Pimpri Chinchwad BRT Route Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad BRT Route: बीआरटी मार्गावरच खासगी वाहनांचा कब्जा; पीएमपीएमएल बसला स्थानकात प्रवेश करताना कसरत

बेकायदा पार्किंगमुळे बससेवेचा खोळंबा; प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न, नियमित गस्त आणि कठोर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि पीएमपीएमएल बसला वाहतुकीत अडथळा येऊ नये, यासाठी उभारण्यात आलेल्या बीआरटी मार्गांमध्येच आता खासगी वाहनांचे अतिक्रमण वाढताना दिसत आहे. शहरातील विविध बीआरटी मार्गांवरील बसस्थानकांच्या परिसरात खासगी वाहनांची रांग लागलेली असल्याने पीएमपीएमएल बसला स्थानकात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. परिणामी बसचालकांना स्थानकाजवळच वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

बीआरटी मार्ग हा सार्वजनिक वाहतुकीतील बसच्या जलद आणि सुरक्षित प्रवासासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र, अनेक ठिकाणी या मार्गावरच खासगी चारचाकी तसेच दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. विशेषतः बीआरटी बसस्थानकांच्या आसपास काही वेळासाठी वाहन थांबविण्याच्या नावाखाली वाहनचालकांकडून या मार्गाचा वापर केला जातो. काही ठिकाणी तर रस्त्याच्या कडेला वाहनांची अक्षरशः रांग लागलेली दिसते.

यामुळे बसस्थानकात बस आणताना पीएमपीएमएलच्या चालकांना वाहनांचा अडथळा टाळण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा बसला थांब्यावर व्यवस्थित उभे करता येत नसल्याने प्रवाशांना रस्त्याच्या बाजूने बसमध्ये चढावे-उतरावे लागण्याची परिस्थिती निर्माण होते. त्यातच बीआरटी मार्गावर एखादे खासगी वाहन अडथळा ठरल्यास मागून येणाऱ्या बसचीही कोंडी होण्याची शक्यता वाढते.

बसचा मार्ग खासगी वाहनांसाठी की सार्वजनिक वाहतुकीसाठी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बीआरटी मार्ग तयार करताना सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचा उद्देश होता. मात्र, प्रत्यक्षात या मार्गावरच खासगी वाहनांचा वाढता वावर आणि बेकायदा पार्किंग यामुळे बीआरटी व्यवस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.

शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवर बीआरटी मार्गाच्या प्रवेशद्वारांपासून ते बसस्थानकांच्या परिसरापर्यंत खासगी वाहनांची वर्दळ वाढली आहे. वाहतूक पोलिसांकडून अधूनमधून कारवाई केली जात असली तरी कारवाईनंतर काही वेळातच पुन्हा त्याच ठिकाणी वाहने उभी राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे केवळ दंडात्मक कारवाई न करता बीआरटी मार्गावर नियमित गस्त, सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी आणि वाहनचालकांवर सातत्याने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT