पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आणि वाहतूककोंडी कमी करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या बीआरटी मार्गात सध्या खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बीआरटी मार्ग केवळ बससाठी राखीव असतानाही दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनचालक सर्रास या मार्गावरून जात असल्याने वाहतूक व्यवस्थेचा उद्देशच धुळीस मिळत आहे. या प्रकाराकडे वाहतूक विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरात महापालिकेने विविध भागांमध्ये बीआरटी मार्ग उभारले आहेत. या मार्गांमुळे बस वाहतूक वेगवान होऊन नागरिकांना वेळेत प्रवास करता यावा. तसेच, शहरातील वाहतूककोंडी कमी व्हावी, असा उद्देश होता. मात्र, प्रत्यक्षात बीआरटी मार्ग अनेकदा रिकामे दिसतात, तर शेजारील सर्वसाधारण रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते.
केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत शहरात बीआरटी मार्ग उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पात बससाठी स्वतंत्र लेन, बसथांबे, सिग्नल व्यवस्था अशी सुविधा देण्यात आली, परंतु प्रत्यक्षात खासगी वाहनांच्या घुसखोरीमुळे या व्यवस्थेचा फायदा बससेवेला अपेक्षित प्रमाणात होत नसल्याची परिस्थिती आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी बीआरटी मार्गावर कोणतीही कडक अंमलबजावणी नसल्याने खाजगी वाहनचालक बिनधास्तपणे या मार्गाचा वापर करत आहेत. परिणामी बसचा वेग कमी होतो. तसेच, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण होतो. महापालिकेकडून या घुसखोरीवर नियंत्रण आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, काही बीआरटी बसथांब्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तरीही वाहनचालकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक विभाग आणि महापालिकेने संयुक्तपणे कडक कारवाई केल्यासच बीआरटी मार्गातील घुसखोरी थांबू शकते. अन्यथा बीआरटी प्रकल्पाचा मूळ उद्देश पूर्ण होणार नाही.
शहरातील प्रमुख बीआरटी मार्ग
सांगवी ते किवळे
नाशिक फाटा ते वाकड रस्ता
निगडी ते दापोडी
काळेवाडी फाटा ते
देहू-आळंदी
भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक किवळे
बोपखेल ते आळंदी