Pimpri Chinchwad Civic Projects Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Civic Projects: पिंपरी-चिंचवडमध्ये 100 कोटींच्या कामांना मंजुरी

सीसीटीव्ही, पाणीपुरवठा व सुशोभीकरण प्रकल्पांना स्थायी समितीची हिरवी झेंडी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील शहरभरात सीसीटीव्ही देखभाल व दुरुस्ती करणे, पाणीपुरवठा, विद्युत देखभाल, तसेच विविध विभागांशी संबंधित विषयांना येणाऱ्या सुमारे 100 कोटी रुपये खर्चाच्या कामांना स्थायी समितीने सोमवारी (दि.16) झालेल्या विशेष सभेत मान्यता दिली.

सभेच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे होते. यावेळी नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगर सचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह स्थायी समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय, महापालिकेच्या शाळा, प्रशासकीय इमारती, सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र, रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र व शहरातील जलकुंभ तसेच, विविध प्रभागांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणांच्या वार्षिक देखभाल व दुरुस्ती कामांच्या सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

पाणीपुरवठा यंत्रणा, पंपहाऊस, ट्रान्सफॉर्मर व विद्युत यंत्रणांशी संबंधित विविध कामांसाठी येणार्या खर्चास मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या विविध इमारती, शाळा व दवाखान्यांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यासाठीच्या 22 लाख75 हजार रुपये कामास मुदतवाढ देणे. पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपीएल) कर्मचार्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरक रकमेच्या दुसर्या हप्त्यासाठी महापालिकेच्या वाट्याचा 56 कोटी 10 लाखांचा निधी अग्रिम स्वरूपात देणे, या विषयांना मंजुरी देण्यात आली.

छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणाचा 50 कोटींचा विषय अखेर मंजूर

बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सुशोभिकरणासाठी स्थापत्य व विद्युत कामाच्या एकूण 50 कोटी खर्चाचे दोन विषय बुधवार (दि. 11) च्या सभेत तहकूब करण्यात आले होते. त्यावरून शुक्रवार (दि. 13) सर्वसाधारण सभेतही वाद झाला होता. त्याला दोन विषयाना आजच्या सभेत मान्यता देण्यात आल्या. त्या विषयांना शिवसेनेने आजही विरोध दर्शवला. या संदर्भात समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे म्हणाले की, गेल्या चार दिवसांत विरोधकांनी त्या कामांबाबत केवळ राजकारण केले. त्यांनी कोणत्याही शंकांचे निरसन केले नाही किंवा ठोस काहीही मांडले नाही. पारदर्शक कारभार करण्यासाठी तो विषय तहकूब ठेवला. मात्र, चार दिवसांत त्यांनी काहीच केले नाही. आमच्या अस्मितेचा मुद्दा म्हणून तो विषय आम्ही आज मंजूर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT