रात कुशल कामगारांची कमतरता जाणवत असल्याने आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टॉवर क्रेन, बूम प्लेसर, काँक्रीट पंप, बार बेंडिंग मशीन, लेझर लेव्हल मशीन, स्टील कापण्याची यंत्रे आणि आधुनिक उचल यंत्रणा यांच्या साहाय्याने कमी मनुष्यबळात अधिक वेगाने काम पूर्ण होत आहे.
डिजिटल तंत्रज्ञानामुळे बांधकाम अधिक अचूक:
पूर्वी कागदी आराखड्यांवर संपूर्ण काम केले जात असे. आता इमारतीची भौतिक संरचना अर्थात त्रिमितीय (3D) आराखडे तयार करणे, ड्रोनद्वारे जागेचे सर्वेक्षण, डिजिटल साईट मॉनिटरिंग, प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नियोजन यामुळे बांधकामातील चुका कमी होत आहेत.
शहरामध्ये वाढत्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे बांधकाम क्षेत्र वेगाने बदलत आहे. गुणवत्तेसोबत वेळ, ऊर्जा बचत आणि टिकाऊपणा यांना आता अधिक महत्त्व दिले जात आहे. पुढील काही वर्षांत प्रीकास्ट तंत्रज्ञान, ग्रीन बिल्डिंग आणि एआय आधारित प्रकल्प व्यवस्थापन हा उद्योगाचा मुख्य प्रवाह असू शकतो.डॉ. संजय पटेल, बांधकाम व्यावसायिक