Hospital Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Burn Hospital: पिंपरी-चिंचवडचे ५० कोटींचे बर्न हॉस्पिटल दोन वर्षांपासून रखडले!

इमारतीचे अंतर्गत काम अपूर्ण; स्थापत्य विभागाच्या दिरंगाईमुळे विद्युत कामही ठप्प, भाजलेल्या रुग्णांना उपचारांसाठी पुण्याला हलवण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने तालेरा रुग्णालयासमोरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या इमारतीत उभारण्यात येत असलेल्या बर्न रुग्णालयाचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. इमारतीचे बाह्य बांधकाम हे यापूर्वीच पूर्ण झाले आहे; मात्र अंतर्गत भागातील महत्त्वाच्या सुविधा आणि यंत्रसामुग्रीअभावी हे रुग्णालय अजूनही नागरिकांच्या सेवेत दाखल झालेले नाही. त्यामुळे भाजलेल्या गंभीर रुग्णांना उपचारासाठी पुण्यातील रूग्णालयात नेण्याची वेळ नातेवाईकांवर येत आहे.

महापालिकेने २०२२ मध्ये शहरासाठी स्वतंत्र बर्न हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला होता. तालेरा रुग्णालयाच्या समोरील महापालिकेच्या मालकीच्या इमारतीत हे रुग्णालय उभारण्याचे निश्चित करण्यात आले. या ठिकाणी ३० बेडमध्ये ६ बेडचा आयसीयू, १२ खाटांचा महिला विभाग, १२ खाटांचा पुरुष विभाग सुरु केला जाणार आहे. त्याशिवाय अत्याधुनिक हायड्रेशन युनिट, प्लास्टिक सर्जरी सुविधा, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, आपत्कालीन विभाग इत्यादी विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने आराखडा तयार केला आहे. महापालिकेच्या २०२४ - २५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात बर्न वॉर्डसाठी ५० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. महापालिकेच्या एकाही रुग्णालयात सध्या बर्न वॉर्ड उपलब्ध नाही.

तळवडे येथे २०२३ मध्ये स्पार्कल फायर कॅन्डल बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत १४ कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी बर्न वॉर्ड सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. ही घोषणा करुन तीन वर्षे झाली तरी अद्याप बर्न वॉर्ड सुरु झाला नाही. प्रत्यक्षात मात्र या कामाला अपेक्षित गती मिळाली नाही. सध्या या इमारतीत स्थापत्य विभागाचे बहुतांश काम बाकी आहे. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांपेक्षा जास्त आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती आहेत. केमिकल, फटाके, गॅस सिलिंडरच्या दुर्घटनांमध्ये भाजण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र, शहरात अद्ययावत बर्न हॉस्पिटल नसल्याने गंभीर रुग्णांना ससून रुग्णालयात किंवा पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवावे लागते. उपचार मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे अनेकदा रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे भाजण्याच्या घटना वाढतात, त्यावेळी तर या रुग्णालयाची उणीव प्रकर्षाने जाणवते.

या भागातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामाला गती द्यावी अशी मागणी केली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने याबाबत तातडीने पावले उचलून रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करावे, अशी मागणी होत आहे. आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून रखडलेले काम मार्गी लावावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

'स्थापत्य'चे काम अद्याप अपूर्ण

तालेरा रुग्णालयासमोरील इमारतीत बर्न रुग्णालयाचे स्थापत्य विभागाचे काम अद्याप बाकी असल्याचे दिसत आहे. इमारतीत बर्न आयसीयू, ऑपरेशन थिएटर उभारण्याचे नियोजन होते. मात्र, स्थापत्य विभागाच्या दिरंगाईमुळे काम रखडले आहे. इमारतीचे प्लास्टर, फ्लोरिंग, टॉयलेट ब्लॉक, आतील काम तर सुरूच झालेले नाही. दुसऱ्या मजल्याची अजून तोडफोड करणे बाकी आहे. मनुष्यबळ कमी लावल्याने दिवसाला अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे. स्थापत्य विभागाचे काम पूर्ण झाल्याशिवाय विद्युत विभागाला काम करता येत नाही. याबाबत मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.

विद्युत विभागाची तयारी, पण...

तालेरा रुग्णालयासमोरील प्रस्तावित बर्न रुग्णालयाच्या विद्युत विभागाचे संपूर्ण काम स्थापत्य विभागामुळे ठप्प झाले आहे. आमचे साहित्य खरेदी करून तयार आहे, परंतु स्थापत्यचे काम पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही, असे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. स्थापत्य विभागाचे काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही वायरिंग करू शकत नाही. त्यामुळे आम्ही स्थापत्य विभागाच्या कामाची वाट पाहत आहोत, अशी भूमिका विद्युत विभागाने घेतली आहे. एकाच इमारतीतील कामात दोन विभागात समन्वय नसल्याने ५० कोटींचा महत्त्वाचा प्रकल्प रखडला आहे.

विद्युत विभागाकडून आवश्यक साहित्य खरेदी झाली आहे; परंतु स्थापत्य विभागाचे काम बाकी असल्याने आम्हांला इतर कामे करता येत नाहीत. स्थापत्यचे काम पूर्ण झाले की आम्ही दिलेल्या मुदतीत विद्युतचे काम पूर्ण करू.
अनिल भालसाखळे (सह शहर अभियंता, विद्युत विभाग)
आमच्या येथे एक महिला गंभीर भाजल्यामुळे आम्ही तिला तालेरा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, याठिकाणी प्राथमिक उपचार करुन तिला पुण्यातील ससून रुग्णालयात न्यायला सांगितले. ससून रुग्णालयातही तिला उपचारासाठी दाखल केले नाही. या दरम्यान महिलेला खूप त्रास सहन करावा लागला. भाजलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पिंपरी चिंचवडसारख्या मोठ्या शहरात बर्न रुग्णालय नसणे हे दुर्दैवी आहे. अपघात, गॅस गळती, आग किंवा इतर दुर्घटनांमध्ये भाजलेल्या रुग्णांना तातडीने उपचारांची गरज असते. अशावेळी उपचारांसाठी रुग्णांची हेळसांड होऊ नये. या विषयाला पालिकेने प्राधान्याने स्थान द्यावे.
विवेक तापकीर (उपाध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT