पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भव्य अजितसृष्टी उभारण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून त्यांच्या संकल्पनेनुसार ती सृष्टी निर्माण केली जाईल, असे सांगून पिंपरी-चिंचवड शहरासाठी अजितदादांचे मोठे योगदान असून, ते कोणी नाकारू शकत नाही, असे महापौर रवी लांडगे यांनी शुक्रवारी (दि. 6) स्पष्ट केले. महापौर पदाचा महिन्याभराचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी उपमहापौर शर्मिला बाबर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
महापौर लांडगे म्हणाले की, अजितसृष्टी निर्माण करण्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. त्यांच्या संकल्पनेनुसार ती भव्य अजितसृष्टी असेल. त्यात अजितदादांनी शहरात केलेल्या विकासकामांचे दर्शन घडविले जाईल. त्यानुसार, अजितसृष्टी बनविण्याचा तसेच, सभागृहत अजितदादांचे तैलचित्र लावण्याचा ठराव करण्यात येईल. अजितसृष्टीबाबत सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात अद्याप स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरासाठी पाणीप्रश्न गंभीर आहे. भामा-आसखेड पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी निष्क्रीय ठेकेदाराकडून काम काढून घेतले असून, उर्वरित कामांसाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात येत आहे. तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराला 167 एमएलडी अतिरिक्त स्वच्छ पाणी मिळणार आहे. अग्निशमन विभागाचे ऋषिकेश चिपाडे यांची बदली करण्यात आली असून, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कामांची विभागणी करण्यात आली आहे.
मोकाट व भटकी कुत्र्यांची संख्या नियंत्रणास आणण्यासाठी सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयात एक कुत्री संगोपन केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी कुत्रीप्रेमींची बैठक घेण्यात येत आहे. पाळीव कुत्र्यांनी सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागास दिले आहेत. रात्रीच्या वेळेत रस्ते साफसफाईस महिला कर्मचार्यांची नियुक्त बंद करण्यात आली आहे. मालमत्ताकरातून महापालिकेचे उत्पन्न वाढावे. तसेच, थकबाकीदारांना दिलासा मिळावा म्हणून मार्च महिन्यासाठी अभय योजना सुरू केली आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे, असे सांगून महापालिकेस पूर्णवेळ आयुक्त मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.
प्रशासकीय राजवटीतील कामांची श्वेतपत्रिका काढणार
प्रशासकीय राजवटीतील काळात झालेल्या सर्व कामांचा आराखडा सादर करण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत. त्या कामांची तपासणी करून त्यांचे ऑडिट केले जाईल. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून महापालिकेचे आर्थिक धोरण ठरवण्यात येणार आहे. गरज पडल्यास त्या काळातील कामांची श्वेतपत्रिका काढण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.
जात प्रमाणपत्राचे पुरावे दिले आहेत
महापालिका निवडणुकीत मी सादर केलेल्या जातप्रमाणपत्राबाबत जातपडताळणी समितीकडे तक्रार करण्यात आली आहे. त्या संदर्भातील सर्व पुरावे मी सादर केले आहेत. त्याबाबत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे, असे महापौरांनी सांगितले.
महासभेत राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब ?
भाजपाकडून सात स्वीकृत नगरसेवकांची नावांची यादी लवकरच आयुक्तांकडे सादर केली जाईल. सात जणांना संधी दिली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नावांवर येत्या 13 मार्चच्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करायचा की तो विषय तहकूब करायचा, हा निर्णय गटनेत्यांशी चर्चा करून घेतला जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
प्रदूषण कमी करण्यावर प्राधान्य
शहरात प्रदूषण वाढले आहे. ते कमी करण्यासाठी जागतिक निकर्षानुसार उपाययोजना केल्या जात आहेत. निगडीतील दुर्गादेवी टेकडीवर दाट वन निर्माण करून ऑक्सिजन पार्क उभारले जाणार आहे. शहरातील विविध भागांत वनीकरणावर भर दिला जाणार आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या तसेच, मैलासांडपाणी सोडणाऱ्या कंपन्या, आस्थापना, ग्रामपंचायत, नगरपालिकांची माहिती गोळा केली जात आहे. घनकचरा व्यवस्थापनात नवीन तंत्रज्ञान आणून निर्माण झालेल्या ठिकाणीची कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. पालिकेने हवामान अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली नसली तरी, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पुरेसा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे, असे महापौरांनी सांगितले.
निगडी ते चाकण नवीन मेट्रो डीपीआरला सभागृहाची मान्यता देणार
निगडी ते चाकण मेट्रोच्या नवीन मार्गाचा डीपीआर सादर करण्यास आयुक्तांना सांगण्यात येणार आहे. तो पाहून त्याला मान्यता दिली जाईल. तसेच, स्मार्ट सिटी कंपनीचे 80 टक्के काम झाली आहेत. उर्वरित कामे 20 टक्के कामे पूर्ण करून संपूर्ण यंत्रणा 100 टक्के कार्यान्वित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात पुढील बैठकीत आढावा घेणार आहे, असे महापौरांनी सांगितले. निगडी ते चाकण मेट्रो डीपीआर, नवीन महापालिका भवनाचे नगरसेवकांसह पत्रकारांसमोर सादरीकरण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.