

वाकसई : जगद्गुरू संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान, वाकसई येथे श्री तुकाराम बीजनिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात हभप आदिनाथ महाराज दानवे (बीड) यांची कीर्तन सेवा पार पडली. संत तुकाराम महाराजांच्या निर्वाण प्रसंगाचे वर्णन करताना, माणसाचे जगणे आणि जगातून जाणे दोन्ही स्मरणीय असले पाहिजे, असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला. सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत ही कीर्तन सेवा पार पडली. 12 वाजता पुष्पवृष्टी करत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमन सोहळ्याचे स्मरण करण्यात आले.
हभप दानवे महाराजांनी कीर्तन सेवेसाठी संत तुकाराम महाराजांचा निर्वाण प्रकरणातील आपुल्या माहेरा जाईन मी आता | निरोप या संता हाती आला | | 1| | सुख दु:ख माझे आइकिले कानी| कळवळा मनी करुणेचा | | 2| | तुका म्हणे आता येतील न्यावया| अंगी साउलिया भातुके | |3| | या अभंगावर निरुपण केले.
निरूपण करताना महाराज म्हणाले की, या जगात प्रत्येक जण जगण्यासाठी धडपडत असतो; मात्र, तुकोबाराय स्वतःच्या निर्णयाने “जाता”असे म्हणतात. त्यांच्या या जाण्याने जगाला वेड लावले. मोठ्या घरात जन्म घेणारी माणसे केवळ जिवंत असेपर्यंतच मोठी असतात, पण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत संत तुकाराम महाराजांचे स्मरण राहील. माणसाचा जन्म कुठे झाला यापेक्षा तो कसा जगला आणि कसा गेला, याला सर्वाधिक महत्त्व आहे. कीर्तनाच्या अंतिम टप्प्यात मफआम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावीःफफ या हृदयस्पर्शी अभंगाने जगद्गुरू जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमन सोहळ्याच्या कीर्तनाची सांगता झाली. यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तीरसात तल्लीन झाले होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान सेवा ट्रस्ट व मासिक दिंडी समाज मावळ तालुका यांच्या वतीने या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचे कीर्तन सोहळ्याचे ही 30 वे वर्ष आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्यासाठी तीर्थक्षेत्र देहूगाव येथे इंद्रायणी नदीच्या काठी वैष्णवांचा मेळा एकत्र आला होता. या वेळी बीज सोहळ्यासाठेी आलेल्या भाविकांनी ज्ञानोबा-तुकाराम असा नामघोष केल्याने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. बीज सोहळ्यासाठी देहूगाव येथील मुख्य मंदिरातून वैकुंठ गमन सोहळा मंदिराकडे पालखी घेऊन जाताना वारकरी. तसेच इंद्रायणीच्या काठी वासुदेवांनी केलेली जनजागृती. या सोहळ्यात फुगडी घालून वारकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तसेच संबळवादन करत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या बीजसोहळ्यात सहभाग घेत नामघोष करताना गोंधळी. हा सोहळा निर्घ्वन पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आपली परंपरा व वारी पुढील पिढीला कळावा म्हणून आपल्या नातवांना खांद्यावर घेऊन फिरताना वयोवृद्ध वारकरी. हा सुखसोहळा आपल्या डोळ्यांनी टिपण्यासाठी लाखो वारकरी आज देहूनगरीत दाखल झाले होते. (सर्व छाया ः यशवंत नामदे)