पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या बांधकाम गृह व व्यापारी प्रकल्पांमुळे होणारे धूळ व वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कडक नियमावली लागू केली आहे. त्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दीडशेहून अधिक बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात आल्या असून, बांधकाम परवानगी स्थगित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वेगाने वाढणारे शहरीकरण, वाढती वाहनसंख्या आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बांधकामे यामुळे शहरात वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, औद्योगिक परिसर तसेच, बांधकाम सुरू असलेल्या भागांमध्ये धुळीचे प्रमाण वाढले असून, वाहनांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे चित्र दिसत आहे.
शहरातील वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, भोसरी, चिखली, मोशी, निगडी, पिंपरी, तळवडे, पिंपळे गुरव, कासारवाडी, सांगवी, दापोडी, आकुर्डी, पिंपळे निलख, रहाटणी, काळेवाडी, चर्होली, वडमुखवाडी परिसरात औद्योगिक आणि वाहतूक हालचाली मोठ्या प्रमाणावर होत असल्याने प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. तसेच, महामेट्रो, उड्डाण पूल आणि रस्ते विस्ताराची कामे सुरू असल्याने धुळीचे प्रमाण वाढत आहे. अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य उघड्यावर ठेवले जात असल्याने वार्यासोबत धूळ उडून वातावरण दूषित होत असल्याचेही निदर्शनास येत आहे.
हवेत सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढल्यास दमा, श्वसनाचे आजार, एलर्जी तसेच, डोळ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होत आहे. घरातील साहित्यांवर धुळीचे स्थर जमा होतात. रात्री दहानंतर बांधकाम सुरू ठेवल्याने कर्कश आवाजाने रहिवाशी हैराण झाले अहेत. मोठ्या बांधकाम प्रकल्पांमुळे परिसरात धूळ उडणे, रस्त्यांवर माती साचणे आणि हवेची गुणवत्ता खालावणे, या सारख्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
महापालिकेकडून बांधकामांवर पाणी फवारणी करणे, धूळ रोखण्यासाठी जाळ्या (ग्रीन नेट) बसविणे, रस्ते नियमित स्वच्छ करणे आणि नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात बांधकाम व्यावसायिकाकडून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना नाही. अनेक भागात सर्रासपणे नियमाचे उल्लंघन केले जात असून, उपाययोजनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
तक्रारींची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने प्रत्यक्ष बांधकाम स्थळाची पाहणी केली. त्यानुसार दीडशेहून अधिक बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नियमानुसार तातडीने उपाययोजना न केल्यास बांधकाम परवानगीस स्थगिती देण्यात येण्याचा इशारा बांधकाम परवानगी विभागाने दिला आहे.
रात्री दहा ते सकाळी सातपर्यंत बांधकामांना बंदी
पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण बांधकामामुळे वायु व ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. त्यानुसार महापालिकेकडून संबंधित बांधकामांवर नियंत्रण ठेवत नियमावली तयार करण्यात आली आहे. रात्री दहा ते सकाळी सातपर्यंत बांधकामे बंद ठेवण्यात येत आहेत. याशिवाय अन्य नियमानुसार बांधकाम व्यावसायिकांनी काम करावे, असे निर्देश दिलेले आहेत. तसेच प्रत्येकाने उपाययोजनांवर लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करणार्यांना नोटीसा बजावण्यात येत आहेत, असे महापालिकेचे सहशहर अभियंता सुनील भागवानी यांनी सांगितले.